विमानात एका महिलेला भीती वाटू लागली. तिच्या शेजारच्या सीटवर अभिनेते अनिल कपूर बसले होते. त्यांनी अशी कृती केली की आता आपला हा विमान प्रवास ही महिला कधीही विसरणार नाही. दोन तासांचा आपला प्रवास नेमका कसा झाला? याबाबत या महिलेने पोस्ट करत आपला अनुभव शेअर केला आहे आणि अनिल कपूर यांचं कौतुक केलं आहे.
शिखा मित्तल यांनी लिंक्डइनवर शेअर केली पोस्ट
बे. आर्टी (Be Artsy) या संस्थापक शिखा मित्तल यांनी LinkedIn वर पोस्ट लिहून अनिल कपूर यांच्या कृतीचं कौतुक केलं आहे. या महिलेने असं म्हटलं आहे विमानात अभिनेता अनिल कपूर माझ्या शेजारी बसले होते. टर्ब्युलन्स सुरू झाल्याने लगेज बॉक्स उघडला आणि त्याचा दरवाजा धडकू लागला. या गोष्टीमुळे मी घाबरून गेले. त्याचवेळी शेजारच्या सीटवर बसलेल्या अनिल कपूर यांनी अशी कृती केली मी मला त्यामुळे दिलासा मिळाला असं या महिलेने सांगितलं आहे.
काय केलं अनिल कपूर यांनी?
विमानात जेव्हा टर्ब्युलन्स सुरू झाला आणि मी घाबरले तेव्हा अनिल कपूर यांनी माझा हात धरला. त्यानंतर माझ्याशी बोलत राहिले आणि माझं लक्ष वळवण्याचा प्रयत्न केला. आपल्या पोस्ट मध्ये त्या म्हणतात की फ्लाईटने टेक ऑफ होत असतानाच टर्ब्युलन्स सुरू झाला. विमान असंही टेक ऑफ करताना मला भीती वाटते. अशात टर्ब्युलन्स सुरू झाल्याने मी जास्तच घाबरले. मी दोन सीटच्या मध्ये असलेल्या डिव्हाईडरवर हात ठेवला तेव्हा माझ्या सह प्रवाशाने माझा हात पकडला आणि ते मला म्हणाले अहो घाबरू नका मला तुमचं नाव सांगा. चला आपण बोलू थोडंसं. माझे हे सहप्रवासी दुसरे तिसरे कुणी नाही तर अनिल कपूर होते. टेक ऑफ झाल्यानंतर विमान स्थिर झालं आणि माझी भीतीही कमी झाली. पुढचे दोन तास आम्ही सिनेमा, कॉफी, मुंबईत वाढलेल्या किंमती आणि अनेक विषयांवर गप्पा मारल्या. अनिल कपूर यांच्यासोबत घालवलेले ते क्षण मी कधीही विसरणार नाही.
शिखा मित्तल आणखी काय म्हणाल्या?
शिखा मित्तल पुढे आपल्या पोस्टमध्ये म्हणाल्या की अनिल कपूर यांनी मी काम करते त्याचं स्वरूप नेमकं काय आहे? ते जाणून घेतलं. तसंच आर्थिक योजना, रिटायर्डमेंट प्लान, निधी ठेवी, वारस निवडणं या सगळ्या विषयांवर चर्चा केली. माधुरी दीक्षित आणि श्रीदेवी यांच्यासोबत काम करतानाचा अनिल कपूर यांचा अनुभव कसा होता ते देखील आम्ही बोललो. लम्हे या सिनेमाबाबतही आम्ही गप्पा मारल्या असंही शिखा मित्तल यांनी म्हटलं आहे. अनिल कपूर यांच्यामुळे माझी भीती तर गेलीच पण माझा प्रवासही अविस्मरणीय झाला हे दोन तास कधीही विसरता येणार नाहीत असंही शिखा मित्तल यांनी स्पष्ट केलं आहे.