खरे म्हणजे, ठिय्या मारून राहण्याचा त्याचा स्वभाव नाही. निसर्ग त्याला तशी परवानगीच देत नाही. त्याने केव्हा यायचे, किती काळ राहायचे आणि केव्हा परतायचे, हे सारे ठरलेले असते. म्हणून तर त्याने सगळ्यांना जीव लावलेला असतो. उन्हाचे तडाखे अनुभवल्याशिवाय त्याच्या शिडकाव्याचा गारवा सुखावह होत नसतो. म्हणून तर आकाशातला सूर्य आग ओकू लागतो, तेव्हा घामेजले जीव त्याच्या आठवाने व्याकुळ होतात आणि त्याच्या पहिल्यावहिल्या बरसण्याकडे डोळे लागतात. पहिला पाऊस पडताना पाहून पाडगावकरांनी कविता लिहिली आणि पापडवाल्यांनी त्या पाऊसगाण्याचीच जाहिरात करून पापडाचे आणि पावसाचे नाते जोडून दिले. असा पाऊस कवितांमधून बरसू लागला, तेव्हा तो प्रत्येकाला हवासा वाटत होता. गेल्या वर्षी मात्र, या कौतुकाने तो जरा जास्तच लाडावला. परत जायचे नावच घेईना झाला आणि त्याने चक्क मुक्कामच ठोकला. गेल्या वर्षी जूनमध्ये सुरू झालेला हा पाऊस, राज्याच्या कुठल्या ना कुठल्या कोपऱ्यात आगंतुक पाहुण्यासारखी हजेरी लावतच सुटला आणि त्याची नवलाईच संपून गेली. उन्हाच्या काहिलीने करपलेल्या जमिनींच्या भेगा भेसूर आ वासून आकाशाकडे नजरा लावून ताटकळतात, मातीचे श्वास करपल्यागत होतात आणि आभाळातल्या काळ्या ढगाच्या एखाद्याच चुकार तुकडय़ाकडे पाहात काळी आई त्याची विनवणी करू लागते, ‘या धरतीवर अभिषेक करा’ असे आर्जव करू लागते, तेव्हा त्या आर्जवाचे भान जपत जमिनीवर कोसळणाऱ्या पाऊसधारांचे अप्रूप राहिलेच नाही. ‘काळ्या काळ्या कपारीत कल्लोळ दुधाचा, एकाएकी कोसळला पाऊस मधाचा’ या मधाळ ओळींची कविता जीवघेणी वाटू लागते आणि अखेर, ‘नको नाचू तडातडा, अस्सा कौलारावरून’ अशी दमदाटी करण्याची वेळ येते. पावसाने कसे अलगद मागून येऊन मिठीत घेणाऱ्या प्रियकरासारखे अवखळपणाने यायचे असते.. भेटीसाठी जीव आसुसलेला असताना तो तसा आला, म्हणजे ‘असा उशिरा आलेला पाऊस, तळहाती झेलून घ्यावा, कपाळीच्या घामात मिळवावा’ अशी आस लागली पाहिजे.. पण यंदा सारे त्याने गुंडाळूनच ठेवले. ‘मोसमी’ म्हणून आला, ‘अवकाळी’ बरसत राहिला आणि पुन्हा ‘पूर्वमोसमी’ म्हणून कोसळतच राहिला. गेल्या वर्षी मोसमी पाहुणा म्हणून आलेल्या या पावसाने चांगली सुरुवात केल्याने सुखावलेला शेतकरी, त्याच्या अवेळी झोडपण्याने करवादून गेलाय. असा अवेळी धिंगाणा घालत राहिला तर बारा महिने पाऊसगाणी गात बसण्यात मजा काय राहिली?.. पाऊसगाण्यांचा मौसम बिघडू नये म्हणून तरी त्याने वेळेवर यावे, ठरल्यासारखे राहावे आणि आनंद देऊन परतावे.. म्हणजे, पाऊसगाण्याचा ताल त्याच्या रिमझिमत्या सरींसोबत निनादत राहील. ‘रिमझिम पावसात जाऊ गं, गुणगुण गाणे गाऊ गं.. थुईथुई नाचत न्हाऊ गं’.. असे म्हणावेसेही वाटेल. ‘नेमेचि’ येणारा पाहुणा, ‘नेहमीच’ येऊ लागला की त्याच्या पाहुणचाराचा कंटाळा येतो. पावसाचं तसं व्हायला नको. तसं झालं तर त्याच्या रिमझिमत्या सरीवर, त्याच्या अल्लड झडीवर आणि त्याच्या कोसळण्यावरही कविता कशा होतील? बारमाही वर्तुळात वावरणाऱ्या पावसाने आता थोडे शहाणे व्हायला हवे..