पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे उद्भवणाऱ्या आपत्तीच्या काळात काही अधिकारी आणि कर्मचारी मोबाईल बंद ठेवून गैरहजर राहतात. त्यामुळे नागरिकांना वेळेवर मदतकार्य मिळत नसल्याची बाब यापुर्वीही समोर आली आहे. यंदा असे प्रकार घडू नयेत यासाठी महापालिका आयुक्त डाॅ. विपीन शर्मा यांनी अशा कामचुकार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा मान्सूनपूर्व आढावा बैठकीत दिला आहे. पावसाळयातील आपत्कालीन परिस्थितीचा सामना समन्वयाने करण्याचे आदेश देत या काळात अधिकाऱ्यांनी मोबाईल बंद ठेवले आणि गैरहजर राहिले तर संबंधितांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

कामचुकार अधिकाऱ्यांमुळे पालिकेच्या कारभारावर टीका

ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये पावसाळ्यात जुन्या धोकादायक तसेच बेकायदा इमारती कोसळण्याचे प्रकार गेल्या काही वर्षांपासून घडत आहेत. या घटनेनंतर ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी पालिकेकडून मदतकार्य करण्यात येते. त्याचबरोबर गेल्या काही वर्षांपासून शहरात अतिवृष्टी होत असून यामुळे नाल्यातील पाणी तुंबून ते आसपासच्या घरांमध्ये शिरते. काही गृहसंकुलांचा परिसर जलमय होत असल्यामुळे रहिवाशांचा घराबाहेर पडण्याचा मार्ग बंद होतो. खाडीकिनारी भागातील घरांमध्ये पाणी शिरते आणि डोंगर भागात जमीन खचून घरांचे नुकसान होते. अशा परिस्थितीत पालिका प्रशासनाकडून नागरिकांना तात्काळ मदतीची अपेक्षा असते. पालिका आपत्ती व्यवस्थापन विभाग, टिडीआरएफ आणि अग्निशमन विभागाची पथके तात्काळ घटनास्थळी पोहचून मदतकार्य करतात. तसेच काही अधिकारीही घटनास्थळी पोहचून मदतकार्य करतात. परंतु काही अधिकारी आणि कर्मचारी मोबाईल बंद ठेवून गैरहजर राहत असल्यामुळे नागरिकांना वेळेवर मदतकार्य मिळत नसल्याचे प्रकार समोर येतात. यामुळे अशा कामचुकार अधिकाऱ्यांमुळे पालिकेच्या कारभारावर टीका होते. नेमकी हीच बाब लक्षात घेऊन आयुक्त डाॅ. विपीन शर्मा यांनी अशा कामचुकार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा मान्सूनपुर्व आढावा बैठकीत दिला आहे.

योग्य नियोजन करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना

ठाणे येथील माजिवाडा भागातील महापालिकेच्या नागरी संशोधन केंद्रामध्ये आयुक्त डाॅ. शर्मा यांनी बुधवारी मान्सूनपुर्व आढावा बैठक त्यामध्ये त्यांनी पावसाळयापूर्वी करावयाच्या सर्व कामांचा तसेच नालेसफाईच्या कामाचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी आणि संजय हेरवाडे यांच्यासह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते. समाज विकास विभाग, ठाणे परिवहन सेवा, अग्निशमन दल, वृक्षप्राधिकरण या विभागांनी पावसाळयाच्या दृष्टीने आवश्यक त्या बाबींचे नियोजन करण्याच्या सूचना डाॅ. शर्मा यांनी बैठकीत दिल्या. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर टीडीआरएफचे पथक सज्ज ठेवावे आणि या पथकाला योग्य ते प्रशिक्षण द्यावे, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथीच्या आजारांना प्रतिबंध करण्यासाठी आरोग्य विभागाने आवश्यक त्या उपाययोजना करण्यासोबतच औषधसाठा उपलब्ध ठेवावा आणि त्याचबरोबर शहरात औषध फवारणी करावी. करोना आणि मंकीपॉक्स आजाराविषयी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात यावी. तसेच भरती ओहोटीचे वेळापत्रक सर्व प्रभाग समितीमध्ये लावण्याच्या सुचनाही त्यांनी सर्व संबंधितांना दिल्या.

र्व प्रभाग समिती कार्यालयात आपत्कालीन कक्षाची स्थापना

येत्या पावसाळ्यात आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी सर्व प्रभाग समिती कार्यालयात आपत्कालीन कक्षाची स्थापना तात्काळ करण्यात यावी. सर्व परिमंडळ उपायुक्त आणि सहाय्यक आयुक्त यांनी सर्तक राहवे, तसेच वृक्षप्राधिकरण विभाग, अग्निशमन विभागांनीही या कक्षाशी समन्वय ठेवावा, अशा सुचना आयुक्त डाॅ. शर्मा यांनी बैठकीत दिल्या. नालेसफाईची कामे पुर्ण झालेली नसलेल्या विभागात पाहणी करावी आणि तेथील नालेसफाईची कामे जलदगतीने पूर्ण करुन घ्यावीत. प्रभाग समितीनिहाय धोकादायक इमारतींची पाहणी करुन त्या रिकाम्या करण्याची कार्यवाही करावी. कळवा, मुंबा, वागळे इस्टेट, लोकमान्यनगर या ठिकाणच्या डोंगराळ भागाची पाहणी करुन या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना पावसाळ्यात सजग राहण्याबाबत सूचना द्याव्यात. तसेच सलग १० ते १२ तास अतिवृष्टी झाल्यास त्या नागरिकांचे स्थलांतर करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याबाबतचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.