विरार :  रविवारपासून कोसळणाऱ्या पावसामुळे भाजी मंडईत शुकशुकाट निर्माण झाला आहे. ग्राहक नसल्याने भाजीपाल्याच्या भावात किलोमागे १० ते १५ रुपयाची घसरण पाहायला मिळाली आहे. केवळ आठवडाभरात भावात दुसऱ्यांदा  घट झाली आहे. याचा नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी मात्र भाजी विक्रेत्यांना मोठा फटका बसत आहे.

जून महिन्यापासून दडी मारून बसलेल्या पावसाने जुलै महिन्याच्या पंधरवडय़ानंतर दमदार आगमन केले आहे. केवळ तीन दिवसात शहरातील सर्व जलस्त्रोत तुडुंब भरून वाहू लागले.  शहरातील अनेक सखल भागात मोठय़ा प्रमाणात पाणी साचून राहिल्याने तीन दिवसापासून अनेक ठिकाणाचे रस्ते पाण्याखाली आहेत. यामुळे नागरिकांना घराबाहेर पडताना अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे भाजी मंडईत गर्दी ओसरू लागली आहे. ग्राहक नसल्याने भाजीविक्रेत्यांना भाजीपाला खराब होऊ नये म्हणून स्वस्तात त्याची विक्री करावी लागत आहे.

विरारमधील घाऊक भाजी विक्रेते सनी मोर्या यांनी सांगितले की,   करोना काळामुळे  वेळेच्या मर्यादा  आहेत. तर दुसरीकडे पावसामुळे शहरात मोठय़ा प्रमाणात पाणी साचले आहे. यात लोक घराबाहेर पडण्यास तयार नाहीत. त्यात नाशिक आणि गुजरात वरून भाजीपाल्याची आवक वाढली आहे. पण किरकोळ विक्रेत्याकडे ग्राहकांची संख्या रोडावल्याने त्याचा परिमाण घाऊक बाजारावर जाणवत आहे. पावसामुळे भाजीपाला लवकर खराब होतो. आपल्याकडील भाजी बाजारामध्ये साठवणूकीची कोणतही सुविधा नाही. यामुळे अनेकांना भाजीपाला फेकून द्यावा लागतो अथवा मिळेल त्या भावात विकावा लागतो, असे त्यांनी सांगितले.