भाईंदर : रस्त्यावर दुचाकी घसरल्याने बसच्या चाकाखाली येऊन दीड वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या प्रकरणी नया नगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
भाईंदरच्या गोल्डन नेस्ट परिसरात रविवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. मिरा-भाईंदर रोडवर दीपक हॉस्पिटलहून भाईंदरच्या दिशेने सोहेल पठाण हे दुचाकीवरून प्रवास करत होते. त्यांच्या मागे मित्र मुस्तकीन सुजरा हा सोहेलचा सव्वा वर्षांचा मुलगा हातात घेऊन बसला होता.
दरम्यान, रस्त्यावर टाकण्यात आलेल्या खडीमुळे दुचाकी घसरली. त्यामुळे मुस्तकीनच्या हातातील मुलगा रस्त्याच्या कडेला फेकला गेला. त्याचवेळी बाजूने जाणाऱ्या बेस्ट बसच्या चाकाखाली तो आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. आता पर्यंत या मार्गांवर मागील वर्षभरात अनेक जणांचा मृत्यू झाला आहे.