वसई : शनिवार रात्रीपासून वसई-विरार परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली असून, रविवारी दिवसभर पावसाचा जोर कायम होता. मुसळधार कोसळणाऱ्या या पावसामुळे शहरातील अनेक सखल भागांत पाणी साचले, परिणामी जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र दिसून आले.
मुसळधार पावसामुळे नालासोपाऱ्यातील गालानगर, संकेश्वर रोड, आचोळे रोड तसेच वसईतील पापडी, वसई रेल्वे स्थानक परिसर आणि माणिकपूर अशा विविध भागांतील रस्त्यांना अक्षरश: नद्यांचे स्वरूप आले होते. साचलेल्या पाण्यातून वाट काढताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागली. अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतुकीचा वेग मंदावला होता. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी वसई-विरार महानगरपालिकेकडून विविध ठिकाणी साचलेले पाणी बाहेर काढण्यासाठी पंपाचा वापर करण्यात आला.
दरम्यान, सततच्या पावसामुळे शहरात विजेचा लपंडाव सुरूच होता. काही भागांमध्ये सलग दोन ते तीन तास वीज नसल्याने, तर काही ठिकाणी अधूनमधून वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला. रविवारची सुट्टी असल्याने अनेकांनी घरातच राहणे पसंत केले. मात्र, आषाढी एकादशीनिमित्त देवदर्शनासाठी बाहेर पडलेल्या भाविकांना पावसामुळे मोठा त्रास सहन करावा लागला.