वसई : वसई विरार शहरात मागील दोन दिवसांपासून मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे वसई पूर्वेतील तानसा नदीवर असलेला पांढरतारा पूल पाण्याखाली गेला आहे. यामुळे येथील आजूबाजूचे गाव व पाड्या वस्त्यांचा संपर्क तुटला असून येथील नागरिकांना आता १० ते १२ किलोमीटर वळसा घालून प्रवास करावा लागत आहे.
वसई पूर्वेतील परिसरात भाताने, नवसई , आडणे, थल्याचापाडा व इतर २० ते २५ पाडे व वस्त्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना ये जा करण्यासाठी तानसा नदीवर पूल तयार करण्यात आला आहे. पुलाची उंची जास्त नसल्याने दरवर्षी पावसाळ्यात हा पूल पाण्याखाली जातो. मागील दोन दिवसांपासून वसईत पावसाने चांगलाच जोर धरला आहे. त्यामुळे तानसा नदीचे पात्र ही दुथडी भरून वाहू लागले आहे. या वाढत्या पाण्याच्या प्रवाहामुळे हे पाणी थेट पांढरतारा पुलाच्या वरून जाण्यास सुरवात झाल्याने यावर्षी तिसऱ्यांदा हा पूल पाण्याखाली गेला आहे.
यामुळे यापुलावरून वाहतूक व प्रवास पूर्ण पणे ठप्प झाला आहे. या आजूबाजूच्या गावासह जवळचा रस्ता म्हणून वज्रेश्वरीच्या दिशेने जाणारे नागरिक ही याच मार्गाचा वापर करतात. आता पुलावरच पाणी आल्याने येथील आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांना १० ते१२ किलोमीटरचा वळसा घालून प्रवास करावा लागणार असल्याचे येथील नागरीकांनी सांगितले आहे. दुथडी भरून वाहणारी तानसा नदी किनारा सोडून वाहू लागली होती.यामुळे तानसा खाडी वरील खानिवडे बांधारा हा सुद्धा पाण्याखाली आला होता . चांदीप, नवसई ,शिवणसई, पारोळ , शिरवली , खानिवडे, कोपर भागातील नदी किनाऱ्यावरील शेतांमध्ये पाणी घुसले असल्याचे येथील शेतकऱ्यांनी सांगितले आहे.