वसई: महामार्गावर रस्ते ओलांडून प्रवास करताना अपघाताच्या घटना घडतात. अशा घटना रोखण्यासाठी मुंबई अहमदाबाद महामार्गावरील दहा ठिकाणी पादचारी पूल तयार केले जाणार आहेत. त्याच्या कामाला विरार येथून सुरुवात झाली असून टप्प्याटप्प्याने इतर पुलाचे काम सुरू केले जाणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई, ठाणे, वसई विरार, मीरा भाईंदर, पालघर यासह गुजरातला जोडणारा मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग गेला आहे. या महामार्गालगतच अनेक छोटे मोठे गाव पाडे आहेत. या भागातील नागरिकांना दळणवळण करण्यासाठी महामार्गाचा वापर करावा लागतो तर काही वेळा धोकादायक पद्धतीने महामार्ग ओलांडून प्रवास करावा लागतो. अशा वेळी अनेकदा अपघाताच्या घटना समोर येत असतात. यापूर्वीसुद्धा रस्ते ओलांडून प्रवास करताना अनेक घटना घडल्या आहेत. काही जणांचा मृत्यू झाला आहे.

हेही वाचा – वसई विरारचा पाणी प्रश्न खरंच सुटलाय का?

या महामार्गावर मागील काही वर्षांपासून वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे रस्ते ओलांडून प्रवास करणे अधिकच धोकादायक बनले आहे. यासाठी ज्या ठिकाणी गाव पाडे आहेत त्यांना दोन्ही बाजूने ये जा करण्यासाठी पादचारी उड्डाणपूल तयार करण्यात यावा अशी मागणी करण्यात येत होती. यासाठी पालघर जिल्ह्याचे खासदार राजेंद्र गावित यांनी पाठपुरावा केला होता. अखेर आता महामार्ग प्राधिकरणातर्फे वर्सोवा पुलापासून ते पालघरच्या अच्छाडपर्यंत दहा ठिकाणी पादचारी पूल तयार करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. यात विरार बावखळ टोकरेपाडा, वंगणपाडा नालासोपारा, शिवेचापाडा, कोल्ही चिंचोटी, ससूपाडा, अच्छाड, जव्हार फाटा, दुर्वेस व अन्य दोन ठिकाणे यांचा समावेश आहे. यासाठी सुमारे ६९ कोटी रुपये इतका निधी खर्च केला जाणार आहे.

हे पूल मुख्य रस्त्यापासून साडेपाच मीटर उंचीवर असणार आहेत. या कामाची सुरुवात विरार बावखल येथून करण्यात येत आहे. शनिवारी पालघर जिल्ह्याचे खासदार राजेंद्र गावित यांच्या हस्ते भूमिपूजन करून काम सुरू करण्यात आले आहे. टप्प्याटप्प्याने इतर ठिकाणी असलेले पादचारी उड्डाण पूल तयार  केले जाणार आहेत, अशी माहिती खासदार राजेंद्र गावित यांनी दिली आहे.

हेही वाचा – भाईंदर : दुकानावरील इंग्रजी पाट्यांवर मनसे फासले काळे

महामार्गालगतच्या नागरिकांना धोकादायक प्रवास करताना अडचणी येत होत्या. याशिवाय अपघात घडत होते. यासाठी पादचारी पूल आवश्यक होते. आता प्राधिकरणामार्फत हे पूल तयार करवून घेत आहोत याचा नागरिकांना चांगला फायदा होईल. – राजेंद्र गावित, खासदार पालघर

अपघाताचे प्रमाण कमी होण्यास मदत

राष्ट्रीय महामार्ग असल्याने अनेकदा वाहने ही भरधाव वेगाने येतात. अशा वेळी रस्ते ओलांडून प्रवास करताना दोन्ही बाजूने रस्ता ओलांडून जाताना अडचणी येत होत्या. तर काही वेळा वाहने अधिक भरधाव वेगाने असल्याने प्रवाशांना वाहनांची धडक लागून अपघात घडले आहेत. जर पादचारी पूल तयार झाले तर रस्ते ओलांडून जाण्याचा प्रश्न मिटेल व नागरिकांनासुद्धा याचा फायदा होऊन अपघात होण्याचे प्रमाण कमी होणार आहे.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pedestrian bridges at ten places on mumbai ahmedabad highway accidents across roads will stop ssb
First published on: 03-12-2023 at 18:02 IST