लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

वसई : वसईच्या अग्रवाल सिटी येथील मंयक ज्वेलर्सवर शुक्रवारी रात्री सशस्त्र दरोडा घालण्यात आला. दोन अज्ञात हल्लेखोरांनी बंदूकीच्या सहाय्याने सराफ दुकानाचे मालक रतनलाल संघवी यांना बेदम मारहाण करत दुकानातील लाखो रुपयांचे दागिने घेऊन पळ काढला आहे. माणिकपूर पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी पथके स्थापन केली आहे. या घटनेमुळे दोन वर्षांपूर्वी साक्षी ज्वेलर्सच्या लुटीच्या घटना ताज्या झाल्या आहेत.

वसई पश्चिमेच्या बाभोळा येथील अग्रवाल दोशी कॉम्प्लेक्समध्ये मयंक ज्वेलर्स हे दुकान आहे. या दुकानात मालक रतनलाल संघवी (६७) आणि त्यांचा मुलगा मनिष संघवी हे असतात. शुक्रवारी मनिष संघवी कामानिमित्ताने बाहेर गेला होता. रात्री सव्वा नऊच्या सुमारास रतनलाल संघवी दुकान बंद करण्याच्या तयारीत होते. ते दागिने असलेले ट्रे कपाटात ठेवत होते. त्यावेळी दोन सशस्त्र हल्लेखोर दुकानात शिरले. दुकानात शिरताच त्यांनी संघवी यांच्यावर हल्ला केला. त्यांनी बंदुकीच्या दट्टयाने संघवी यांना मारहाण करण्यास सुरवात केली. संघवी यांन आतल्या खोलीत डांबले आणि दागिन्यांचा ट्रे घेऊन पसार झाले. हल्लेखोरांपैकी एकाने डोक्यात हेल्मेट घातले होते तर दुसर्‍याने मुखपट्टी (मास्क) लावून चेहरा झाकला होता. या हल्ल्यात संघवी प्रचंड जखमी झाले आहे. मात्र आता त्यांची परिस्थितीत आता स्थिर आहे. या लुटीच्या घटनेमुळे परिसरातील सराफमालक आणि दुकानदारांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे. परिसरात पोलीस चौकी उभारावी अशी मागणी परिसरातील दुकानदारांनी केली आहे.

आणखी वाचा-सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी होणार, अनधिकृत बांधकामांना पाणी न देण्याचा पालिकेचा निर्णय

दोघे हल्लेखोर अचानक सराफ दुकानत शिरले आणि त्यांनी बंदूकसदृश्य वस्तूने संघवी यांना मारहाण करत लुट केली, अशी माहिती पोलीस उपायुक्ता (परिमंडळ २) पूर्णिमा चौगुले-श्रींगी यांनी दिली. या लुटीत आणखी आरोपी असू शकतील. आम्ही सर्व ६ पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथकांमार्फत तपास करत आहोत, असेही त्यांनी सांगितले. हल्ल्यापूर्वी रेकी केली असण्याची शक्यता आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

साक्षी ज्वेलर्सच्या आठवणीच्या ताज्या

या सशस्त्र हल्ल्यामुळे ३ वर्षांपूर्वी नालासोपारा येथील साक्षी ज्वेलर्सवर पडलेल्या दरोड्याची घटना ताजी झाली आहे. नालासोपा पश्चिमेला रेल्वे स्थानकाजवळ किशोर जैन (४८) यांच्या मालकीचे साक्षी ज्वेलर्स हे दुकान होते २१ ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी दोन इसमांनी दुकानात शिरून जैन यांची हत्या करून दुकानातील लाखो रुपयांच्या चांदीचे दागिने लुटून नेले होते.