scorecardresearch

सागरी किनाऱ्यावर रेतीमाफियांचा धुडगूस

वसईतील सागरी किनारे पर्यटकांसाठी धोकादायक ठरत चालले आहेत.

बेकायदा रेती उपशाने पर्यटकांचा जीव धोक्यात

विरार :  वसईतील सागरी किनारे पर्यटकांसाठी धोकादायक ठरत चालले आहेत. सागरी किनाऱ्यावर होत असलेल्या बेकायदा रेती उपशाने सागरी किनारे धोकादायक होत चालले आहेत. तहसील आणि पोलीस प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे रेतीमाफिया दररोज शेकडो टन बेकायदा रेती उपसा करत आहेत. यामुळे किनारे खचले जाऊन पर्यटकांचा जीव धोक्यात येत आहे. कोणतीही भीती न बाळगता रेतीमाफिया रात्रीच्यावेळी सागरी किनाऱ्यावर मोठय़ा प्रमाणात रेतीची चोरी करत आहेत. अर्नाळा ते भुईगाव या संपूर्ण किनाऱ्यावर मध्यरात्रीनंतर ही चोरी सुरू होत असून पहाटेपर्यंत चालत असते. रात्र असल्याने त्यांना कोणीही अडवत नाही. यामुळे शेकडो टन रेतीची दररोज चोरी केली जात.  या संदर्भात पोलिसांनी माहिती दिली की, स्थानिक नागरिक असल्याने अनेकवेळा कारवाईत अडचणी येतात. तर तहसील विभागाने मात्र कारवाईस गेल्यास कुणी सापडत नसल्याचे सांगितले. पण स्थानिकांच्या मते दररोज हे रेतीमाफिया किनाऱ्यावरील रेती चोरून नेत आहेत.  

मुंबई आणि आसपासच्या उपनगरातून दररोज हजारो पर्यटक या याठिकाणी विरंगुळा म्हणून येत असतात. पण अनेक वेळा सागरात उतरण्याच्या नादात आपल्या जिवाला मुकतात. याचे मोठे कारण म्हणजे रेती माफियांनी रेती चोरताना केलेले खड्डे भरतीच्या वेळी   पाणी जावून भवरे निर्माण होतात. आणि अशा वेळी एखाद्या पर्यटकाला अंदाज नाही आल्यास त्याला जलसमाधी मिळते. अशा अनेक घटना नियमित घडत आहेत. कोणतीही सुरक्षा नाहीत. पोलिसांची गस्त ही केवळ दिखाव्यापुरती असल्याचे नागरिकांनी सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार सद्या इतर भागात रेती उत्खनन बंद असल्याने रेती माफियांनी आपला मोर्चा सागरी किनाऱ्याकडे वळवला आहे. त्यात सागरी किनाऱ्यावरील रेतीला अधिक मागणी आणि किंमत असल्याने रेती माफिया हप्ते बांधत आपले काम साधून घेत आहेत. या बाबत स्थानिकांनी पोलीस आणि तहसील विभाग यांच्याकडे तक्रारी केल्या आहेत. पण अद्यापही ठोस कारवाई झाली नाही.  यामुळे पर्यटकांच्या जिवाला मोठा धोका निर्माण झाला आहे.

त्याचबरोबर बेसुमार रेती उपसा झाल्याने किनारे खचले जात आहेत. वादळ आणि नैसगिक आपत्तीच्या वेळी समुद्राचे पाणी स्थानिकांच्या घरात जात आहे. यामुळे किनाऱ्यावरील सुरूच्या झाडांची मोठी हानी झाली आहे. सागरी किनाऱ्याची धूप होत असल्याने येथील नैसगिक सौंदर्य नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.

पद्धतशीर चोरी

किनाऱ्यावरील रेती चोरीत काही स्थानिकांचा सहभाग  असल्याचे सांगितले जाते. स्थानिकांना हाताशी धरून पोलीस आणि तहसील विभाग यांच्यावर पाळत ठेवली जाते. मध्यरात्री २ ते ३ च्या सुमारास ही चोरी सुरू होऊन, छोटय़ा टिपर वाहनाने मुख्य रस्त्यावर असलेल्या मोठय़ा वाहनाने आणली जाते. आणि नंतर मोठी वाहने भरून विक्रीसाठी पाठविली जातात. यात सर्वाचे आर्थिक हेतू जोपासले जात आहेत.

मराठीतील सर्व वसई विरार ( Vasaivirar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sand mafia beach illegal endangers lives tourists ysh

ताज्या बातम्या