भाईंदर :- राज्य सरकारने दिवाळीपर्यंत दहिसर पथकर नाका स्थलांतरित करण्याची दिलेली मुदत संपल्यानंतर, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पुन्हा या पथकर नाक्याची पाहणी केली. यावेळी त्यांनी ८ नोव्हेंबरपर्यंत पथकर नाका स्थलांतरित करण्यात येईल, असा दावा केला आहे.
मुंबईच्या वेशीवरील दहिसर पथकर नाक्यामुळे वाहतूक कोंडीची तीव्र समस्या निर्माण होत आहे. या समस्येचा फटका मुंबई, मिरा-भाईंदर, वसई-विरार आणि ठाणे या दिशेने प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना बसतो. त्यामुळे ही समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी दिवाळीपूर्वी पथकर नाका वसई-विरारच्या दिशेने हलविण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी तीन महिन्यांपूर्वी केली होती.
या घोषणेनंतर प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, प्रत्यक्षात दिवाळी तोंडावर आली असतानाही पथकर नाका स्थलांतरित करण्याबाबत कोणतीही ठोस हालचाल दिसून आली नाही. त्यामुळे लोकप्रतिनिधींच्या आश्वासनावर नागरिकांनी समाजमाध्यमांवर संताप व्यक्त केला आहे.
दरम्यान, नुकतेच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दहिसर पथकर नाक्याची पुन्हा पाहणी केली. यावेळी त्यांनी स्थलांतर प्रक्रिया सुरू झाली असून येत्या ८ नोव्हेंबरपर्यंत पथकर नाका हलविण्यात येईल, असा दावा केला आहे.
मात्र जागा अद्यापही अनिश्चित
दहिसर पथकर नाका वसई-विरार मार्गावरील वर्सोवा खाडी पुलापुढे स्थलांतरित करण्याच्या सूचना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. मात्र, हा पथकर नाका या मार्गावर हलवल्यास भविष्यात वाहतूक कोंडीसह अनेक समस्या उद्भवतील, असा आक्षेप स्थानिक ग्रामस्थांकडून नोंदविण्यात आला आहे.तसेच भाजपचे वरिष्ठ नेते आणि वनमंत्री गणेश नाईक यांनीही ही जागा वनविभागाच्या मालकीची असल्याने येथे पथकर नाका उभारण्यास परवानगी दिली जाणार नाही, अशी भूमिका घेतली आहे.त्यामुळे ८ नोव्हेंबर रोजी हा पथकर नाका नेमका कुठे स्थलांतरित होणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, जागा निश्चित करण्याचा निर्णय अद्याप प्रलंबित आहे, अशी माहिती मिरा-भाईंदर, वसई-विरार वाहतूक शाखेकडून देण्यात आली आहे.