मी माहेरची अस्सल मुंबईकर. म्हणजे आम्हाला गाव नाही. कोकणचे निसर्गसौंदर्य वगैरे, गावच्या गोष्टी या सर्व कथा-कादंबऱ्यांमधून वाचलेल्या किंवा मैत्रिणीक डून ऐकलेल्या. आमचे बालपण गिरगावात गेले. तिथे मोठा समुद्रकिनारा आम्हाला अनुभवायला मिळाला. समुद्राचा भरपूर वारा आम्हाला मिळायचा, पण झाडाझुडपाच्या बाबतीत आणि हिरव्यागार वनश्रीच्या बाबतीत मात्र आम्ही कमनशिबी होतो. फक्त पुणे-मुंबई डेक्कन क्वीनच्या प्रवासात घाटात जे सौंदर्य दिसायचे तीच आम्हाला परवनी होती.
लग्न झाल्यानंतर १९८२ साली मी प्रथम सासरच्या गावाला गेले. जाई-जाईपर्यंत रात्र झाली. त्यामुळे घर काय नीट बघता आले नव्हते. सकाळी उठून बघते तर दारांत फुलांचा सडा. मी अक्षरश: मंत्रमुग्ध होऊन सगळीकडे बघत राहिले. घरात पुढे मोठे अंगण होते. अंगणात सुंदर रांगोळी काढली होती. समोर स्वागतासाठी मोठे तुळशी वृंदावन होते. पुढे मळा, त्यात कितीतरी भाज्या लावलेल्या दिसल्या. मी टोपली घेऊन पटापटा वांगी, मिरच्या, शेंगा, घेवडा काय मिळेल ते तोडून घेतल्या. तेथून डाव्या बाजूला बघितले तर गोठा. त्यात कपिला, पारू या गाई आणि म्हैस होती. तिथून मी फिरत फिरत पुढे गेले, तर काय? सात-आठ प्रकारची जास्वंदं, जाई-जुई, मोगरा, गुलाब, कवठी चाफा, सोनचाफा यांनी बाग नुसती बहरलेली होती. मागच्या बाजूला परसदारी केळीची बाग, त्याच्या बाजूला घट्ट रोवलेल्या जात्यावर पीठ दळणारी त्यांची बाई, समोर विहीर, विहिरीवर रहाटगाडे, पुढे माडाचे बन, त्यातून घोंगावणारा वारा, बाजूला आंब्याची बागही होती. मी तीन/ चार वेळा नुसत्या घरालाच फेऱ्या मारल्या हेच तर ते ‘खेडय़ामधले घर कौलारू’ किती बघू आणि डोळय़ांत साठवू असे मला झाले होते.
जमीन शेणाने सारवलेली होती. अंगण, माजघर, अडगळीची खोली, स्वयंपाकघर असे भले मोठे हे घर आहे, त्याचे भले मोठे वासे आजही शाबूत आहेत. आंब्यांची झाडे, काही-काही तर हाताशी आंबे येतील एवढी छोटी कलमे. मी तर अक्षरश: हरवून गेले. मोकळा श्वास म्हणतात तो हाच हे मला जाणवले. मी प्रथमच तिथे गावच्या घरच्या तांदळाच्या जात्यावर दळलेल्या, चुलीत भाजलेल्या खरपूस भाकऱ्या आणि घरच्याच वांग्याचे भरीत खाल्ले. त्या वेळेस तिथे मी शेणात हात घालून प्रथमच जमीन सारवून बघितली, जात्यावर दळून बघितले, विहिरीतून पाणी काढले. झाडांना पाणी घातले, भाजी तोडली. ही सर्व कामे करण्यात एक वेगळाच आनंद प्रथमच घेतला. या सर्व गोष्टी आजही तिथे शाबूत आहेत. आजही तिथे जात्यावर दळले जाते, चुलीवरच्या खरपूस भाकऱ्या मिळतात. घरच्या गाईचे दूध आहे. देव्हारा घरच्या फुलांनी भरगच्च भरलेला असतो. केळीच्या पानांवर नैवेद्य दाखवला जातो. जेवणंही केळीच्या पानावर होतात. विहिरीचे पाणी प्यावयास मिळते. शहरीकरणापासून आजही दूर असल्यामुळे निसर्ग भरभरून खुललेला आहे. प्रदूषण तर नावालाही नाही. अंगणात आजही चंद्राचा प्रकाश झिरपतो. माडांची सळसळ अंगावर शहारे आणते.
भाज्यांच्या मळय़ाची माकडांनी नासधूस करून टाकली आहे. सोयीसाठी म्हणून आता घरात टी.व्ही, फ्रिज, मोबाइल वगैरे आले. त्यामुळे आता तिकडचे वास्तव्य जास्तच सोयीस्कर व सुलभ झाले आहे.
घरच्यांचे अगत्याने बोलावणे आल्यानंतर आदर करणे, साधेच पण घरगुती रुचकर जेवण या सर्व गोष्टींसाठी आम्हाला ते घर आवडते.
संग्रहित लेख, दिनांक 9th Nov 2013 रोजी प्रकाशित
घर कौलारू
मी माहेरची अस्सल मुंबईकर. म्हणजे आम्हाला गाव नाही. कोकणचे निसर्गसौंदर्य वगैरे, गावच्या गोष्टी या सर्व कथा-कादंबऱ्यांमधून वाचलेल्या किंवा मैत्रिणीक डून ऐकलेल्या. आमचे बालपण गिरगावात गेले.
First published on: 09-11-2013 at 01:02 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Old house