माझे वाड-वडील शंभर वर्षांपूर्वी मुंबईत आले, ते ठाकूरद्वारच्या झावबावाडीत बिऱ्हाडकर म्हणून राहिले होते. वडिलांचा संसार वाढला आणि दुसरे निवासस्थान शोधणे आवश्यक होते. गिरगाव-ठाकूरद्वार तर गच्च भरले होते. केवळ माणसांनीच नाही तर एकमेकींना भिडलेल्या चाळींनीही! मध्यमवर्गीय नोकरदारांची कार्यालये मुख्यत: फोर्ट भागात होती. तेव्हा लांब वाटत असलेल्या दादर-माटुंग्यासारख्या उपनगरात जाण्याचीसुद्धा त्यांची मानसिकता नव्हती. ग्रँटरोड स्टेशनच्या पश्चिमेला पाच मिनिटांवर शास्त्री हॉल नावाची मध्यमवर्गीय मराठी मंडळींची चाळवस्ती उभी राहिली होती. त्यात एक नवीन चाळ बांधली जातेय असा सुगावा वडिलांना लागला आणि ती बांधून झाल्या झाल्या पहिल्या मजल्यावर दोन खोल्यांचा एक गाळा त्यांनी भाडय़ाने घेतला. चाळीचे नाव होते ‘राधाबाई चाळ’. त्या वेळेस या गिरगावचे उपनगर मानल्या गेलेल्या नव्या वसाहतीत, ‘जागा भाडय़ाने देणे आहे’ अशा पाटय़ा झळकत. मालकांना सभ्य कुटुंबांना जागा द्यायचीच असे. १९३३ साली या नव्याकोऱ्या राधा चाळीत आम्ही वास्तव्याला आलो तेव्हापासून आमची तिसरी पिढीही येथेच मजेत राहत आहे.
राधा चाळ चार मजल्यांची. १९३२ मध्ये उभारलेल्या या चाळीच्या उभारणीला केवळ दहा लाख रुपये खर्च आला होता. आज या रकमेत या भागात एक खोलीसुद्धा मिळणार नाही. त्या काळी घरबांधणीत सीमेंट काँक्रीटचा वापर झाला नव्हता. त्यामुळे चाळ विटा आणि घाणीच्या चुन्याने बांधलेली दिसते. खोल्यांची दारे-खिडक्या, गॅलरीचे गज हे अस्सल सागवानी लाकडाचे. त्यामुळे आठ दशकांनंतरही ते कधी फुगले नाहीत. जमीन शहाबादी फरशीची. तीही अजून तितकीच दणकट. या चाळीची बांधणी मोठी वैशिष्टय़पूर्ण. वर-खाली जाण्याचा जिना चाळीच्या मध्यावर. जिन्याच्या दोन्ही बाजूंना चार चार डबलरूम्स. सर्व घरांमध्ये ये-जा करण्यासाठी एक कॉमन गॅलरी, पण तीसुद्धा इतर चाळींमध्ये अभावानेच असलेली, आठ फूट रुंद. मालकाची अनुमती नसली तरी कधी हरकतही नसल्यामुळे प्रत्येक बिऱ्हाडासमोर एक लाकडी पेटी. इंधनासाठीचे कोळसे आणि इतर सटरफटर सामान ठेवण्यासाठी त्याचा सामान्यत: उपयोग. तर चांगल्या रुंदीमुळे रात्री एखाद्या तरुण मुलाला तात्पुरती बेडरूम- ओपन टू स्काय. सार्वजनिक नळ आणि शौचालये एका टोकाला. ती जागासुद्धा प्रशस्त. या स्वच्छता गच्चीमध्ये, दोन बाजूंना दोन मोठ्ठाले पत्थर. त्याचा उपयोग कपडे आपटून धुण्यासाठी, धोबीघाटावर असतात तसे. या स्वच्छता ब्लॉकच्या टोकाला एक बंदिस्त बाथरूम. हे कशासाठी? ऐकून आजची पिढी नाक मुरडेल. त्याकाळी स्त्रिया ‘पीरियड’मध्ये कुटुंबीयांमध्ये मिसळत नसत. त्या तीन दिवसांत त्यांना वापरण्यासाठी ही बाथरूम. तेथे बसविलेल्या दोन नळांना सुरुवातीच्या काळात चोवीस तास पाण्याचा प्रवाह. पुढे वेळ कमी कमी होत गेला. चाळीच्या मध्यावर जिन्यासमोर एक काहीसा पुढे गेलेला चौक. याचा उपयोग चाळकऱ्यांना उभे राहून गप्पाष्टक जमविण्यासाठी. त्या चौकाच्या मध्यावर एक चौकोनी पत्थर. उखळ-मुसळ वा खलबत्ता वापरून काही पदार्थ कुटायचे असल्यास ते घरात न करता येथे या दगडावर कुटावे ही अपेक्षा. घरातल्या लादीची घेतलेली अशीही काळजी.
या चाळीची आणखी दोन वैशिष्टय़े- सहसा इतरत्र नसणारी. एका मजल्यावरील सर्व गाळे, भिंतीतील एका अतिरिक्त दरवाजाने एकमेकांना जोडलेले. उद्देश हा की कोठल्याही घरात लहानमोठे कार्य असेल तर मजल्यावरील सर्वानी ते एकत्र कुटुंबासारखे साजरे करावेत. जुन्या काळातील चाळ वास्तव्यातील हा अनोखा एकोपा. काहीशा उच्च मध्यमवर्गीयांनासुद्धा अशा सामूहिक वातावरणात वास्तव्य आवडत असे. अशांसाठी राधाबाई चाळीच्या पश्चिम बाजूस दोन-दोन वन बीएचकेचे सेमी सेल्फ कण्टेंड, ब्लॉक्स. यात प्रवेश मात्र कॉमन गॅलरीतूनच. त्यामुळे रहिवासी ब्लॉकमध्ये, पण वस्ती चाळीतच ही भावना. त्यांनाही आवडणारी. इतर गाळ्यामधील रहिवासी शासकीय वा तत्सम सेवेतील तर या सेमीब्लॉकमध्ये डॉक्टर, प्राध्यापक, वकील अशी नामांकित मंडळी. तरीही सर्व एकोप्याने रहात.
राधाबाई चाळीला सत्तर वर्षे झाली आणि तिच्या दुरुस्तीची वेळ आली. १९४० पूर्वी उभारलेली म्हणून सेस इमारत. यामुळे दुरुस्तीची जबाबदारी म्हाडाची. दुरुस्तीदरम्यान, हवे असेल तर भाडेकरूंना उच्च दर्जा मटेरिअल वापरण्याची मुभा. त्यासाठी भाडेकरूंनी एकत्र येऊन निधी उभारला, त्यात आमदार निधीची भर पडली आणि उत्कृष्ट मटेरिअलसह दुरुस्त झालेल्या राधा चाळीचे आयुष्य आणखी ५० वर्षे वाढले आहे. महापालिकेच्या नव्या सवलतीनुसार ज्येष्ठांना घरातच कमोड-शौचालय बसविण्याची अनुमती मिळाली. त्याचा फायदा जवळजवळ सर्व भाडेकरूंनी घेतला. मालकांच्या सहकार्यामुळे आता टाकीतून पाणीपुरवठा अखंड झाला आहे. वसाहतीसमोरील रस्ता रुंदीकरण निघाले आणि त्यात पूर्वेकडील अर्धी चाळ पाडण्यात आली. त्या चार-चार घरांना सामावण्यासाठी चाळीवर एक मजला उभारला गेला. काही जुन्या शेजाऱ्यांना आम्ही दुरावलो, पण ते काही मजले उंचावर वास्तव्याला होतेच की!
जुन्या चाळी पुनर्विकासात टॉवरला जागा करून देत असताना ती पाळी आमच्यावर येणार का अशी शंका आली, पण आता आयुष्य ५० वर्षांनी वाढलेले आणि कॉमन गॅलरी असली तरी प्रत्येक घर हे फ्लॅटसमान झाल्यामुळे आम्ही तो विचार झटकला आहे. ‘आहे त्यात काय वाईट आहे?’ हा विचार बळावला आणि आठ दशकांहून आमचे वास्तव्य असलेली राधाबाई चाळ शताब्दीकडे वाटचाल करू लागली.
मधुसूदन फाटक