News Flash

चौरंगी, पंचरंगी लढतींमुळे सर्वच पक्षांची कसोटी

चंद्रपूर आणि यवतमाळ अशा दोन जिल्ह्य़ांत विभागल्या गेलेल्या या लोकसभा मतदारसंघात लोकसभेच्या वेळी भाजपने सहाही विधानसभा मतदारसंघांत निर्विवाद आघाडी घेत दोन लाखांच्या मताधिक्याने विजय मिळवला.

| September 27, 2014 03:15 am

चंद्रपूर आणि यवतमाळ अशा दोन जिल्ह्य़ांत विभागल्या गेलेल्या या लोकसभा मतदारसंघात लोकसभेच्या वेळी भाजपने सहाही विधानसभा मतदारसंघांत निर्विवाद आघाडी घेत दोन लाखांच्या मताधिक्याने विजय मिळवला. हा विजय काँग्रेसच्या तोंडचे पाणी पळवणारा ठरला. मात्र, आता भाजप-शिवसेना युती व काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी तुटल्यामुळे सहाही विधानसभा मतदारसंघांत कुठे चौरंगी, तर कुठे पंचरंगी निवडणूक होत असून सर्वच पक्षांची बदललेल्या स्थितीत कसोटी
लागणार आहे.
आर्णी, वणी, वरोरा, चंद्रपूर, बल्लारपूर व राजुरा या सहापैकी चार ठिकाणी काँग्रेसचे आमदार असतानासुद्धा भाजपने मोठे मताधिक्य घेतले. यामुळे शिवाजीराव मोघे व संजय देवतळे या दोन मंत्र्यांचे भवितव्य धोक्यात आहे. प्रस्थापित नेत्यांना पुन्हा मैदानात उतरवायचे की नव्या चेहऱ्यांना संधी द्यायची, हा या वेळी काँग्रेसपुढील मोठा पेच आहे. या वेळी पुन्हा मोदी लाट चालली नाही तरीही जनतेच्या मनात आघाडी सरकारविषयी रोष असल्याने काँग्रेस व राष्ट्रवादीचे अवसान गळाल्याचे चित्र आहे. युती असताना वरोरा, वणी व राजुरा या तीन जागा लढवणाऱ्या शिवसेनेला आता वरोरा मतदारसंघ वगळता वणी व राजुरा येथे उमेदवार शोधावा लागत आहे. मनसे व राष्ट्रवादीला या मतदारसंघात फारशी संधी नाही. या सहाही मतदारसंघांत भाजपला काँग्रेसचे आव्हान असणार आहे. भाजपला लोकसभेतील विजयाची परंपरा राखण्यासाठी कष्ट
करावे लागतील.
आर्णी
आदिवासीबहुल या राखीव मतदारसंघात सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांचे वर्चस्व होते. मात्र, लोकसभेत भाजप-सेना युतीचे हंसराज अहीर यांना ६० हजारांचे मताधिक्य मिळाले. आता युती व आघाडीत बिघाडी झाल्याने काँग्रेसने मोघेंऐवजी पर्याय शोधण्यास सुरुवात केली आहे. या मतदारसंघात बंजारा मते कुणाकडे जातात, यावर बरेच काही अवलंबून आहे. भाजप संदीप अथवा मिलिंद धुर्वे यापैकी एकाचे नाव ठरवेल, असे चित्र आहे, तर शिवसेना व राष्ट्रवादीवर येथे शेवटच्या क्षणी उमेदवार शोधण्याची वेळ आली आहे.  
वणी
लोकसभेत ५० हजार मतांनी पिछाडीवर गेल्यानंतर काँग्रेसचे आमदार वामनराव कासावार यांनी जाहीरपणे निवृत्तीची भाषा सुरू केली होती, परंतु काँग्रेसने पहिल्याच यादीत त्यांचे नाव जाहीर करून पुन्हा त्यांना संधी दिली आहे. राष्ट्रवादी उमेदवारांचा शोध घेत आहे. कोळसा खाणी, प्रदूषण व प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांचा वणीला विळखा पडला आहे. विश्वास नांदेकर व संजय देरकर यापैकी कुणाची निवड शिवसेना करते, याविषयी उत्सुकता आहे. शिवसेना ज्याला उमेदवारी देणार नाही त्याच्या गळ्यात भाजपच्या उमेदवारीची माळ पडणार आहे.
राजुरा
लोकसभेत आश्चर्यकारकपणे १४ हजारांचे मताधिक्य घेणाऱ्या या जागेसाठी भाजप व सेनेजवळ प्रबळ उमेदवारच नाही. त्यामुळे काँग्रेसचे आमदार सुभाष धोटे यांना दिलासा मिळाला असला तरी शेतकरी संघटनेचे नेते वामनराव चटप काय करतात, याकडेही साऱ्यांचे लक्ष आहे. संघटनेने प्रभाकर दिवे यांना उमेदवारी दिली आहे. येथे काँग्रेसला राष्ट्रवादीचे सुदर्शन निमकर यांच्या उमेदवारीचा फटका बसण्याची शक्यता आहे. हा मतदारसंघ भाजप सेनेकडून हस्तगत करेल, असे सध्याचे चित्र आहे.
बल्लाळपूर
भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांच्यासाठी अनुकूल असलेल्या या मतदारसंघात काही ठिकाणी प्रदूषण, तर काही ठिकाणी रोजगाराची वानवा, अशी स्थिती आहे. येथेही काँग्रेसजवळ मुनगंटीवारांना
लढत देईल असा तगडा उमेदवार नाही. उमेदवारीच्या मुद्दय़ावरून गटातटात विभागली गेलेली काँग्रेस व इतर पक्षांचे नगण्य अस्तित्व यामुळे भाजपचे मताधिक्य किती वाढेल,
एवढीच उत्सुकता आता या मतदारसंघात राहिली आहे.
वरोरा
लोकसभेत सपाटून मार खाल्ल्यावरही राज्याचे पर्यावरणमंत्री संजय देवतळे पाचव्यांदा नशीब अजमावत आहेत. त्यांना त्यांचे चुलत बंधू व मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपाध्यक्ष डॉ. विजय देवतळेंनीच आव्हान उभे केले आहे. काँग्रेसने उमेदवारी दिली तर पक्षाकडून अन्यथा, अपक्ष राहण्याची तयारी त्यांनी केली आहे. कुणबीबहुल असलेल्या या मतदारसंघात भाजपने लोकसभेत आघाडी घेतली, तरी ही जागा सेनेकडे होती. मात्र, आता युतीत बिघाडी झाल्याने भाजपने येथे मांडवकर यांना ऐनवेळी उमेदवारी दिली आहे. गेल्या वेळी तीन हजार मतांनी पराभूत झालेले सेनेचे जिल्हा प्रमुख बाळा धानोरकर या वेळी विजयासाठी आतुर असले तरी नाराज भाजप नेते सारी ताकद मांडवकर यांच्या पाठीमागे लावतील. मनसेने येथे डॉ. अनिल बुजोणे यांना उमेदवारी दिली आहे.
चंद्रपूर
लोकसभेत ५० हजारांची आघाडी घेतल्याने भाजपचे आमदार नाना शामकुळे निश्चिंत असले तरी पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी, ‘नागपूरचे पार्सल परत पाठवा,’ असा धोशा लावल्याने येथे भाजपसमोर डोकेदुखी निर्माण झाली आहे. या एकमेव शहरी मतदारसंघात काँग्रेसजवळ प्रभावी उमेदवारच नाही. अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या या जागेवर काँग्रेसही बाहेरचा उमेदवार लादू शकते. युती व आघाडी तुटल्यामुळे आता शिवसेनेकडून भाजपचे महामंत्री किशोर जोरगेवार यांची, तर राष्ट्रवादीकडून काँग्रेसचे नगरसेवक अशोक नागापुरे यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 27, 2014 3:15 am

Web Title: four or five fold fights in chandrapur assembly polls
Next Stories
1 काँग्रेस-राष्ट्रवादीसाठी अवघड स्थिती
2 नवी संस्कृती
3 ‘आप’मतदार जागृती करणार!
Just Now!
X