19 January 2021

News Flash

विज्ञान-तंत्रज्ञान : आपला वारसा

यानंतर सुमारे हजार-दीड हजार वर्षे भारतात विज्ञान व तंत्रज्ञान यांची विलक्षण प्रगती झाली.

विज्ञान-तंत्रज्ञान (प्रतिनिधिक छायाचित्र)

रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ 

भारतात विज्ञान व तंत्रज्ञान यांची विलक्षण प्रगती झाली. आपल्याला या वारशाचा अभिमान असेल, तर आपण सबबी न सांगता तो का व कसा लुप्त झाला हे शोधून त्याची आजच्या काळाशी कशी सांगड घालायची, या प्रश्नांना भिडले पाहिजे.

विज्ञान-तंत्रज्ञानाच्या संदर्भात आपल्या इतिहासाचे अतिशय स्पष्ट भाग पडतात. इ. स.पूर्व सुमारे ३००० पासून इ. स.च्या सहाव्या शतकापर्यंतचा कालखंड हा प्रयोग, नवनिर्मिती व विमर्शाची घुसळण यांनी परिपूर्ण असा अतिशय उज्ज्वल कालखंड होता. त्यानंतर १२-१३व्या शतकापर्यंतच्या काळात त्याला उतरती कळा लागली. त्यानंतरच्या काळात जुन्या पुण्याईच्या आधाराने आयुर्वेदासारख्या निवडक क्षेत्रातील धुगधुगी टिकून राहिली, पण त्यातील चैतन्य मात्र लुप्त झाले. मोगल राज्यकर्ते सोबत काही नव्या गोष्टी घेऊन आले व त्यांच्या राजवटीत काही काही विषयांत नवनिर्मिती झाल्याचेही आपल्याला दिसते.

भारतीय विज्ञान-तंत्रज्ञान : उद्गम आणि विकास

भारतीय उपखंडातील मानवी सभ्यतेच्या पहिल्या खाणाखुणा पाकिस्तानातील मेहरगढ येथील उत्खननात सापडतात. इ. स.पूर्व ५५०० च्या या अवशेषांमध्ये मातीच्या विटांची घरे, धान्य साठवायची कोठारे, तांब्याच्या खनिजांपासून बनवलेली हत्यारे आढळतात. शेती व पशुपालन करणारा हा समाज होता. यानंतर प्रगत संस्कृतीच्या पाऊलखुणा हडप्पा आणि मोहेंजोदाडो (इ. स.पूर्व ३३००-१७००) येथील उत्खननात सापडतात. सुनियोजित शहररचना, विटांनी बांधलेली घरे, विहिरी, न्हाणीघरे, धान्य-कोठारे, सांडपाण्याच्या निचऱ्याची सोय, वजन-मापनपद्धती ही तेथील सिंधू-संस्कृतीची वैशिष्टय़े होत.

यानंतर सुमारे हजार-दीड हजार वर्षे भारतात विज्ञान व तंत्रज्ञान यांची विलक्षण प्रगती झाली. त्या काळात भारत खऱ्या अर्थाने जगद्गुरू होता व ज्ञान मिळविण्यासाठी आधी अरब व नंतर युरोपमधून अभ्यासक येथे येत होते. गणित हे सर्वात मूलभूत विज्ञान मानले जाते. प्राचीन भारतातील गणितात अंकगणित, बीजगणित व खगोलशास्त्र यांचा समावेश होता. त्यात सर्वात महान कामगिरी पाचव्या शतकातील आर्यभट्टाने केली. दशमान पद्धतीचा शोध, पृथ्वी गोल आहे, ती स्वत:च्या अक्षाभोवती फिरते, तसेच ग्रहण हा ‘सावल्यांचा खेळ’ आहे, हे महत्त्वाचे शोध त्याच्या नावावर जमा आहेत. पाय (स्र्) या गणिती संकल्पनेची जवळजवळ नेमकी किंमत काढण्यातही त्याला यश आले होते. गणितातील मौलिक संशोधनाची ही परंपरा वराहमिहिर, ब्रह्मगुप्त, महावीर आचार्य व भास्कराचार्य (शतके अनुक्रमे ६, ७, ९ व १२) यांनी पुढे चालवली. शून्य ही भारतीयांनी जगाला दिलेली देणगी आहे, हे तर आपण जाणतोच. वराहमिहिर व ब्रह्मगुप्त यांनी उज्जैन येथील वेधशाळेत अध्ययन व संशोधन करून खगोलशास्त्रात मोलाची भर घातली. रसायनशास्त्रातही भारतीयांनी मौलिक संशोधन केले. लोहशास्त्राचा पाया घालणारा पतंजली (इ. स.पूर्व दुसरे शतक) आणि वनस्पतिधारित आयुर्वेदाला कज्जलीसारख्या रसायनांची जोड देणारा नागार्जुन (दुसरे शतक) ही या क्षेत्रातील दिग्गज नावे. इ. स.पूर्व १५०० च्या सुमारास भारतात खाणीतून लोखंड काढण्याचे तंत्र विकसित झाले. नंतरच्या काळात चांदी, तांबे, शिसे, जस्त, कथील आणि सोनेही खाणीतून काढले जाऊ  लागले. या धातूंचा उपयोग दागिन्यांपासून शस्त्रांपर्यंत अनेक क्षेत्रांत करण्याचे तंत्रज्ञानही भारतीयांनी विकसित केले होते, याची साक्ष ह्य़ु एन त्संग व अल्बेरुनीसारख्या अनेक परदेशी प्रवाशांनी दिली आहे. अलेक्झांडरच्या आक्रमणानंतर पोरसने त्याला नजराणा म्हणून ३० पौंड पोलाद दिले, अशी इतिहासात नोंद आहे.

तंत्रज्ञान

रंग, कातडी कमावणे, साबण, काच या क्षेत्रांतही पुढारलेला देश म्हणून भारताची जगात ओळख होती. नौकायनाची विद्या येथे इ. स.पूर्व तिसऱ्या सहस्रकापासून विकसित होत गेली. इ. स.पूर्व २४०० च्या दरम्यान गुजरातमधले लोथल हे जगातले पहिले बंदर विकसित झाले.  मौर्यकाळात (इ. स.पूर्व चौथे शतक) अभियांत्रिकी, नगररचना, वास्तुरचना या क्षेत्रांत चांगली प्रगती झाली होती. याच काळात भारतातला पहिला पाटबंधारा ‘सुदर्शन’ काठेवाडमधील गिरनारजवळ बांधला गेला आणि तो इ. स. १५० पर्यंत म्हणजे साडेचारशे वर्षे टिकून होता. कापसाची लागवड भारतात इ. स.पूर्व तिसऱ्या सहस्रकात सुरू झाली. वस्त्रोद्योग मोहेनजोदडो काळापासून विकसित होत गेला व त्यात सातत्याने प्रगती होत गेली. मोगल काळात त्याला खूप उत्तेजन मिळाले. अगदी १९व्या शतकातही ढाक्याच्या मलमलीपासून बनलेली तलम धोतरजोडी अंगठीतून आरपार ओढून काढता येत असे, असे म्हणतात.

आयुर्वेद

इ. स.पूर्व पाचव्या शतकातल्या सुश्रुतसंहितेत शस्त्रक्रिया, प्रसूती, आहार, स्नान, औषधे, बालकांचा आहार, वैद्यकीय शिक्षण याविषयी सविस्तर माहिती आहे. शस्त्रक्रियेचे विज्ञान व तंत्र नंतर पूर्णपणे लुप्त झाले, पण मोतीबिंदू, अंतर्गळ, मूतखडा, सिझेरियनपासून त्वचारोपणापर्यंतच्या शल्यक्रियांचे उल्लेख या ग्रंथात आहेत. शस्त्रक्रिया शिकण्यासाठी शवविच्छेदन आवश्यक आहे, असे म्हणणाऱ्या सुश्रुताला तत्कालीन ब्राह्मणांचा तीव्र विरोध सहन करावा लागला होता. सुश्रुतसंहितेत ११२० रोगांची नावे आणि त्यांचे निदान याविषयी माहिती आहे. इ. स. दुसऱ्या शतकात होऊन गेलेल्या चरकाने लिहिलेली चरकसंहिता हा आजच्या आयुर्वेदाचा प्रमाणभूत ग्रंथ मानला जातो. पचन, चयापचय आणि प्रतिकारशक्ती या तोपर्यंत माहीत नसलेल्या संकल्पना त्याने मांडल्या. तसेच जगातील वैद्यक व्यावसायिकांसाठीची पहिली आचारसंहिता त्याने मांडली. नागार्जुन हा रसायनशास्त्रज्ञ व बौद्ध तत्त्वचिंतक हा त्याचा समकालीन होता. पारा या विषारी धातूचे निर्विषीकरण करून त्याचा औषध म्हणून उपयोग करण्याचे तंत्र त्याने विकसित केले. आयुर्वेदाची वैचारिक भूमिका आणि त्याचा प्रचार-प्रसार यात बौद्ध भिख्खूंचे अमूल्य योगदान आहे. तसेच परदेशात झालेल्या बौद्ध धर्मप्रसारामध्ये आयुर्वेदाची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. परदेशी व्यापारी व प्रवासी यांच्यामार्फत आयुर्वेदाची कीर्ती जगभरात पसरली होती. असे म्हटले जाते की, आठव्या शतकात बगदादचा खलिफा हरुन अल रशीद जेव्हा मृत्युशय्येवर होता, तेव्हा आयुर्वेदाच्या औषधाने त्याचा जणू पुनर्जन्म झाला. म्हणून त्याने त्या काळच्या आयुर्वेदतज्ज्ञांना त्यांच्या शिष्यपरिवारासह अरबस्थानात पाचारण केले. त्यांच्यासाठी प्रयोगशाळा थाटून दिल्या व त्यांच्या ग्रंथांचे अरबीत भाषांतर करवून घेतले.

एवढा थोर वारसा कोठे व कसा लुप्त झाला, हा खरा तर एका प्रबंधाचा विषय आहे. विज्ञानाच्या विकासासाठी प्रश्न विचारण्याचे अमर्याद स्वातंत्र्य, उत्तराचा शोध घेण्यासाठी आवश्यक मोकळा अवकाश, सिद्धान्त आणि प्रात्यक्षिक (म्हणजेच मेंदू आणि हात) यांचा समन्वय या अनिवार्य शर्ती आहेत. इ. स.पूर्वी चौथ्या-पाचव्या शतकांपासून सुमारे हजार-दीड हजार वर्षे कमी अधिक प्रमाणात या बाबी भारतात अस्तित्वात होत्या. म्हणूनच त्या काळात येथे विज्ञान-तंत्रज्ञानाची भरभराट झाल्याचे आपल्याला दिसते. अर्थात, हा काही सरळ रेषेतील प्रवास नव्हता. मघाशी उल्लेख केल्याप्रमाणे अगदी सुश्रुतालाही वर्णवर्चस्ववादी विचारांचा विरोध पत्करावा लागला होता. बौद्ध काळात एकूणच इहवादी विचार, तार्किकता, विवेकवाद यांना जनमानसात महत्त्वाचे स्थान होते. नेमका हाच काळ भारतीय विज्ञान-तंत्रज्ञानाचे सुवर्णयुग आहे, हा निव्वळ योगायोग नव्हे. आयुर्वेदाचेच उदाहरण द्यायचे झाले तर जेव्हा शल्यक्रिया ही रक्त व उपकरणे यांच्याशी संबंधित, म्हणून हीन दर्जाची आहे, असे मानून तिला तुच्छ ठरविण्याचे प्रयत्न सुरू झाले, तेव्हाच त्याच्या ऱ्हासाची बीजे रोवली गेली. यातून पुढे शल्यकर्म करणारे अस्पृश्य लेखले गेले. त्यांचे सामाजिक स्थान नष्ट झाले. इतके की प्रसूतीक्रियेत मदत करणे हे सुईणीचे कार्यदेखील अस्पृश्य व हीन दर्जाचे मानले गेले. तिला त्या प्रक्रियेशी संबंधित तात्त्विक ज्ञानापासून वंचित ठेवले गेले. दुसरीकडे, इ. स.च्या दुसऱ्या सहस्रकात तर कर्मकांड, सोवळेओवळे यांचे प्रस्थ वाढले. ज्ञानाचा अधिकार असणाऱ्या मूठभर ब्राह्मणांचे स्वातंत्र्यदेखील ‘शास्त्रार्था’पुरते, म्हणजे ग्रंथांचा अर्थ लावण्यापुरते मर्यादित करण्यात आले. शब्दप्रामाण्य वाढल्यामुळे विद्वत्ता फक्त पाठांतरापुरती उरली.

परदेशगमनावर बंधने आली. परिषदांमधून होणारा खुला विमर्श, वादविवाद संपुष्टात आला. अशा वातावरणात विज्ञानाचे काय झाले असेल याचा आपल्याला विचार करता येईल. याशिवाय ज्ञान दिल्याने वाढते हे विसरून ते गुप्त ठेवणे किंवा संदिग्धपणे नोंदविणे, इतरांकडून न शिकणे, प्रयोग, घटना, इतिहास यांच्या नोंदी न ठेवणे अशा खास भारतीय दुर्गुणांनी त्यात भर घातली यात शंका नाही. आपल्याला आपल्या वारशाचा खराखुरा अभिमान असेल, तर आपण उगाच सबबी न सांगता तो का व कसा लुप्त झाला आणि तो शोधून त्याची आजच्या काळाशी कशी सांगड घालायची, या प्रश्नांना उघडय़ा डोळ्यांनी चिकित्सकपणे भिडले पाहिजे. आवश्यक कृती न करता उगाचच पूर्वजांचा मोठेपणा मिरविणाऱ्यांविषयी रामदासस्वामी  म्हणतात –

सांगे वडिलांची कीर्ती। तो येक मूर्ख

लेखक समाज-विज्ञान यांच्या आंतर संबंधांचे अभ्यासक व कार्यकर्ते आहेत. ई-मेल :

ravindrarp@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 10, 2018 3:52 am

Web Title: ravindra rukmini pandharinath article on science technology
Next Stories
1 लोकविज्ञान : नव्या दिशा, नवी आव्हाने
2 लोकविज्ञान 
3 विज्ञानप्रेमी, वैज्ञानिक व विज्ञान समीक्षक : म. गांधी
Just Now!
X