एजाजहुसेन मुजावर

जीवघेण्या करोनापुढे हार न मानता, हतबल न होता, जिद्द आणि चिकाटीने बरेच तरुण जीवनाची नवी वाट चोखाळत आहेत. आपल्या नेहमीच्या व्यवसायावर करोनाची वक्र दृष्टी वळली असताना काही जण त्यातून मार्ग काढत, शेती व्यवसायात उतरून जिद्दीने, काळ्या आईसह स्वत:च्या मनाची, मनगटाची मशागत करताना दिसून येतात. यात त्यांचे कर्तृत्व यशस्वीपणे सिद्ध होत असल्याचे दृश्यही पाहावयास मिळत आहे.

करोना भयसंकटाच्या मागील सहा महिन्यात समाजाची रचनाच बदलून गेली आहे. सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, उद्योग अशा सर्वच स्तरांवर करोना विषाणूने आघात केले आहेत. त्यातून अनेक नवनवीन आव्हाने उभी ठाकली असताना त्यावर मात करण्याचा आणि दररोजच्या आयुष्यातील लढाई लढण्याची धडपड सुरू असल्याचे चित्रही पाहावयास मिळत आहे. जीवघेण्या करोनापुढे हार न मानता, हतबल न होता, जिद्द आणि चिकाटीने बरेच तरुण जीवनाची नवी वाट चोखाळत आहेत. आपल्या नेहमीच्या व्यवसायावर करोनाची वक्र दृष्टी वळली असताना काही जण त्यातून मार्ग काढत, शेती व्यवसायात उतरून जिद्दीने, काळ्या आईसह स्वत:च्या मनाची, मनगटाची मशागत करताना दिसून येतात. यात त्यांचे कर्तृत्व यशस्वीपणे सिद्ध होत असल्याचे दृश्यही पाहावयास मिळत आहे. सोलापुरातील एखादा यंत्रमाग उद्योजक वा स्पर्धा परीक्षा तयारी मार्गदर्शन वर्ग चालविणारा कोणी क्लासचालक असो अथवा शिंपी, अशा अनेकांनी पुन्हा शेतीकडे लक्ष घालून नवनिर्मितीमध्ये कर्तृत्व दाखवायला सुरुवात केली आहे. या माध्यमातून पूर्वी कधी काळी शेतीशी असलेली नाळ तुटली असता ती पुन्हा जोडण्याचा प्रयत्न दिसतो आहे.

लहानपणी गावात शिक्षण घेताना आई-वडिलांसोबत शेतात जायचो. प्राथमिक, माध्यमिक शिक्षण घेताना शेतात आई-वडिलांना मदत म्हणून माझेही छोटे हात राबायचे. उच्च शिक्षणानंतर व्यवसायाच्या निमित्ताने शहरात आलो. तिकडे शेतीशी असलेला संबंध दुरावला. आता ‘करोना’ने पुन्हा शेतीची नाळ जुळवून आणली आहे.. काशीनाथ भतगुणकी सांगत होते.

करोना महामारी आणि टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर शेतीकडे वळण्यापूर्वी भतगुणकी यांनी पत्नी संगीता यांच्या मदतीने सुरुवातीला मार्च व एप्रिल महिन्यात मुखपट्टय़ा निर्मिती व सॅनिटायझर विक्रीमध्ये लक्ष घातले. पण त्यात समाधान होईना. तेव्हा त्यांनी स्वत:ची शेती पुन्हा फुलवण्यास सुरुवात केली. येथील कुमठे गावातील आठ एकर जमिनीत त्यांनी शेती व्यवसायाचा प्रारंभ केला. समाजसेवेची पदवी आणि बीएडपर्यंत शिक्षण घेऊ न शिक्षकी पेशा पत्करलेले भातगुणकी यांनी नोकरीनंतर शेतीचा विचारही केला नव्हता. परंतु आज परिस्थितीने पुन्हा एकदा त्यांनी हाती लेखणीऐवजी नांगर धरला आहे.

मे, जून, जुलै महिन्यात कोणते भाजीपाला घ्यायचे याचे नियोजन करून जमीन मशागत करून चांगले बियाणे आणून सेंद्रिय शेतीला सुरुवात केली. सर्वत्र करोना वाढत असताना घरातून बाहेर पडून कुमठे शिवारात येणे जाणे सुरू झाले. संचारबंदी असतांना ई—पास काढून भल्या सकाळी शेतात हे दोघे हजर असत. मेथी, कोथिंबीर, शेपू, पालक,राजगिरा, अंबाडी, तांदुळसा यांची लागवड केली. फळभाज्यांमध्ये भेंडी, वांगी, टोमॅटो, दोडके, कारले, कोबी,मिरची,फ्लॉवर, सिमला मिरची,कांदा, गवार यांची लागवड केली. पाणी व्यवस्थापन, खुरपणी आणि सेंद्रिय खते यामुळे भाजीपाला जोमाने वाढला आणि स्वत: विक्री व्यवस्थाही केली. खरीप पीक लागवडमध्ये तूर, मूग,मटकी, सूर्यफूल, भुईमूग,बाजरी, चवळी, कारले, तीळ, हुलगा, कापूस, मका यांचा नियोजनपूर्वक समावेश केला. सध्या ही पिके डौलाने वाढली असून पिकांची रास सुरू आहे. नगदी पिके, तेलबिया, कडधान्ये, यासोबत शेवगा, झेंडू, पपई, एरंडोल, सीताफळ, चिंच, केळी, पेरू यांचीही लागवड करून बांधावर पिके घेतली. आठ एकर क्षेत्रात छोटे छोटे प्लॉट पाडून तब्बल ४५ प्रकारची पिके घेताना भतगुणकी दाम्पत्याला शेतीचा लळा लागल्याचे दिसून येते. शेतात पाणी व्यवस्थापन यशस्वीपणे राबविताना मशागत, कोळपणी, औषध फवारणीसाठी भतगुणकी यांनी ‘टाकाऊपासून टिकाऊ’ प्रयोग केले असून यात भंगारातील सायकलीचा वापर करून कुळव तयार केला आहे. जुगाडही स्वत: तयार केले आहेत. त्यामुळे ३० ते ४० हजारांची बचत झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

स्वत:च्या गावाकडील—हत्तरसंग (ता. दक्षिण सोलापूर) येथील शेतीही भतगुणकी दाम्पत्याने कसायला घेतली आहे. सध्या भाजीपाला व कडधान्य काढणी हंगाम सुरू आहे. शेतमजुरांची वानवा असल्यामुळे स्वत: दोघे शेतात दिवसभर काम करतात. सायंकाळी बसव संगम शेतकरी गटातील शेतकऱ्यांचा उत्पादित शेतमाल भतगुणकी हे प्रत्यक्ष बांधावर जाऊ न खरेदी करत त्याच्या विक्रीची व्यवस्थाही पाहतात. या खरेदी मालावर सध्या सोलापूर शहरात सात ठिकाणी ‘शेतकरी ते ग्राहक’ थेट विक्री केंद्रे सुरू झाली आहेत. यातून पुन्हा नव्या ५५ व्यक्तींना थेट रोजगार मिळाला आहे. भविष्यात हुरडा पार्टी, कृषी पर्यटन, चुलीवरचे गावरान शाकाहारी जेवण यांची सेवा देण्याचे नियोजन सुरू आहे.

उद्योजकाला शेतीचा आधार

आर्थिक अडचणीत असलेल्या सोलापुरातील यंत्रमाग उद्योजकांचे करोना महामारीच्या आपत्तीमुळे कंबरडेच मोडले आहे. त्यामुळे आर्थिक विवंचनेत सापडलेल्या तुळशीराम मिठ्ठा या यंत्रमाग उद्योजकाचे पाय आता शेतीकडे वळले आहेत. वर्षांनुवर्षे यंत्रमागावर सोलापुरी चादरी, टॉवेल, बेडशिटसारखी उत्पादने घेणारे मिठ्ठा यांचे हात आता शेतात राबू लागले आहेत. कारण शेतीतच त्यांना आर्थिक आधार मिळण्याविषयीचा विश्वास वाटतोय. लहानपणी यंत्रमाग कारखान्यात कष्ट केलेल्या मिठ्ठा यांनी परिश्रमाच्या बळावर स्वत: यंत्रमाग खरेदी करून उत्पादन सुरू केले होते. जिद्द, चिकाटी आणि मेहनतीने त्यांनी उद्योग विस्तारही केला होता. अलीकडेच अक्कलकोट रस्त्यावर कुंभारी येथे स्वत:च्या यंत्रमाग कारखान्याचा आणखी विस्तार करण्यासाठी त्यांनी सहा हजार चौरस फूट जमीन खरेदी केली होती. त्यासाठी १८ लाखांचे कर्जही उभारले होते. परंतु करोना विषाणूने केवळ पाणीच फेरले नाही तर भवितव्यही धोक्यात आणले. डोक्यावरचे कर्ज फेडायचे कसे, याची चिंता सतावत होती. त्यातून पर्याय शोधत असताना मार्गही सापडत नव्हता. मात्र काही मित्रांनी कुंभारीच्या यंत्रमाग कारखान्यासाठी घेतलेल्या पडीक सहा हजार चौरस फुटांच्या जागेवरच शेती करण्याचा सल्ला दिला. परंतु सध्या शेतकऱ्यांचीच आर्थिक अवस्था अडचणीची आहे. आपला तर शेतीशी संबंधच काय ? आपला हा प्रांत नाही, असा प्रतिकूल विचार करीत असताना शेवटी प्रयोग म्हणून शेती केली तर घरासाठी भाजीपाला तरी मिळू शकेल, अशी आशा निर्माण झाली. त्यातून मिठ्ठा यांनी छोटय़ाशाच भूखंडाचा वापर शेतीसाठी सुरू केला. केळी, वांगी, झेंडू, भाजीपाला आदी पिकांची लागवड केली असता सोबत पावसानेही साथ दिली. सुदैवाने रोगराई झाली नाही. भाजीपाला व फळेभाज्यांची काढणी होऊ न हाती घरसंसार चालण्यापुरता तरी पैसा येऊ  लागला. आता मिठ्ठा यांना शेतीची गोडी निर्माण झाली आहे.

शिंपी झाला शेतकरी : सोलापुरात गेली अनेक वर्षे पारंपरिक शिंपी व्यवसात गुंतलेले शिवसिध्द टक्कलकोटे यांनीही टाळेबंदीमुळे शिंपी व्यवसाय खालावल्यानंतर स्वत:च्या वडिलोपार्जित शेतीकडे लक्ष घातले आहे. शहरालगत डोणगाव शिवारात आठ एकर क्षेत्राची शेतजमीन आतापर्यंत तशी पडून होती. पाणीही जेमतेम होते. टक्कलकोटे यांनीही शिलाई यंत्र बाजूला ठेवून शेतीत स्वत:ला झोकून देत पपई, पेरू, आंबा यासह शेवगा आणि भाजीपाल्याची लागवड केली होती. सुदैवाने यंदा पावसाळ्यात वरूणराजाची कृपा झाली आणि पिके वाढली आणि बहरली. टोमॅटोचे पीक जोमात आले. परंतु सुरुवातीला टोमॅटोला बाजारात अपेक्षित भाव न मिळाल्यामुळे टक्कलकोटे हे काहीसे निराश झाले होते. नंतर चांगला दर मिळू लागला. इतर पिकांपासूनही चांगले उत्पन्न मिळण्याची त्यांनी आशा बाळगली आहे. शेतीमालाला किफायतशीर भाव मिळाला तर पुन्हा शिंपी व्यवसायाकडे वळण्याचा विचार नाही, असे ते सांगतात.