आाशिष शेलार

महाराष्ट्रात ७१ लाख १७ हजार ७८७ पेक्षा जास्त शिजलेल्या अन्नाच्या पाकिटांचे वाटप, ३० हजार रक्ताच्या बाटल्या रक्तपेढीत जमा, १००० भटक्या-विमुक्त कुटुंबांना पूर्ण आधार असे काम रा. स्व. संघ परिवारातील स्वयंसेवकांनी गेल्या दोन महिन्यांत केल्याच्या माहितीवर आधारलेला हा लेख;  संघ, भाजप, सरकारी यंत्रणा, इस्कॉनसारख्या संस्था या सर्वानी एकमेकांना कसे सहकार्य केले हेही नमूद करणारा..

Saving
बचत फक्त मोठ्यांनी नाही, लहानांनीही करावी! मुलांना अर्थसाक्षर बनवण्यासाठी ‘या’ गोष्टी ठरतील फायदेशीर
Nagpur MIDC police arrested the youth who molested the girl crime news
विवाहितेच्या अंगावर चिठ्ठी फेकली, पुढे झाले असे की…
Addicted to junk food and can’t seem to stop Here’s how to overcome it
तुम्हाला जंक फूड खाण्याचे व्यसन आहे का? तज्ज्ञांकडून जाणून घ्या कशी सोडावी ही वाईट सवय
Before blaming diabetes drugs understand What chemicals are used in medicines
मधुमेहावरल्या औषधांना दोष देण्याआधी समजून तरी घ्या…

प्रत्येक संकट माणसाला काही ना काही तरी शिकवून जाते, किंबहुना माणसाने अशा वेळी शिकायचेच असते. करोनाचे संकटसुद्धा असेच बरेच धडे माणसाला देऊन जाणार आहे. बहुतेक वेळा अशी मोठी संकटे शेवटी एक धडा नक्की देतात, तो म्हणजे ‘माणसाने माणसाशी माणसासम वागणे’. खरं तर एका सिनेमातील गाण्याचे हे बोल, पण ही प्रार्थना आहे. काही माणसे या प्रार्थनामधील आदर्शवाद शेजाऱ्यांच्या घरी जन्मावा असा विचार करतात तर काही माणसे हा आदर्शवाद स्वत: जगू लागतात. अशा माणसांची खरी चिंता वाटते.. कारण अशी माणसे प्रत्येक संकटात माणसाशी माणसाप्रमाणेच वागतातच, पण या माणसांना आपण माणूस म्हणून समजून घेतो का? समाजासाठी नि:स्वार्थपणे सेवा करणाऱ्या अशा माणसांना कौतुक सोडा, त्यांच्या वाटय़ाला नेहमी टीकाच येते. तरीही न थकता, नाउमेद न होता ही माणसं प्रत्येक संकटाच्या वेळी कोणतीही अपेक्षा न करता काम करत असतात. किंबहुना कौतुक करून घेणे हा त्यांचा संस्कार नाही किंवा त्यांची अपेक्षाही नसते. स्वयंसेवक ही एवढीच त्यांची ओळख. करोनाच्या या संकटात जगाच्या पाठीवरील सर्वच माणसे माणूस म्हणून एका समान पातळीवर आली आहेत, तेव्हा समिधा म्हणून अनेक वर्षे जळणाऱ्या स्वयंसेवकांचे काम थोडे समजून घ्यायला काय हरकत आहे?

करोनाचा प्रादुर्भाव होताच देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आणि त्यानंतर करोनाविरुद्ध एक युद्ध सुरू झाले. एका न दिसणाऱ्या शत्रूच्या विरोधातील हे युद्ध लढण्यासाठी सैनिक म्हणून संपूर्ण समाजाला उभे करायचे होते. हे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आणि संपूर्ण देश या देशातील नागरिक, सामान्य माणूस, पोलीस, डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय, बेस्ट, एसटीसारख्या प्राधिकरणाचे चालक-वाहक, महापालिकेचे कर्मचारी, नगरपालिका कर्मचारी, जिल्हाधिकारी, त्यांचे कर्मचारी, अशी एक मोठी यंत्रणा करोना वॉरिअर म्हणून काम करू लागली. या सगळ्यांच्या बरोबरीने काही सामाजिक संस्था, धार्मिक काम करणाऱ्या संस्था स्वयंप्रेरणेने काम करू लागल्या. त्यातीलच एका कामाचा मी ऊहापोह करणार आहे. नागपूर मुख्यालय असलेला आमचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देशभरातील छोटय़ा छोटय़ा गावांपर्यंत, पाडय़ांपर्यंत, वस्त्यांपर्यंत, शहरात गरीब वस्त्यांपर्यंत एवढेच नव्हे तर देशविदेशातसुद्धा गेली अनेक वर्षे काम करतो आहे. काम काय? एकच- मनुष्यनिर्माण! मानव सेवा!

समाज घडवण्याच्या कामात अहोरात्र काम करणाऱ्या संघाने मनुष्यनिर्माणाच्या कार्यात एकापेक्षा एक असंख्य माणसे आपल्या मुशीत घडवली. ज्यांनी देशाला, समाजाला दिशा देण्याचे काम केले, अशी खूप नावे घेता येतील. प्रत्यक्ष प्रकाशझोतात येऊन काम करणारी ही माणसे आहेत, त्यापेक्षा किती तरी जास्त माणसे ही आजपर्यंत प्रकाशझोतात न येता, कधीही कुठल्याही अपेक्षा न ठेवता त्याग, समर्पण आणि सेवा या भावनेने काम करत राहिली.

विसरू दे माझ्यातला मी तेत भक्ती उसळू दे

रंग तू मी रंगणारा दंग त्यातच होऊ दे

कापराचे भाग्य मजसी अनुभवा आणून दे

वादळाची दे गती पण भान ध्येयाचे असू दे

उसळत्या रक्तात माँ..

या विलक्षण प्रेरणेने राष्ट्रनिर्माणाच्या कामात, मनुष्यनिर्माणाच्या कामात असलेली माणसे मला ‘कापराचे भाग्य दे’ म्हणतात. संकटाच्या वेळी स्वयंसेवक धावून जातात, मग ती माळीण येथील दुर्घटना असो वा आताचा लॉकडाऊन असो.

गेल्या दोन महिन्यांच्या काळात हे स्वयंसेवक देशाच्या कानाकोपऱ्यात काम करताहेत. महाराष्ट्राच्या कोकण, विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र या संघटनात्मक रचना केलेल्या विभागांतून मला जी माहिती उपलब्ध झाली त्यानुसार सुमारे ३० हजार रक्ताच्या बाटल्या स्वयंसेवकांनी वेगवेगळ्या रक्तपेढय़ांमध्ये जमा केल्या. कधी स्वत: रक्तदान केले तर कधी समाजातील रक्तदात्यांना लॉकडाऊनचे नियम पाळून हॉस्पिटलपर्यंत नेण्यास मदत केली.

विविध प्रकारची सेवाकार्ये

लॉकडाऊनमुळे समाजातील गरीब माणूस अडचणीत आला. त्याला मदतीची गरज होती, अशा गरिबांना शिजवलेले अन्न पुरवणे हे काम सुरू झाले आणि गेल्या दोन महिन्यांत महाराष्ट्रात ७१ लाख १७ हजार ७८७ पेक्षा जास्त शिजलेल्या अन्नाच्या पाकिटांचे वाटप झाले. कोकण विभागाने शिजलेल्या धान्याची ६४ लाख ५७ हजार ९१२ एवढी पाकिटे ठाणे, मुंबई, पालघर, रत्नागिरीपासून सिंधुदुर्गपर्यंत वाटप केली. यामध्ये पालघर आणि डहाणूचे आदिवासी पाडेसुद्धा आहेत. तर कोकण विभागाने याच परिसरात १ लाख २५ हजार ०२३ धान्याची पाकिटे वितरित केली. मास्क आणि सॅनिटायझरचे ३४ हजार ४०९, तर रक्तदान शिबिरे ६१२ झाली. तर ठाणे, मुंबईसारख्या शहरी भागांत रेशन दुकान, भाजी मंडईत १५३८ ठिकाणी सेवा देण्यात आली. या कामात या विभागातील प्रत्यक्ष सहभागी स्वयंसेवक ५ हजार ७११ तर अप्रत्यक्ष सेवा देणाऱ्यांची संख्या ही मोठी आहे.

पुणे, सांगली, कोल्हापूर, सातारा, अहमदनगर, नाशिक या परिसरांत काम करणाऱ्या स्वयंसेवकांनी एकूण १६ प्रकारची सेवाकार्ये केली. त्यामध्ये थेट सहभागी स्वयंसेवक ६ हजार आणि कार्यकर्ते १५६० सहभागी झाले आहेत. २ लाख कुटुंबांना धान्य, अन्न पॅकेट ९ लाख तर २ लाख लोकांची भोजन व्यवस्था करण्यात आली. मास्क सॅनिटायझर, हॅण्डग्लोव्हज् एकत्रितपणे सुमारे २ लाख ५० हजार वाटण्यात आले. भटक्या-विमुक्त १००० कुटुंबांना पूर्ण आधार दिला.

मराठवाडा विभागाने अन्नाची ४ लाख ६७ हजार १४५ तर धान्य पाकिटे ३६ हजार ९३१ वाटप केली. मास्क सॅनिटायझर ८५ हजार १५६ तर रक्तदान ३९२३ जणांनी केले. ७ लाख ३६ हजार १४२ लोकांपर्यंत अशा विविध सेवा पोहोचल्या. या कामात ९ हजार ९२१ स्वयंसेवक सहभागी झाले आहे.

नागपूर, चपूर, गडचिरोलीपासून वर्धा आणि अमरावती भागांत काम करणाऱ्या विदर्भ विभागाने अन्नाची २ लाख ९२ हजार ७३० तर धान्य पाकिटे २ लाख ०३ हजार ५१४ वाटप केली. मास्क सॅनिटायझर ८७ हजार ३५३ तर रक्तदान २८३७ जणांनी केले. आयुर्वेदिक काढा वाटप १७ हजार २१० तर पीपीई किट ९६५ वाटप करण्यात आले.

एकूण ६ लाख ४८ हजार २३५ कुटुंबांपर्यंत ४ हजार ९१३ स्वयंसेवक पोहोचले. असे महाराष्ट्रात आजपर्यंत सुमारे ६ लाख धान्याच्या पाकिटांचे वितरण करण्यात आले. मास्क आणि सॅनिटायझर ५ लाख लोकांना वाटण्यात आले. करोनाच्या विरोधात रोगप्रतिकारकशक्ती वाढवणे हे महत्त्वाचे काम होते, त्यामुळे आयुर्वेदिक आणि होमिओपॅथी औषध, काढा यांचे वाटप सुरू झाले. आजपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात २ लाखांहून अधिक जणांना अशा वस्तूंचे वाटप करण्यात आले.

इस्कॉनसारख्या अनेक संस्था होत्या. या संस्थांना अन्न शिजवणे शक्य होते, मात्र ते पोहोचवणे शक्य नव्हते. या कामातसुद्धा या स्वयंसेवकांनी पुढाकार घेतला आणि अशा संस्थांमधून तयार झालेले अन्न गरिबांपर्यंत पोहोचवले.

मजुरांना रस्त्यात अन्न

विशेष म्हणजे मजुरांचे लोंढेच्या लोंढे हमरस्त्यावरून गावाकडे चालू लागले. तेव्हा आम्ही वारंवार राज्य सरकारला सांगत होतो, रस्त्यामध्ये यांना पाणी, अन्न, औषधे यांचा पुरवठा करा, पण सरकारने त्याकडे लक्ष दिले नाही. हा मजूर या शहरांमध्ये ज्या वस्त्यावस्त्यांमध्ये राहात होता, त्याला शासनाने धान्य पोहोचवले नाही. त्यामुळे हा कामगार अस्वस्थ झाला आणि आपल्या गावाकडची वाट चालू लागला. या चालणाऱ्या माणसांना जागोजागी पाणी, अन्न, औषधे पुरविण्याचे काम या स्वयंसेवकांनी केले. ज्या ज्या ठिकाणी हे मजूर थांबत होते त्या त्या ठिकाणी स्वयंसेवक पोहोचत होते. त्यांना अन्नपाणी देत होतेच, शिवाय नागपूर, नााशिकपर्यंत पायी चालत गेलेल्या मजुरांना चपलांचे वाटपसुद्धा या स्वयंसेवकांनी केले. त्यांना भेटून धीर देण्याचे कामही केले.

‘त्या’ वस्त्यांतही काम!

तर मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर यांसारख्या शहरांमध्ये काही वस्त्या तृतीयपंथीयांच्या तर काही वस्त्या वारांगनांच्या आहेत. या वस्त्यांमध्ये सहसा कोणी जात नाही. या वस्त्यांमध्येसुद्धा स्वयंसेवक पोहोचले. दाटीवाटीने असलेल्या मुस्लीम वस्त्यांमधील रहिवाशांना, महिलांना, तृतीयपंथीयांना अन्न-पाणी-धान्य वाटप केले. गोळ्या-औषधे यांचे वाटप सुरू केले.

केवळ मदत पोहोचवणे एवढेच काम या स्वयंसेवकांनी केले असे नाही तर राज्यातील अनेक खासगी डॉक्टर आपापले दवाखाने बंद करून बसले होते. छोटी-मोठी हॉस्पिटल्स बंद होती. सरकारने वारंवार विनंत्या करूनही हॉस्पिटल उघडण्यास डॉक्टर तयार नव्हते. अशा डॉक्टरांना या स्वयंसेवकांनी भेटण्यास सुरुवात केली. त्यांना विनंती करण्यास सुरुवात केली. आपले दवाखाने सुरू करा, तुम्हाला आवश्यक असणारे सुरक्षा किट, मास्क आम्ही देतो. तुम्ही दवाखाने सुरू करा, अशी विनंती केली. त्यालाही प्रतिसाद मिळाला. एकटय़ा मुंबईत ६५७ दवाखाने, हॉस्पिटल्स सुरू करण्यात यश आले. असेच यश ठाणे, नवी मुंबई, पुणे, नागपूर शहरांत या कामी आल्याचे स्वयंसेवक सांगतात.

रोजगाराचा प्रश्न हाताळला!

रोजगाराचा प्रश्न गंभीर होता, आजही आहे. मजूर स्थलांतरित झाले आहेत. ज्यांना कारखाने सुरू करायचे आहेत, त्यांना मजूर, कामगार नाहीत अशी अडचण होती. निर्जंतुकीकरण, मास्क, हॅण्डग्लोव्हज्, सॅनिटायझर उपलब्ध करून देण्यात आले. त्यामुळे शासनाने परवानगी दिल्यानंतर कारखानदारांशी अशा प्रकारे समन्वय साधून त्यांना जी मदत अपेक्षित होती ती करून या कामात स्वयंसेवकांनी आघाडी घेतली. जे मजूर उपलब्ध आहेत, त्यांना काही ठिकाणी आवश्यक ते प्रशिक्षण देणे गरजेचे होते. हे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली.

तर पश्चिम महाराष्ट्र, कोकणासारख्या भागांत अनेक चाकरमानी मुंबई, पुणे आणि शहरातून स्थलांतरित झाले, आपल्या गावी जाऊन बसले. आता लवकर मुंबईत परतायचे नाही, असे ठरवून बसले. आता कोकणात गेलेल्या माणसाच्या रोजगाराचे, उत्पन्नाचे साधन काय? यावरसुद्धा स्वयंसेवकांनी काम करण्यास सुरुवात केली आहे. गावात तात्पुरत्या स्वरूपात काही रोजगार उपलब्ध होईल का? याबाबत कोकण विभागाचा विचार सुरू आहे. तर आंबा, भाजी, द्राक्ष, संत्री यांसारखी फळे आणि भाज्या शहरापर्यंत पोहोचणे आवश्यक होते. शेतकरी शेतात आणि ग्राहक शहरात. अशा परिस्थितीत करायचे काय, असा प्रश्न होता. सरकार आणि अन्य यंत्रणा काम करत होत्याच, पण जिथे जिथे या यंत्रणा कमी पडत होत्या, तिथे स्वयंसेवक जाऊन यामध्येही समन्वय साधत आहेत, शेतकऱ्यांना मदत करीत आहेत. आवश्यक असणारे परवाने काढून देणे, अशी कामे करीत आहेत.

तर कोकण, पश्चिम महाराष्ट्र विभागाने बचत गटांना प्रोत्साहन देऊन करोनाकाळात लागणारे मास्क व अन्य साहित्य निर्माण करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आले. प्रसंगी थेट मदत आमच्या स्वयंसेवकांनी केली, त्यामुळे महिलांच्या बचत गटांना रोजगार मिळू लागला.

आधी काम, मग यंत्रणांकडून बोलावणे!

फिजिकल डिस्टन्सिंग हे या आजाराशी लढताना महत्त्वाचे शस्त्र आहे. भाजी, अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तू, दूध खरेदी करण्यासाठी विशेषत: शहरी भागातील लोक बाहेर पडत होते. तेव्हा याबाबत काळजी घेतली जात नव्हती. विशेषत: सकाळी जेव्हा भाजीपाल्याच्या गाडय़ा शहरात येऊन उभ्या राहायच्या तेव्हा छोटे व्यापारी भाजी घेण्यासाठी गर्दी करायचे तशीच काही दुकानांसमोर गर्दी व्हायची. अशा वेळी आमचे स्वयंसेवक तिथे पोहोचले आणि सोशल डिस्टन्सिंग पाळले जाईल, यासाठी काम करू लागले.

त्यांचे हे काम पाहून महाराष्ट्रातील सर्वच शहरांत जिल्हाधिकारी, पोलीस यांच्याकडून स्वयंसेवकांना बोलावून घेण्यात आले. कोकण, विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र या चारही विभागांत जिल्हाधिकारी, पोलिसांनी स्वयंसेवक बोलावून घेतले. १५ हजारपेक्षा जास्त स्वयंसेवक या यंत्रणेसोबत काम करीत आहेत. वृद्धाश्रम, अनाथाश्रम या संस्थांमध्येसुद्धा विविध अडचणी निर्माण झाल्या. त्यांना जीवनावश्यक वस्तूंपासून अनेक गोष्टींची मदत स्वयंसेवकांनी पोहोचवली. ज्या घरी वृद्ध दाम्पत्ये आहेत, त्यांना घरोघरी जाऊन अन्न, औषधे आणून देण्याचे कामही करण्यात आले.

१,२०० हून अधिक पीपीई किटधारी..

पुणे, नागपूर, मुंबई, ठाणे या शहरांमध्ये लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये महापालिकेने घरोघरी जाऊन स्क्रीनिंग करायला सुरुवात केली आहे. तिसऱ्या टप्प्यापर्यंत महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेतील डॉक्टर, परिचारिका आणि पोलीससुद्धा करोनाबाधित झाले. पहिल्या टप्प्यापासून सतत त्यांच्यावर ताण असल्यामुळे त्यांची प्रकृती बिघडू लागली. त्यामुळे या कामात महापालिका आणि पोलिसांना काही स्वयंसेवकांची गरज होती. तिथेही या स्वयंसेवकांनी काम करण्यास सुरुवात केली. ठाणे शहरात २००हून अधिक तर मुंबईत १ हजारांहून अधिक स्वयंसेवक पीपीई किट घालून घरोघरी फिरून काम करीत आहेत.

अनेक वस्त्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. अफवा पसरू लागल्या, लोकांमध्ये भयगंड निर्माण होऊ लागले. अशा वेळी जर लोकांचे मनोबल खच्चीकरण झाले तर या युद्धात लढणार कसे, असा प्रश्न होता. त्यामुळे वस्त्यावस्त्यांमध्ये जाऊन या स्वयंसेवकांनी समुपदेशनाचे कामसुद्धा सुरू केले आहे. योग्य माहिती देण्याचे काम करण्यात येते आहे. मराठवाडा विभागात तर वैयक्तिक सल्लागार समिती, कायदेविषयक सल्लागार समिती, शैक्षणिक सल्लागार समिती व समुपदेशन समिती अशा त्या त्या क्षेत्रातील जाणकारांच्या समित्या तयार करण्यात आल्या असून या समित्या थेट लोकांमध्ये काम करीत आहेत. कौटुंबिक कलहपासून शैक्षणिक अडचणींपर्यंत या समिती सेवा देत आहेत.

अशा समाजातील विविध पातळ्यांवर हे स्वयंसेवक काम करीत आहेत. अशी अनेक कामे व सेवा विनामूल्य देत आहेत. प्रसंगी स्वत:च्या खिशातील पैसे आणि स्वत:चा वेळ खर्च करीत आहेत. आपला जीव धोक्यात घालून काम करणारी ही माणसे जर ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघा’चे स्वयंसेवक असतील तर मग हे त्यांनी केलेल्या या कामाचे मोल कमी होते का? नेहमीच आमच्यावर टीका करणाऱ्यांना स्वयंसेवकांच्या या सेवाभावामध्ये मानवी चेहरा दिसत नाही का,  हाच सवाल मी विचारतो आणि अशी केलेल्या कामाची प्रसिद्धी केलेली आमच्या अनेक स्वयंसेवकांना आवडणार नाही, त्यामुळे त्यांची क्षमा मागतो आणि त्यांच्या या अनामिक कार्याला, सेवेला सलामही करतो.

लेखक राज्याचे माजी शालेय शिक्षणमंत्री आणि विद्यमान विधानसभा सदस्य आहेत.