आरेमध्ये येऊ घातलेल्या अनेक प्रकल्पांच्या पार्श्वभूमीवर आरेतील जैवविविधता वाचवण्यासाठी पाच वर्षांपासून लोक चळवळ सुरू आहे. त्या माध्यमातून अगदी रस्त्यावर उतरून निदर्शनेदेखील झाली, पण त्याच वेळी न्यायालयीन लढाईदेखील सुरूच आहे.

न्यायालयीन लढे

वनशक्ती संस्थेने आरेचे संपूर्ण क्षेत्र हे वन म्हणून घोषित करावे यासाठी राष्ट्रीय हरित लवादाकडे मे २०१५ मध्ये याचिका दाखल केली. मात्र लवादाने हा अधिकार आमच्याकडे नाही असा निर्णय दिल्याने, वनशक्तीने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. तेथील निर्णयावर संस्थेने सर्वोच्च न्यायालयात अपील केले आहे.

पर्यावरणदृष्टय़ा संवेदनशील क्षेत्र जाहीर करताना मेट्रो ३ कारशेडचे क्षेत्र वगळण्याबाबत अम्रिता भट्टाचारजी यांनी ऑक्टोबर २०१७ मध्ये मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. न्यायालयाच्या निर्णयावर सध्या सर्वोच्च न्यायालयात अपील केले आहे. तर सर्वोच्च न्यायालयाच्याच १९९६ च्या एका निर्णयाचा आधार घेत, राज्य शासनाने वन शोधून ते घोषित करण्याची कार्यवाही वीस वर्षांत केली नाही, याबाबतचा अर्ज झोरु भथेना यांनी २०१९ मध्ये सर्वोच्च न्यायालयात केला आहे.

दुसरीकडे आरेचे क्षेत्र संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला दिल्याच्या एका जुन्या नोंदीचा आधार घेत आणखी एक महत्त्वाची याचिका वनशक्तीने मुंबई उच्च न्यायालयात २०१८ मध्ये केली. या नोंदीबाबत यंत्रणाकडून हात वर केले जात असून ही नोंद गहाळ झाल्याचे सांगितले जाते.

जैवविविधतेने समृद्ध परिसर

स्प्राऊट या संस्थेने आरेमध्ये गेल्या २० वर्षांत केलेल्या अभ्यासातून येथील समृद्ध जैवविविधतेवर प्रकाश पडतो. या परिसरात सुमारे सस्तन प्राण्यांच्या १९ प्रजाती, पक्ष्यांच्या १३६ प्रजाती, सरीसृप आणि उभयचर वर्गाच्या ५० प्रजाती, फुलपाखरे आणि पतंग १०० प्रकारचे, चतुर आणि टाचण्या ४० प्रजाती, कोळी ९० प्रकारचे, इतर सूक्ष्म कीटक १००हून अधिक प्रजाती आहेत. तर स्थानिय वृक्ष आणि माडांचे ८० प्रकार आढळतात. त्याशिवाय झुडपे, वेली सुमारे ३०० प्रकारच्या आहेत. यातील सस्तन प्राणी, पक्षी आणि सरिसृप प्राणी यांचा समावेश भारतीय वन्यजीव कायद्यानुसार सूची १, २ आणि ३ मध्ये होतो.

३१६२

एकर आरे दुग्धवसाहतीसाठी १९४९ मध्ये संपादित केलेली जागा

१२८७

एकर जमीन केंद्र, राज्य सरकारच्या प्रकल्पांसाठी हस्तांतरित

१८७४

एकर आरे दुग्धवसाहतीकडे शिल्लक क्षेत्र

संकलन : सुहास जोशी