गेल्याच वर्षी ‘स्विस लीक्स’च्या माध्यमातून काळ्या पैशांसंदर्भातील महत्त्वपूर्ण माहिती ‘इंडियन एक्स्प्रेस’ने उघडकीस आणली होती. त्यानंतर पुन्हा एकदा पनामा पेपर्सच्या माध्यमातून जगभरातील सेलेब्रिटींची बनवेगिरी उघडकीस आणण्यात आली आहे. जगभरातील नामवंतांनी आणि सेलेब्रिटींनी करचुकवेगिरीसाठी परदेशात गोपनीयपणे कंपन्या स्थापन केल्याचे ‘द इंडियन एक्स्प्रेस’सह आंतरराष्ट्रीय स्तरावरील शोधपत्रकारितेतील संस्थांनी विविध कागदपत्रांच्या आधारे उघडकीस आणले आहे. या यादीतील नावांमुळे जगभरात अनेकांना धक्का बसला आहे. यादीतील भारतीय नावांमध्ये हिंदी चित्रपटसृष्टीतील महानायक अमिताभ बच्चन, अभिनेत्री ऐश्वर्या बच्चन, डीएलएफचे प्रवर्तक के पी सिंग, इंडियाबुल्सचे मालक समीर गेहलोत यांच्यासह अनेक दिग्गजांचा समावेश आहे. यादीमध्ये अनेक आंतरराष्ट्रीय स्तरावरील नावेही आहेत.

ऐश्वर्या बच्चन

ऐश्वर्या बच्चन, तिचे वडील कृष्णराज राय, तिची आई वृंदा कृष्णराज राय आणि भाऊ  आदित्य राय यांनी २००५ मध्ये ब्रिटिश व्हर्जन आयलंडमधील अमिक पार्टनर्स लिमिटेड या कंपनीचे संचालक म्हणून नोंदणी केली. त्यानंतर ऐश्वर्या या कंपनीची भागधारक म्हणून दाखविण्यात आली. २००८ मध्ये ही कंपनी बंद करण्यात आली.

अमिताभ बच्चन

परदेशातील चार शिपिंग कंपन्यांमध्ये अमिताभ बच्चन संचालक म्हणून दाखविण्यात आले होते. त्यापैकी तीन कंपन्या या बहामामध्ये होत्या. १९९३ मध्ये या कंपन्यांची स्थापन करण्यात आली. या कंपन्यांचे अधिकृत भांडवल ५ ते ५० हजार डॉलर इतके दाखविण्यात आले.

समीर गेहलोत

समीर गेहलोत यांनी लंडनमधील कमीत कमी तीन महत्त्वाच्या मालमत्ता कुटुंबीयांच्या मालकीच्या कंपन्यांच्या माध्यमातून मिळवल्या. या मालमत्तांची मालकी सध्या एसजी फॅमिली ट्रस्टकडे आहे. ऑक्टोबर २०१२ मध्ये या ट्रस्टची स्थापना करण्यात आली.

के पी सिंग

के पी सिंग यांनी ब्रिटिश व्हर्जन आयलंडमध्ये नोंदणी केलेली एक कंपनी २०१० मध्ये ताब्यात घेतली. यामध्ये त्यांची पत्नी इंदिरा यासुद्धा भागधारक म्हणून दाखवण्यात आल्या. त्यांचा मुलगा राजीव सिंग आणि मुलगी पिआ सिंग यांनी २०१२ मध्ये आणखी दोन कंपन्या स्थापन केल्या. सिंग कुटुंबीयांच्या मालकीच्या परदेशातील कंपन्यांची मालमत्ता एक कोटी डॉलर इतकी आहे.

अदानी बंधू

पनामा पेपसईमध्ये भारतीय उद्योजक अदानी यांचेही नाव आले आहे. अदानी बंधूंनी बहामा बेटांवर कंपनी स्थान केल्यानंतर दोनच महिन्यांत तिच्या नावात शहा असा बदल केला. २० एप्रिल २००५ रोजी विनोद आणि राकेश यांनी काही कागदपत्रांवर सही करून मोझ्ॉक फोन्सेकाऐवजी बहामातील ओव्हरसीज मॅनेजमेंट कंपनीची नोंदणीकृत एजंट म्हणून नेमणूक केली. हे हस्तांतरण २१ जुलै २००५ रोजी पूर्ण झाले. १९९३ साली अदानी समूहातील प्रमुख कंपनी अदानी एक्स्पोर्ट्स लिमिटेडची स्थापना झाली. तिचे आताचे नाव अदानी एंटरप्रायझेस लिमिटेड. विनोद हे अदानी समूहातील परदेशातील व्यवस्थापन पाहतात आणि त्यांचे चिरंजीव प्रणव अदानी एंटरप्रायझेस लि.चे संचालक आहेत.

अन्य नावे

यादीमध्ये गरवारे कुटुंबियातील अशोक गरवारे, आदित्य गरवारे, सुषमा गरवारे यांच्यासोबत शिशिर बजोरिया, ओंकार कंवर, राजेंद्र पाटील, हरीश साळवे, जहांगीर सोराबजी, मोहनलाल लोहिया, जवेरे पूनावाला, अनिल साळगावकर, तब्बसुम आणि अब्दुल रशिद मीर यांचाही समावेश आहे.