व्यंगचित्र म्हणजे चुटका नव्हे. ते लोकांना केवळ हसविण्याचे साधन नसते. उत्तम व्यंगचित्र हे आयुष्याकडे खेळकर दृष्टीने पाहायला शिकवते. आजच्या विसंगतींनी भरलेल्या काळात तर ही दृष्टी अत्यंत महत्त्वाची. महाराष्ट्राला हे आपल्या रेषांमधून शिकवले ते वसंत सरवटे यांनी. अत्यंत मर्मग्राही, चिंतनशील आणि तेवढीच प्रयोगशील अशी रेखाटनशैली यांद्वारे गेली कित्येक दशके त्यांनी मराठी माणसाला विचार करण्यास शिकविले. अर्थात ते त्यांचे काम करीत होते. माझा संगीत व्यासंग, खुच्र्या, गमती-गमतीत अशा व्यंगचित्रमालिका, अर्कचित्रे, पुस्तके-मासिकांची मुखपृष्ठे रेखाटत होते आणि त्यातून रसिकजन आनंद घेत शिकत होते.

व्यंगचित्रकार हा एका अर्थी जीवनाचा तिरकस भाष्यकारच. सरवटे हे व्यंगचित्रांचेही भाष्यकार होते. मुळात पाहणे या कलेबाबत आपला समाज तसा निरक्षरच. चित्रे, व्यंगचित्रे पाहण्यासाठी मनावर एक चित्रसंस्कार व्हावा लागतो. त्याबाबत आपण पहिल्यापासून उदासीन. ही उदासी दूर करण्याचा प्रयत्न म्हणजे सरवटे यांची व्यंगचित्र एक संवाद आणि व्यंगकला-चित्रकला ही दोन पुस्तके. वाचकांना, कलाप्रेमींना ज्ञानसमृद्ध करण्याची ताकद असलेल्या या पुस्तकांतून सरवटे यांची कलाविषयक भूमिकाही स्पष्ट झाली आहे. त्यांची व्यंगचित्रांची व्याख्या अतिशय साधी होती. व्यंग चित्रित करते ते व्यंगचित्र. त्यात रेखाटनकौशल्य असतेच. परंतु त्याला दुय्यम स्थान असते. पहिले स्थान असते ते भावना व्यक्त करण्याला. सरवटे यांच्या व्यंगचित्रांत भावना, विरूपीकरण असे विविध घटक चित्रविषयानुसार, आशयानुसार दिसत. क्विल निबने किंवा पेनाने काढलेल्या त्यांच्या एकाच जाडीच्या तिरकस रेषेने देशातील सामाजिक प्रश्न, कालानुरूप झालेले सांस्कृतिक बदल, साहित्य-कला व्यवहार अशा विविध क्षेत्रांतील विसंगती नेमक्या टिपल्या.

Actor Makrand Anaspure
महाराष्ट्रातल्या राजकीय परिस्थितीवर मकरंद अनासपुरेंचं परखड भाष्य, “आम्हा मतदारांची फसवणूक…”
Who Ask Question to Sharad Pawar?
“अजित पवारांच्या लग्नाला ३९ वर्षे होऊनही सून बाहेरची?”, शरद पवारांना कुणी विचारला प्रश्न?
uddhav thackeray and kangana
“भाजपाई कंगनाने तिचे अगाध ज्ञान पाजळून इतिहासाची…”, ठाकरे गटाचा टोला
Maharashtra
मुद्दा महाराष्ट्राचा… महाराष्ट्र समस्यांच्या विळख्यात का?

ते मूळचे कोल्हापूरचे. तेथील मातीत मूलतच असलेली कलेची आवड त्यांच्याही धमन्यांतून वाहात होती. ते शिकले मात्र स्थापत्य अभियांत्रिकी. पुण्याच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातून त्यांनी पदवी घेतली. एका कंपनीत नोकरी केली. तेथून १९८७ मध्ये निवृत्त झाले. तेव्हा व्यंगचित्रकला हा काही त्यांच्या पोटापाण्याचा व्यवसाय नव्हता. ती त्यांची हौस होती. त्यांच्या या हौसेचे मोल मात्र आपल्यादृष्टीने मोठे.

याचे कारण त्यांच्या व्यंगचित्रांतून गेल्या सुमारे पाच दशकांचा महाराष्ट्राचा सामाजिक-सांस्कृतिक पटच नव्हे, तर येथील मध्यमवर्गाच्या संक्रमणकाळाचा इतिहास रेषाबद्ध झाला आहे. मराठी मध्यमवर्गाची विचारपद्धती, त्याची मानसिकता, त्याच्या जगण्याच्या शैलीमध्ये झालेले बदल याचे दर्शनच त्यांच्या व्यंगचित्रांतून होते. ‘मराठी मध्यमवर्गीय जीवनाचा भाष्यकार म्हणून समकालीन साहित्यिकांइतकेच त्यांचे योगदानही महत्त्वाचे आहे’, अशा शब्दांत त्यांचा गौरव करण्यात आला आहे. श्री. ग. माजगावकरांच्या ‘माणूस’ साप्ताहिकात १९६९ ते ७२ या राजकीयदृष्टय़ा अस्थिर काळात त्यांनी राजकीय विषयांवर व्यंगचित्रे काढली. अबू अब्राहम किंवा आर. के. लक्ष्मण यांच्या तोडीचे राजकीय भाष्य त्यात असे, अशी दाद व्यंगचित्र-अभ्यासकांनी दिली आहे.  जीवनातील दांभिकता, विसंगती यांवर नेमके बोट ठेवणाऱ्या त्यांच्या व्यंगचित्रमालिका तर अजूनही रसिकांच्या स्मरणात आहेत. व्यंगचित्रमालिकांचे ‘परकी चलन’ सरवटे यांनीच मराठीत रुळवले. एवढेच नव्हे तर कॅरिकेचर या शब्दाला अर्कचित्र हा मराठी प्रतिशब्दही त्यांनीच दिला. अनेक नामवंत साहित्यिकांची अर्कचित्रे त्यांनी काढली. त्यातील पेन आणि शाई या माध्यमाने रेखाटलेले पुलंचे अर्कचित्र तर हुबेहूब पुलंचा अर्क. पण अर्कचित्रांत हुबेहूबपणापेक्षा अर्कालाच अधिक महत्त्व असायला हवे, याविषयीची सरवटे यांची जाण दिसते ती ‘ठणठणपाळ’च्या चित्रात! साहित्याची द्वारपालकी करणाऱ्या त्या हातोडाधारी मल्लाचे डोळे आणि हसू, एवढेच काय ते जयवंत दळवींसारखे. त्यांचे आणखी रसिकस्मरणात वसलेले वैशिष्टय़ म्हणजे त्यांनी अ-प्राण वस्तूंत ओतलेला प्राण. नाभिकाकडल्या खुर्चीच्या तोंडी शिळोप्याचीच भाषा- ‘एक फालतू विनोद करायचा तर.. टक्कलवंताला आमची काय गरज?’ किंवा, कोल्हापुरी चपलेचा जोड. त्यातील एक चप्पल दुसरीला म्हणते – ‘आपुन सारं जग हिंडलो, अमेरिकेत ग्येलो, मॉस्कोला ग्येलो, सगळीकडे हिंडलो, पन कोल्हापुरातल्या कोल्हापुरात असून अंबाबाईचं दर्शन काय आपल्या नशिबात न्हाई बग!’ .. निर्जीव वस्तूंनाही भावना असू शकतात हे जणू खरेच वाटू लागावे, अशी त्यांच्या व्यंगचित्रांची ताकद होती.  ती दिसली वेगळ्या अर्थाने ‘ललित’च्या मुखपृष्ठांतून. त्या मुखपृष्ठांवरील संकल्पनात्मक चित्रांतून त्यांनी त्या-त्या विषयावर केलेले भाष्य म्हणजे रेषांतून लिहिलेला लेखच.  ही क्षमता अर्थातच केवळ रेखाटनकौशल्यातून आलेली नसते. सरवटेंची शैली घडली ती त्यांच्या आत्मचिंतनातून आणि प्रयोगशीलतेतून.

chart

या शैलीने मराठी व्यंगचित्रांमध्ये स्वतची ओळखच नव्हे, तर अढळ स्थान निर्माण केले.

हास्यचित्रसंग्रह

  • खडा मारायचा झाला तर..
  • सावधान! पुढे वळण आहे..
  • खेळ रेषावतारी
  • खेळ चालू राहिला पाहिजे..!
  • रेषालेखक वसंत सरवटे

लेखसंग्रह

  • परकी चलन (विदेशी व्यंगचित्रकारांच्या कलाकृतींवरील रसग्रहणात्मक लेखसंग्रह)
  • व्यंगचित्रे – एक संवाद
  • सहप्रवासी
  • व्यंगकला – चित्रकला
  • संवाद रेषालेखकाशी

पुरस्कार

  • महाराष्ट्र राज्य सरकारचा उत्कृष्ट साहित्य पुरस्कार – सावधान! पुढे वळण आहे, व्यंगचित्रे -एक संवाद, सहप्रवासी
  • इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ काटरूनिस्ट्सचा जीवनगौरव पुरस्कार (२००९)

प्रदर्शने

  • खेळ रेषावतारी (हास्यचित्र, अर्कचित्र प्रदर्शन)
  • चित्रमय पुलं (पुलंच्या साहित्यासाठी केलेली मूळ कथाचित्रे)

साहित्याची जाण असलेला चित्रकार

वसंत आणि मी दोघेही कोल्हापुरातले बालमित्र. वयाच्या दहाव्या, अकराव्या वर्षांपासून आम्ही एकत्र असायचो. शालेय शिक्षण झाल्यावर मी जे. जे. कला महाविद्यालयात प्रवेश घेतला आणि त्याने अभियांत्रिकी शाखेला प्रवेश घेतला. गेली जवळपास ऐंशी वर्षे आम्ही एकमेकांच्या चांगल्या-वाईट प्रत्येक गोष्टीत सहभागी होतो. अगदी शाळेतील चित्रकलेच्या प्राथमिक परीक्षेपासून आमचा चित्रकलेचा प्रवासही एकत्रच सुरू झाला. अभियांत्रिकीला गेल्यानंतरही त्याला कायमच चित्रकलेत रस होता. अनेक चित्रे आम्ही एकत्र काढली आहेत. एकमेकांच्या पहिल्या पुस्तकाच्या प्रकाशनाचे, प्रदर्शनाचे आम्ही साक्षीदार होतो. कलाकृतींचे आम्ही साक्षीदार होतो. साहित्याची जाण असलेला चित्रकार असे त्याच्याबद्दल सांगता येईल. त्याच्या चित्रातून एक साहित्यकृती उभी राहाते. व्यंगचित्रे किंवा अर्कचित्रांबरोबरच पेंटिंग्जचा दर्जाही त्याने वाढवला. त्याने लिखाणही उत्तम केले होते. त्याचे लेखन हे मला कायमच साक्षेपी आणि समतोल वाटत आले आहे. कोणत्याही गोष्टीच्या मुळाशी जाऊन विचार करण्याची त्याची सवय होती. एखाद्या गोष्टीचा गाभा मांडण्याची त्याची खुबी त्याची चित्रे आणि लेखनातून दिसून येते.

शि. द. फडणीस, ज्येष्ठ व्यंगचित्रकार

 

अर्कचित्रे साहित्याइतकीच बोलकी..

वसंत सरवटे आणि मी परिचित होतो; पण माझ्यापेक्षा त्यांची माझे मोठे बंधू विजय तेंडुलकर यांच्याशी अधिक मैत्री होती. त्याच्या काही पुस्तकांसाठी त्याने चित्रेही काढली होती. त्यांच्या व्यंगचित्रांच्याबाबत बोलायचे झाले, तर मी त्यांचा मोठा चाहता आहे. व्यंगचित्रांच्याबाबत त्यांचा स्वत:चा मार्ग होता. त्यांच्यासारखी चित्रे काढणे दुसऱ्या कुणालाही जमले नाही, जमणार नाही. शब्दविरहित अर्कचित्रे रेखाटण्यात त्यांचा हातखंडा होता. शब्द नसतानाही अनेक बोलकी चित्रे त्यांनी रेखाटली आहेत. काही चित्रे एकदा पाहिली तरीही कायम त्याच्या आशयासकट लक्षात राहतील अशी आहेत. उदाहरणच द्यायचे झाले तर प्रश्नचिन्हावर बसलेला माणूस आणि प्रश्नचिन्हाने त्याला उडवून लावले आहे.. अशी अनेक चित्रे दीर्घकाळ लक्षात राहिली आहेत. ज्या चित्रांना ओळी दिल्या होत्या, त्यादेखील अत्यंत मार्मिक आहेत. जयवंत दळवींचा ‘ठणठणपाळ’ त्यांनी अजरामर केला. पु. ल. देशपांडे यांच्या अनेक साहित्यकृतींसाठी त्यांनी रेखाटलेली अर्कचित्रे ही साहित्याइतकीच बोलकी आहेत.

मंगेश तेंडुलकर, ज्येष्ठ व्यंगचित्रकार

 

विचारांना चालना देणारे व्यंगचित्रकार

वसंत सरवटे हे केवळ व्यंग्यचित्रकार नव्हते. ते एक सर्जनशील साहित्यिक व्यंग्यचित्रकार होते. गेली सुमारे साठ वर्षे मराठीतील व्यंग्यचित्रकलेवर त्यांची एक स्वतंत्र मुद्रा आहे. राजकीय, सामाजिक आणि साहित्य या तीन विषयांत आज त्यांनी केलेले काम बघताना आपल्याला केवळ मिश्किल हसू येत नाही, तर त्यांची ही व्यंग्यचित्रे तुमच्या विचारांनाही चालना देतात, हे जाणवते. ज्या व्यंग्यचित्रकाराची साठ वर्षांपूर्वीची चित्रेही तुम्हाला आज ताजी वाटतात, तो सर्वार्थाने मोठा चित्रकार असतो. वसंतराव हे त्या दर्जाचे मराठीतील व्यंग्यचित्रकार होते. त्याबरोबरच माणूस म्हणूनही ते फार मोठय़ा उंचीवर होते. मााझ्या व्यक्तिगत घडणीत आणि माझी कलाविषयक समज वाढविण्यात वसंतरावांचे योगदान फार मोठे आहे. मी त्यांना आदरांजली वाहतो.

दिलीप माजगावकर, राजहंस प्रकाशन

 

त्यांच्या रेखाटनाची शैलीच वेगळी..

जुन्या पिढीतील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ असा हा व्यंगचित्रकार हरपल्याबद्दल अत्यंत वाईट वाटते. १९७५ साली त्यांची आणि माझी ‘मौज’च्या कार्यालयात पहिल्यांदा ओळख झाली होती. त्यावेळी व्यंगचित्रकारितेच्या क्षेत्रात मी अगदी नवखा होता. पाच वर्ष नुसतीच धडपड करत होतो. पहिल्याच भेटीत आमच्या गप्पा रंगल्या. व्यंगचित्रकाराने साहित्यिकांशी नेहमी ओळखी ठेवल्या पाहिजेत, साहित्याचे सातत्याने आणि विपुल वाचन केले पाहिजे, असा आग्रहाचा सल्ला त्यांनी मला त्या गप्पांमध्ये दिला होता. त्यांच्या रेखाटनाची शैलीच वेगळी असल्याने मी त्यांच्या चित्रांचा चाहता बनलो होतो. दोन वर्षांपूर्वी ‘आम्ही पार्लेकर’साठी मुलाखतीच्या निमित्ताने त्यांना भेटण्याचा योग आला होता. त्यानंतर मधून मधून दूरध्वनीवर गप्पा व्हायच्या. अतिशय थोर असा हा व्यंगचित्रकार होता.

श्रीनिवास प्रभुदेसाई

 

सामाजिक विषय हाताळणारा व्यंगचित्रकारलेखक

वसंत सरवटे हे प्रख्यात व्यंगचित्रकार. त्यांचा सहवास मला वीस वर्ष शेजारी म्हणून लाभला. सरवटेंची व्यंगचित्रे ही मुख्यत: सामाजिक विषय हाताळणारी होती. बारीक रेषेतून शैलीदारपणे कागदावर उमटणारी व्यंगचित्रे ही त्यांची खासियत होती. सरवटे नेहमी म्हणत आपल्याकडे लोक नेहमी चित्रे पाहतात. त्यातील आशय कधीच समजून घेण्याचा प्रयत्न करत नाहीत. त्यांच्यात व्यंगचित्रांबद्दल जाण निर्माण व्हावी यासाठी त्यांनी या विषयांवर आठ ते नऊ पुस्तके लिहिली आहेत. त्यांच्याएवढे व्यंगचित्र-अर्कचित्र कला यावर मराठीत कोणीही एवढे विपुल लेखन केलेले नाही. कित्येकदा व्यंगचित्रकार आपली चित्रे काढून समाधान मानतात. मात्र सरवटे तसे नव्हते. त्यांनी या विषयाचा प्रचंड अभ्यास केला, काम के ले होते. ते उत्कृष्ट व्यंगचित्रकार जसे होते तसेच ते उत्तम चित्रकारही होते.

विजय तेंडुलकरांपासून जयवंत दळवी, पुलंच्या पुस्तकांसाठी त्यांनी केलेली मुखपृष्ठे आणि पुस्तकातील रेखाटने ही त्यांच्या कलेची साक्ष आहेत. ‘ललित’ मासिकासाठी त्यांनी तब्बल ५० वर्ष मुखपृष्ठ रेखाटन केले, हाही एक विक्रम आहे. ‘पुलं एक साठवण’ या पुस्तकासाठी त्यांनी केलेल्या रेखाटनांचे खुद्द पुलंनी कौतूक केले होते.

काहीवेळा माझ्या पुस्तकातील लेखनापेक्षा सरवटे यांनी काढलेली चित्रे अधिक बोलतात. माझ्या विचारांना पुढे नेतात, अशा शब्दांत त्यांनी सरवटे यांच्या कलेला दाद दिली होती. आपली चित्रे ही लेखकांच्या लेखनाला पूरक असली पाहिजेत, त्यांचा आशय पुढे नेणारी असली पाहिजेत, हा सरवटे यांचा आग्रह शेवटपर्यंत कायम होता. त्यांनी प्रख्यात लेखकांची अर्कचित्रे काढली आणि त्या त्या वेळी ती चित्रे त्या व्यक्तींनाही भावलेली आहेत. त्यांच्याएवढे काम या क्षेत्रात अन्य कोणीही करू शकलेले नाही.

अशोक कोठावळे, प्रकाशक