scorecardresearch

सर्वकार्येषु सर्वदा  : संगीतसाधनेचा पारिजातक

बदलत्या काळानुसार या शिक्षणाची व्याप्ती वाढवण्याचा संकल्प मंडळाने केला आहे..

दयानंद लिपारे

इचलकरंजीचे ‘पंडित बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर संगीत साधना मंडळ’ गेली पाच दशके निर्व्याज संगीतसेवा करीत आहे. मंडळातर्फे गायन-वादनाबरोबरच भरतनाटय़म, कथ्थक नृत्य अशा सर्व प्रकारचे शिक्षण मोफत दिले जाते. बदलत्या काळानुसार या शिक्षणाची व्याप्ती वाढवण्याचा संकल्प मंडळाने केला आहे..

भारतीय संगीतातील गंगोत्री समजल्या जाणाऱ्या ग्वाल्हेरला महाराष्ट्रातील अनेक कलावंत गेले. त्यांच्यापैकी परत आलेल्या पंडित बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांनी महाराष्ट्रात संगीताचे झाड लावले. ते बहरले. त्याने संगीतसुरांना ज्ञानाची जोड दिली. संगीतविद्या संपादल्यानंतर बाळकृष्णबुवा परतलेच नसते, तर महाराष्ट्रातील संगीताचे  नुकसान झाले असते. बुवांनी संगीत विद्यादानाचे जे अभूतपूर्व कार्य के ले, ते महाराष्ट्राची मान उंचावणारे आहे. गायनाचार्यानी गायनकलेत आपल्या प्रतिभेने गुरुपदाचे स्थान भूषवले होते.

गेल्या पाच दशकांहून अधिक काळ संगीतसाधनेचे कार्य करणाऱ्या ‘पंडित बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर संगीत साधना मंडळा’च्या वास्तुनिर्मितीची कहाणीही ‘पुल’कित करणारी आहे.

इचलकरंजी येथे १९७४ साली झालेल्या सुवर्णमहोत्सवी मराठी साहित्य संमेलनावेळी अध्यक्षीय भाषणात महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांनी इचलकरंजीत पंडित बाळकृष्णबुवा यांचे स्मारक नसल्याची खंत व्यक्त केली होती. ती गोष्ट इचलकरंजीकरांच्या मनाला फारच लागली. त्यांनी मनावर घेतले आणि पाहता पाहता स्मारक उभारणीला वेग आला.

शं. बा. माळी मास्तर यांनी त्यांची मध्यवर्ती ठिकाणची जागा देणगी स्वरूपात संगीत साधना मंडळाला दिली. इंग्रजी विषयाचे नामवंत शिक्षक पु. मा. रानडे यांनी त्यांना नागरी सत्कार सोहळ्यात मिळालेली सर्व ५१ हजार रुपयांची रक्कम देणगी म्हणून वास्तू उभारणीसाठी दिली. त्यानंतर कलाप्रेमींच्या देणगी देण्यासाठी रांगा लागल्या. मंडळाचे अध्यक्ष  दत्ताजीराव कदम यांनी देणगी गोळा करण्याचे प्रयत्न केले. सकळांच्या प्रयत्नांना यश आले आणि संगीताची सेवा करणारे एक सुसज्ज – संपन्न दालन आकाराला आले.

संगीत साधना मंडळाचे तत्कालीन अध्यक्ष गजाननराव कांबळे, स्वागत समितीचे अध्यक्ष अनंतराव भिडे आणि सहकाऱ्यांनी वास्तू उद्घाटनाचा शानदार कार्यक्रम आयोजित केला.

पं. बाळकृष्णबुवा यांच्या ५२ व्या पुण्यतिथीनिमित्त ९ फेब्रुवारी १९७९ रोजी या वास्तूचे उद्घाटन झाले. बुवांच्या सभागृहातील अर्धपुतळ्याचे अनावरण पंडित कु मार गंधर्व यांच्या हस्ते झाले.

पु. ल. देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ अपूर्व उत्साहात झाला. यानिमित्त सलग तीन दिवस चाललेल्या संगीत महोत्सवात पंडित मल्लिकार्जुन मन्सूर, डॉ. वसंतराव देशपांडे, पं. कुमार गंधर्व, विदुषी वसुंधरा कोमकली अशा प्रतिभावंतांच्या स्वरवर्षांवात रसिक चिंब झाले.

स्वर आणि लयीचा पारिजातक ‘पंडित बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर संगीत साधना मंडळा’त फुलला. तो वर्षांनुवर्षे संगीतप्रेमींवर सुरेल स्वरांचा शिडकावा करीत आहे.

पं. बाळकृष्णबुवा इचलकरंजीजवळच्या चंदूर गावचे. घरची गरिबी असतानाही वयाच्या दहाव्या वर्षी त्यांनी संगीत शिकण्याच्या ध्यासाने गाव सोडले. मजल-दरमजल करीत ग्वाल्हेर गाठले. ग्वाल्हेर ख्याल शैलीतील हिंदुस्तानी संगीतासाठी तेव्हा सुप्रसिद्ध होते. तिथे हद्दु-हस्सु खाँ यांचे शिष्य पं. वासुदेवराव जोशी यांच्याकडे त्यांनी गुरुसेवा करून ख्याल गायकीचे ज्ञान मिळवले. त्यानंतर ते मुंबईला आले. तेथे संगीत विद्यालय सुरू केले. विष्णू दिगंबर पलुस्कर, रामकृष्ण भांडारकर यांच्यासारखे अनेक विद्वान त्यांचे शिष्य होते.

पं. बाळकृष्णबुवांनी मग सातारा, औंध, मिरजेत वास्तव्य केले आणि शेवटी १९०० सालापासून आयुष्याच्या अखेपर्यंत सलग २५ वर्षे ते इचलकरंजीचे संस्थानिक श्रीमंत नारायणराव घोरपडे यांच्याकडे राजदरबारी गवई म्हणून संगीतसेवा देत राहिले. गायनाचार्यानी म्हैसूर, मुंबई, कोलकाता, दिल्ली, लाहोर असे दौरे करून अस्सल गायकीच्या दिमाखाने दिग्गजांना दिपवले. भारतभर त्यांच्या नावाचा विलक्षण दबदबा निर्माण झाला होता. कलेचा अमोल ठेवा त्यांनी मुक्तहस्ताने शिष्यवर्गाला विनामोबदला दिला.

स्मृती मंदिर साकारले..

अखिल भारतीय कीर्तीच्या या संगीतसम्राटाचे निर्वाण होऊन दीर्घकाळ लोटला होता. त्यांची पुण्यस्मृती चिरंतन ठेवण्याच्या दिशेने १९६५ सालादरम्यान पावले पडू लागली. संगीत क्षेत्रातील मंडळी पं. बाळुबुवा हजारे यांच्या घरी जमत असत. तेव्हा पं. द. वि. काणे बुवा यांनी बाळकृष्णबुवांच्या नावाचे मंडळ सुरू करण्याचा विचार बोलून दाखवला. त्यानंतर ‘पंडित बाळकृष्णबुवा संगीत साधना मंडळ’ १९६७ मध्ये स्थापन झाले. पुढे पु. ल. देशपांडे यांच्या सूचनेनुसार अमूर्त कल्पनेपासून सुरूझालेला बुवांच्या स्मारकाचा प्रवास स्मृती मंदिराच्या साकार शिल्पापर्यंत सुफळ झाला. या कार्याला अनेक संगीतप्रेमींनी, बुवांच्या चाहत्यांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी मदत केली. लक्ष्मीचा वरदहस्त असलेल्या वस्त्रनगरीने विविध विद्या आणि कला क्षेत्रातील सरस्वती मंदिरांना काही कमी पडू दिले नाही. त्यातून या नगरीत निर्भेळ आनंद देणाऱ्या संगीतकलेचे नितांत सुंदर स्मारक आकाराला आले. पुढे अनेक उपक्रम या वास्तूमध्ये होत राहिले. नव्या उमेदीने कार्य करणारे सदस्य पुढे आले. ख्यातनाम गायक पं. द. वि. काणे यांनी बाळकृष्णबुवांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम सुरू केला. संगीत शिक्षक, कीर्तनकार प्रभाकरबुवा शेंडे यांनी आपले संगीत शिकवणीचे वर्ग बंद करून मंडळात विनामूल्य वर्ग सुरू केले. आज या शिक्षणवर्गात सुमारे १५० विद्यार्थी शिक्षण घेत असतात. तसेच परिसरातील तीनशे ते साडेतीनशे विद्यार्थी संगीत परीक्षा देतात.

हवा मदतीचा हात..

प्रारंभीच्या काळात उत्साही सदस्य ३५ रुपये वार्षिक वर्गणी काढून संस्थेचे कार्य चालवत.  इचलकरंजीतील सहकारी संस्थांही मदतीचा हात देतात. इचलकरंजीचे श्रीमंत आबासाहेब घोरपडे सरकार, दत्ताजीराव कदम, आबासाहेब खेबुडकर, कल्लाप्पाण्णा आवाडे आदी मंडळींनी आर्थिक अडचण भासणार नाही याची काळजी वाहिली. या वास्तूला आता ४० वर्षे होऊन गेली.

कालौघात संस्थेच्या गरजा आणि लोकांची जीवनशैली बदलली आहे. त्यानुसार वास्तूमध्ये काही बदल करणे गरजेचे झाले आहे. वास्तू बांधताना वर्तुळाकार प्रेक्षागृह बांधले होते. त्यामध्ये भारतीय बैठकीनुसार दीडशे रसिक बसू शकतात. पण सध्या अधिक आसनव्यवस्था गरजेची आहे. त्यामुळे मोठे प्रेक्षागृह बांधण्याचा संस्थेचा संकल्प आहे.

मंडळामार्फत अखिल भारतीय गांधर्व मंडळाच्या गायन-वादन परीक्षा होत असल्याने विद्यार्थ्यांची तयारी करून घेण्यासाठी शिकवणी वर्ग अपुरे पडत आहेत. पहिल्या मजल्यावर अशा चार वर्ग खोल्या बांधण्याचा संकल्प आहे. संगीत विद्या शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि संगीत साधना करणाऱ्या नव्या पिढीसाठी विविध प्रकारच्या वाद्यांची आवश्यकता आहे. बालवाद्यवृंद तयार करण्याची कल्पना आहे. त्याकरिता वाद्यांची आवश्यकता आहे. या सर्व कार्यासाठी ३५ ते ४० लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. नियोजित बांधकामाचा आराखडा तयार आहे. करोना उद्रेकामुळे हे काम थांबले आहे. हे संकट संपल्यानंतर कामांना गती दिली जाणार आहे.

संस्थेने आजपर्यंतचे सर्व काम वर्गणीतून केले आहे. कार्यक्रम विनामूल्य संगीतसेवेच्या भावनेने केले आहेत. संस्थेला आजवर शासकीय मदत, अर्थसाहाय्य मिळालेले नाही. इतकी वर्षे निरपेक्ष भावनेने काम करणाऱ्या या संस्थेला हाती घेतलेले संगीतविषयक उपक्रम पूर्णत्वास नेण्यासाठी, संगीताची साधना अखंड सुरू ठेवण्यासाठी आर्थिक मदतीची गरज आहे, असे मंडळाचे अध्यक्ष अशोक सौंदत्तीकर यांनी सांगितले.

दिग्गज येती..

‘पंडित बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर संगीत साधना मंडळा’ने आत्तापर्यंत आयोजित केलेल्या गानमेळ्यात पं. भीमसेन जोशी, पं. जसराज, रामभाऊ  जोशी, उस्ताद अब्दुल जाफरखान, राजन साजन मिश्र, हरिप्रसाद चौरसिया, शिवकुमार शर्मा, जितेंद्र अभिषेकी, किशोरी आमोणकर, परवीन सुलताना, मालिनी राजूरकर, प्रभा अत्रे हे दिग्गज, त्याचबरोबर नव्या पिढीतील पं. वेंकटेश कुमार, केदार बोडस, आरती अंकलीकर-टिकेकर, शिवानंद पाटील, ऋषिकेश बोडस यांनीही वेळोवेळी येऊन संगीतसेवा केली आहे. त्यांचे गायन ही मंडळाच्या कार्याला मिळालेली मानवंदना आहे, अशी भावना संस्थेचे कार्यवाह उमेश कुलकर्णी यांनी व्यक्त केली.

संस्थेपर्यंत कसे जाल?

कोल्हापूर किंवा सांगली येथून इचलकरंजी अंदाजे २७ कि.मी. आहे. एसटीने प्रवास करता येतो. मुख्य पोस्ट कार्यालय, मंगलधाम रस्ता इचलकरंजी (४१६११५) येथे संस्थेचे मध्यवर्ती कार्यालय आहे.

 संस्थेपर्यंत कसे जाल?

पंडित बाळकृष्णबुवा संगीत साधना मंडळ

Pandit Balkrishna Buva Sangit Sadhana Mandal

या नावाने धनादेश काढावा. धनादेशामागे किंवा त्याबरोबर देणगीदाराने आपले संपूर्ण नाव, पत्ता, दूरध्वनी तसेच भ्रमणध्वनी क्रमांक लिहावा.

संस्था ८०-जीकरसवलतपात्र नाही.

संगीत सेवा.. मंडळातर्फे गायन-वादन, भरतनाटय़म, कथ्थक नृत्य असे सर्व प्रकारचे शिक्षण दिले जाते. वर्षभर सुरांची मैफल सुरू असते. वार्षिक महोत्सव, पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर पुण्यतिथी,  गुरुपौर्णिमा, आषाढी एकादशी, काणेबुवा पुण्यतिथी, युवा संगीत संमेलनातून संस्थेची संगीतसेवा सुरू आहे.

धनादेश येथे पाठवा..

एक हजार किंवा त्याहून अधिक रुपयांची देणगी देणाऱ्यांची नावे लोकसत्तात प्रसिद्ध केली जातील.

मुंबई कार्यालय

लोकसत्ता, संपादकीय विभाग,मफतलाल सेंटर, सातवा मजला, नरिमन पॉइंट, मुंबई – ४०००२१,  ०२२-६७४४०२५०

महापे कार्यालय  

संपादकीय विभाग, प्लॉट नं. ईएल १३८, टीटीसी इंड. एरिया, एमआयडीसी, महापे, नवी मुंबई – ४००७१०.  ०२२-२७६३९९००

ठाणे कार्यालय    

संपादकीय विभाग, कुसुमांजली बिल्डिंग, दुसरा मजला, गोखले रोड, नौपाडा, ठाणे.  ०२२-२५३९९६०७

पुणे कार्यालय      

संपादकीय विभाग, एक्स्प्रेस हाऊस, प्लॉट नं. १२०५/२/६, शिरोळे रस्ता, पुणे- ४११००४.  ०२०-६७२४११२५

नाशिक कार्यालय       

संपादकीय विभाग, स्टेडियम कॉम्प्लेक्स नं. ६, पहिला मजला, महात्मा गांधी मार्ग, नाशिक – ४२२००१.  ०२५३-२३१०४४४

नागपूर कार्यालय       

संपादकीय विभाग, प्लॉट नं. ३८, अ‍ॅडिसन ट्रेड सेंटर, अंबाझरी, नागपूर – ४४००१०, ०७१२ झ्र् २२३०४२१

दिल्ली कार्यालय       

संपादकीय विभाग, द इंडियन एक्स्प्रेस बिल्डिंग, बी१/ बी, सेक्टर १०, नॉएडा- २०१३०१.

०१२०- २०६६५१५००

मराठीतील सर्व विशेष ( Vishesh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sarva karyeshu sarvada 2020 pandit balkrishna buva sangit sadhana mandal zws