– राधिका पार्थ
दोन महिन्यांपासून हिंदी चित्रपटसृष्टीला दिग्गज अभिनेत्यांच्या निधनाने धक्के बसत आहेत. आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे प्रसिद्ध अभिनेते ऋषी कपूर, इरफान खान यांच्या जाण्याने अगोदरच बॉलिवूडचे नुकसान झालेले होते. त्यात आज प्रसिद्ध संगीतकार वाजीद खान यांनादेखील अवेळी जगातून निरोप घ्यावा लागला. वयाचा विचार करता अजूनही बॉलिवूडला इरफान खान असो की वाजीद खान यांच्या योगदानाची गरज होती. मात्र, असाध्य आजाराने त्यांची पाठ सोडली नाही. त्यामुळे इराफान खान यांच्यासारखे वाजीद खान यांनाही जग सोडावे लागले.
वाजीद खान मागील दोन महिन्यांपासून किडनीच्या आजाराने त्रस्त होते. असं सांगितलं जात आहे की, ‘‘त्यांची किडनी ट्रान्सप्लांट करण्यात आली होती. त्यात करोना विषाणूनेही त्यांच्या या आजारात भर घातली. त्यांची प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे रविवारी रात्री त्यांची तब्येत आणखीच बिघडली अन् सोमवारी त्यांचे निधन झाले. वाजीद खान यांच्या अकाली जाण्याने सपूर्ण चित्रपटसृष्टी दुःखात आहे. अमिताभ बच्चन, मनोज वाजपेयी, वरुन धवन यांच्यासारख्या सिनेतारकांनी शोक व्यक्त केला आहे. वाजीद खानच्या जाण्याने साजीद खान यांना मोठा धक्का बसला आहे.
संगीत जगतातील प्रसिद्ध जोडी म्हणून साजीद-वाजीद समजली जात होती. हिंदी चित्रपटसृष्टीत या जोडीने अनेक सुपरहीट गाणी दिली आहेत. या जोडीने सलमान खानच्या चित्रपटांपासून बॉलिवूडच्या संगीतक्षेत्रात प्रवेश केला आणि आश्चर्याची बाब म्हणजे वाजीद खान यांनी शेवटचे संगीतही सलमान खानच्या नुकत्याच रिलीज केलेल्या ‘भाई-भाई’ या गाण्यासाठी दिले होते. दबंग चित्रपटासाठी साजीद-वाजीद खान या जोडीला अनेक पुरस्कारदेखील मिळाले होते. त्यावेळी वाजीद खान म्हणाले की, ‘‘या पुरस्काराचे सर्व श्रेय सलमान खान यांना जाते. लोक आमच्यावर विश्वास ठेवत नव्हते तेव्हा सलमान खान यांनी आमच्यावर विश्वास ठेवला. आज आम्ही जे काही आहोत, त्यामध्ये सलमान भाईंची खूप मोठी भूमिका आहे.’’ वाजीद खानच्या जाण्याने सलमान खानला मोठा धक्का बसला आहे.
साजीद-वाजीद या जोडीने १९९८ साली सोहेल खानच्या ‘प्यार किया तो डरना क्या’ या चित्रपटापासून सुरूवात केली होती. त्यानंतर सलमान खानच्या कित्येक चित्रपटांना त्यांनी संगीत दिले. हॅलो ब्रदर, तेरे नाम, गर्व, मुझसे शादी करोगी, पार्टनर यासारख्या चित्रपटांना त्यांनी संगीत दिले. वाजीद खान फक्त संगीतकारच नव्हते तर, प्रसिद्ध गायकदेखील होते. त्यांनी दबंग, एक था टायगर, सत्यमेव जयते या चित्रपटांतील गाण्यांना आपला आवाज दिला आहे. ‘जलवा’, ‘फेविकोल से’, ‘रावडी राठोड’, ‘चिंता ता चिता चिता’, ही लोकप्रिय गाणी साजीद-वाजीद या जोडीने हिंदी चित्रपटसृष्टीला दिली आहेत. वाजीद खान यांनी छोट्या पडद्यावरील संगीत कार्यक्रमातून अनेक नवोदित गायकांना संधी दिली होती. त्यांपैकी अनेक गायक मुख्य प्रवाहात आघाडीचे गायक म्हणून लोकप्रियदेखील झालेले दिसून येतात.