-सुनिता कुलकर्णी

माणसाच्या हौसेला मोल नसतं असं म्हणतात. काही दिवसांपूर्वी बार्शीमधल्या एकाने सोन्याचा मास्क (मुखपट्टी) तयार करून घेतल्याची बातमी प्रसिद्धी माध्यमांमधून झळकली होती. त्यानंतर सोन्याच्या मास्कच्या डिझाइनमध्ये आणखी वैविध्य आलं. आता तर सूरतमध्ये सोन्याचांदीच्या व्यापाऱ्यांनी हिरेजडित मास्क बाजारात आणल्याची बातमी आहे. एन-95 तसंच थ्री प्लाय प्रोटेक्शन मास्कवर हिरे जडवून हे मास्क तयार करण्यात आले आहेत. यात सिंथेटिक हिऱ्यांचा मास्क दीड लाखांपर्यंत तर खऱ्या हिऱ्यांचा मास्क साडेचार लाखांपर्यंत आहे. लग्नबिग्न समारंभात मास्कपण चांगला दिसावा अशी लोकांची इच्छा असल्यामुळे या दोन्ही प्रकारच्या मास्कना चांगली मागणी आहे म्हणे.

असं असेल तर धन्यच आहे. आत्तापर्यंत कपड्यांच्या रंगसंगतीशी, डिझाइनशी सुसंगत मास्क, डिझायनर मास्क इथपर्यंत चाललं होतं तोपर्यंत सुसह्य होतं. पण आता हे सोनंचांदीचे, (हो, आता कुणी चांदीप्रेमी चांदीचाही मास्क तयार करून घेईल.) हिऱ्यांचे मास्क म्हणजे जरा जास्तच झालं.

मुळात मास्क वापरायचे आहेत ते वैद्यकीय कारणांसाठी. ते अगदीच भकास असण्यापेक्षा थोडे चांगले दिसणारे असावेत ही अपेक्षा कुणीही समजू शकतो. पण ते सोन्याचांदीचे, हिऱ्यांचे असावेत ही काय अपेक्षा आहे ?आत्ताच्या काळात ही सौंदर्यासक्ती नाही तर संपत्तीचं ओंगळवाणं प्रदर्शनच नाही का?

मग फक्त मास्कच सोन्याचे आणि हिऱ्यांचे कशाला हवेत? उद्या करोनासंसर्ग होऊन रुग्णालयात भरती झाल्यावर ऑक्सिजनची गरज निर्माण झाली तर तो लावायचा सिलेंडर सोन्याचा किंवा हिरेजडित हवा अशी अपेक्षा कुणी करेल. तसं आवरणही कुणी ज्वेलर्स तयार करून विकायला सुरूवात करतील. व्हेंटिलेटर लावावा लागला तर तोही सोन्याचांदीचा आणि हिरेजडित हवा अशी एखाद्या लब्धश्रीमंताची अपेक्षा असेल आणि ती पूर्ण करून देणारेही असतील.
न जाणो उद्या करोनावर लस निघाल्यावर हे महाभाग ती सोन्याच्या सुईने टोचण्याचा किंवा हिऱ्यामोत्याने मढवलेल्या चमच्याने पाजण्याचा आग्रह धरतील.

सौंदर्यासक्तीचा, संपत्तीचं प्रदर्शन करण्याचा आग्रह समजण्यासारखा आहे. सोन्याचांदीचा, हिऱ्यामाणकांचा सोसही समजण्यासारखा आहे. पण तो कुठे कराल याचं तरी भान बाळगाल की नाही ?