12 August 2020

News Flash

ऑनलाइन बिनलाइन

डिजिटल माध्यम आणि ई—लर्निगची पाळंमुळं रुजताना दिसत आहेत.

वैष्णवी वैद्य

जून महिना सुरू झाला की दोन गोष्टींचे वेध लागतात, पावसाळा आणि शाळा—कॉलेज. एव्हाना नवीन दप्तर, वह्य़ा, पुस्तके, अगदी पावसाळी चपलांपासून ते कपडय़ांपर्यंतची फॅशन आणि शॉपिंग तरुणांमध्ये दिसायला लागते. सध्याच्या परिस्थितीत हे सगळे चित्र बदलले आहे. अनलॉक १.० लागू झाले असले तरीही शाळा, कॉलेज पूर्ववत सुरू करण्याची परिस्थिती निर्माण झालेली नाही. या पार्श्वभूमीवर शैक्षणिक वर्ष एका वेगळ्या स्वरूपात सुरू होताना दिसते आहे. डिजिटल माध्यम आणि ई—लर्निगची पाळंमुळं रुजताना दिसत आहेत. हेच कदाचित पुढच्या काळाचे भवितव्य आहे. शिक्षण क्षेत्रात अभ्यासक्रमापासून ते निकषांपर्यंत अनेक बदल होत गेले; पण या वर्षांतला हा आतापर्यंतचा सगळ्यात मोठा बदल असेल.

इंटरनेटच्या उदयानंतर  ऑनलाइन कोर्सेस तरुणाईला काही नवीन गोष्ट नाही, परंतु ती साधारणपणे रेझ्युमे भरण्यासाठी केलेली धडपड असते. शिक्षणासोबतच काही तरी ‘एक्स्ट्रा क्वॉलिफिके शन’ असावं असा तरुणाईचा समज आहे; पण ऑनलाइन शिक्षण ही आता शालेय शिक्षण संस्था आणि महाविद्यालयांची गरज झाली आहे. करोनाकाळात जी काही आव्हाने स्वीकारावी लागली त्यातलंच एक म्हणजे शिक्षण क्षेत्राचे बदलते स्वरूप आणि हा बदल येणाऱ्या काळातली आधुनिक संस्कृती ठरणार आहे. आजची तरुणाई प्रत्येक बदलाला धीटपणे सामोरी जाणारी आहे. हे बदल ट्रेण्ड म्हणून स्वीकारण्याचे धाडस आजच्या तरुणाईत आहे; पण या नव्या शिक्षण पद्धतीचा मुलांवर काय परिणाम होईल, हा विचार निश्चितच मनात येतो.  कॉलेज कॅ म्पस, कॅन्टीन, मित्रमैत्रिणी, इव्हेंट्स या सगळ्यांमध्ये अभ्यास आणि परीक्षांचा काळ सुखद वाटतो. आता हे इतक्यात तरी होणं शक्य नाही; पण अभ्यास आणि परीक्षा मात्र चुकणार नाहीत. हे तरुणाईकडून नेमकं  कसं स्वीकारले जाईल?

ऑनलाइन शिक्षणाची विविध क्षेत्रांत वेगवेगळी आव्हाने आहेत. अंकिता बनसोडे ही आयुर्वेदशास्त्राची विद्यार्थिनी सांगते, ‘‘आज विद्यार्थ्यांचे आरोग्य हा मुद्दा केंद्रस्थानी आहे, म्हणून ऑनलाइन शिक्षण पद्धत क्लिष्ट वाटत असली तरी स्वीकारावी लागेल. डिजिटल शिक्षणातून आपल्या क्षेत्राविषयी अधिक माहिती आणि ज्ञान मिळू शकते; परंतु ते एका मर्यादेपर्यंत  शक्य आहे. मी मेडिकलची विद्यार्थिनी आहे.आम्हाला व्यावहारिक ज्ञान जास्त महत्त्वाचे असते. हॉस्पिटल्समध्ये जाऊन ओपीडी वॉर्ड बघणे, रुग्णांचा अभ्यास करणे, शस्त्रक्रियांचा अभ्यास करणे.. हे शिक्षण ऑनलाइन घेणे शक्य नाही. मित्रमैत्रिणी आणि कॉलेजचे दिवसही तेवढेच महत्त्वाचे आहेत. त्या माहोलमध्ये अभ्यास करण्याची मजा वेगळीच असते. त्यामुळे ऑनलाइन शिक्षणाचे कमी-अधिक फायदे असले तरी ते प्रत्येक क्षेत्राचे भवितव्य असू शकत नाही.’’

‘इलेक्ट्रॉनिक अ‍ॅण्ड टेलिकम्युनिकेशन’चा विद्यार्थी असलेला तन्मय गायकवाड म्हणतो, ‘‘डिजिटल शिक्षण स्वीकारण्यात तसा कुठलाच धोका किंवा आव्हान नाही, कारण आम्ही टेक्नॉलॉजी फ्रेण्डली असणारी पिढी आहोत. ‘झूम’द्वारे होणारे लेक्चर्स आणि वेबिनार्स या काळात खूप उपयोगाचे वाटले. आमच्या कॉलेजने मुलांना कंटाळा येऊ नये म्हणून कधी ऑनलाइन प्रश्नमंजूषा, ऑनलाइन पेपर, व्हिडीओ अशा वेगवेगळ्या पद्धतीने अभ्यास सुरू ठेवला आहे. काही डिजिटल प्लॅटफॉम्र्स आणि वेगवेगळ्या लर्निग साइटसुद्धा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे आम्ही यात अभ्यासक्रमाव्यतिरिक्त अनेक गोष्टी शिकू शकतो. पुढचं भवितव्य म्हणून याचा विचार करताना दोन मुद्दे लक्षात घ्यायला हवेत.  एक म्हणजे घरात बसून तासन्तास प्रवास न करता आरामात  लेक्चरमध्ये सहभागी होता येतंय ही चांगली गोष्ट आहे; पण यामुळे कदाचित मुलं जास्तीत जास्त कोषात जातील. समोर स्क्रीनवर शिक्षक असणं आणि प्रत्यक्ष समोर असणं यात फरक आहे. वर्गात शिक्षकांचे पर्सनल अटेंशन मिळते ते इथे शक्य नाही. मुलांचे अशा स्वरूपाच्या लेक्चरमध्ये किती लक्ष लागेल, हासुद्धा प्रश्न आहे. अनेकदा मुलं तांत्रिक अडचणी सांगून ऑनलाइन लेक्चरला  उपस्थित राहात नाहीत. आता अशा प्रकारचे ‘डिजिटल बंकिंग‘ पाहायला मिळेल! कॉलेज कल्चरबद्दल बोलायचे झाले तर ते अर्थातच मिस करतोय, नुसता अभ्यासच नाही तर कॉलेजमध्ये होणाऱ्या विविध उपक्रमांमधून व्यक्तिमत्त्व विकास घडत असतो. दरवर्षी येणारे ज्युनियर्स आणि त्यांच्यासोबत होणारी मजा—मस्ती हे सगळंसुद्धा लवकरात लवकर हवं आहे,’’ असं  तन्मय म्हणतो.

येणारा काळ हा डिजिटल युगाकडे नेणारा आहे हे खरे असले तरी त्यालासुद्धा मर्यादा आहेत असं तरुणाईचं म्हणणं आहे. अजून काही तरुणांशी बोलल्यावर असंही लक्षात आलं की, कॉलेजमध्ये जाणं, मित्रमैत्रिणींसोबत अभ्यास करणं, सभोवतालच्या समुदायात राहणं, हे  त्या वयासाठी महत्त्वाचं असतं. त्यामुळे स्पर्धात्मक दृष्टिकोन वाढतो आणि अभ्यासासाठी पोषक असं वातावरणही तयार होतं. शिवाय परीक्षा जवळ आली की ग्रुप—स्टडी करणे, झेरॉक्सच्या दुकानात रांगा लावणे या गमतीजमती असतातच; पण सध्याची परिस्थिती आपल्याला स्वीकारावी लागणार आहे, हेसुद्धा तरुणांनी तितक्याच सहजतेने मान्य केले आहे. आता अभ्यासासाठी खास व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार केले जात आहेत आणि झूम किंवा इतर अ‍ॅप्सद्वारे व्हर्चुअल ग्रुप स्टडी केला जातो आहे. ऑनलाइन माध्यमांच्या शैक्षणिक पद्धती अंगीकारत असताना, ही माध्यमं मुलांच्या शैक्षणिक गरजा आधुनिक करतीलही; परंतु मुलांच्या सर्वागीण विकासाला हीच माध्यमं मारकसुद्धा ठरू शकतात. घरबसल्या मिळणाऱ्या शिक्षणामुळे सामाजिक आणि सार्वजनिक आयुष्यातील मूल्याशिक्षणात ती कुठे तरी कमी पडू शकतील. या सगळ्या सोईंमुळे स्वत:भोवतीच्या या कोषातून बाहेर येणं जिकिरीचं असेल. तसेच जी मुलं मुळातच अंतर्मुख असतात त्यांच्या मानसिकतेत होणाऱ्या बदलांचाही विचार व्हायला हवा.

ऑनलाइन शिक्षणाचे तांत्रिक फायदे जसं लेक्चर रेकॉर्ड करण्याची सुविधा, त्यामुळे सोईनुसार ते कधीही ऐकता येतात, अभ्यास आणि ज्ञानप्रसाराची गुणवत्ता वाढते, वेळ वाचतो, तांत्रिकरीत्या मुलांचे ज्ञान वाढते. अजून एक महत्त्वाचा मुद्दा इथे येतो तो म्हणजे मुलांसोबत शिक्षकांचेही कौशल्य समृद्ध होणे गरजेचे आहे. आज अनेक डिजिटल संस्था, होऊ घातलेल्या आणि इतर शिक्षकांसाठी नवनवीन प्रशिक्षण निकष घेऊन येत आहेत, याकडेही लक्ष दिले पाहिजे. ‘स्केलर अकॅडमी’चे सहसंस्थापक अभिमन्यू सक्सेना सांगतात, आपल्याकडे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून मिळणारे ज्ञान आणि जगात वावरताना लागणारी गुणवत्ता यात नेहमीच तफावत असते. हीच भरून काढण्यासाठी तरुणांसाठी ई—लर्निग कोर्सेस गरजेचे आहेत. आजची पिढी जर अशा पद्धतीने तयार झाली तर ती पुढच्या पिढीला घडवू शकेल. तर ‘सिम्पली अर्न’चे सीईओ कृष्णा कुमार यांच्या मते आज डिजिटल माध्यमांचे महत्त्व वाढले आहे. तरुणांनी या परिस्थितीचा पुरेपूर फायदा घेऊन त्यांचे ज्ञानभंडार भरले पाहिजे. डिजिटल मार्केटिंग, सोशल मीडियावरच्या कोर्सेसची गरज आणि उपयोग प्राथमिक शाळांपासून ते मोठय़ा विद्यापीठांपर्यंत सगळ्यांनाचा आहे.

व्हर्चुअल शिक्षण आधी ट्रेण्ड, मग काळाची गरज आणि आता पुढचे भवितव्य होताना दिसत आहे. हे भवितव्य लक्षात घेऊन त्यानुसार वाटचाल करताना त्यातल्या मर्यादा लक्षात घेणं, त्यातून आपल्याला काय हवं आहे याचं परीक्षण तरुणाईने करणं महत्त्वाचं  आहे. के वळ आव्हान म्हणून न स्वीकारता त्याचा डोळसपणे भाग झालो तर त्यातून होणारी प्रगती निश्चितच पुढे नेणारी आहे.

viva@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 12, 2020 1:36 am

Web Title: article about e learning zws 70
Next Stories
1 डाएट डायरी : कहानी घर घर की
2 पर्दे मे रहने दो..
3 निसर्गराजा.. ऐक सांगतो
Just Now!
X