|| आसिफ बागवान

फेसबुकवरील पोस्टखाली असलेल्या ‘लाइक’ची संख्या लपवण्याचा निर्णय फेसबुकने घेतला आहे. लाइकच्या कमीअधिक संख्येमुळे वापरकर्त्यांच्या मानसिकतेवर परिणाम होत असल्याच्या निष्कर्षांप्रत आल्यानंतर फेसबुकने हे पाऊल उचललंय. ते निश्चितच स्वागतार्ह आहे.

पसंती किंवा नापसंती दर्शवण्याच्या असंख्य पद्धती आहेत. चेहऱ्यावरील हावभाव, हातवारे, शब्द किंवा कृती अशा कोणत्याही प्रकारे एखाद्या गोष्टीबद्दल आपली आवड-नावड व्यक्त करता येते. या व्यक्त करण्याला काही मोजमाप नसतं. पण हे झालं सर्वसाधारण समाजात. समाजमाध्यमांत मात्र पसंती, नापसंती दर्शवण्याचं परिमाण आहे, त्याला ‘लाइक’ असं गोंडस नाव आहे. फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्रामवर ते ‘लाइक’ या नावाने प्रचलित आहे तर व्हॉट्सअ‍ॅपसारख्या माध्यमावर तसं दाखवणाऱ्या खुणा प्रचलित आहेत. अशा प्रकारचे ‘लाइक’ जितके जास्त तितकी ती गोष्ट अधिक आवडीची असा सर्वसाधारण समज अलीकडच्या काळात रूढ झाला आहे. इथपर्यंत ते ठीक आहे. मात्र, ठरावीक गोष्टीला जास्त ‘लाइक्स’ मिळालेच नाहीत तर ती फुटकळ किंवा अनुल्लेखनीय आहे, असं समजण्याचा वाईट पायंडा समाजमाध्यमांवर पडत चालला आहे. हाच पायंडा आता मोडीत काढण्याची सुरुवात फेसबुकने केली आहे. या वर्षी सप्टेंबर महिन्यात फेसबुकने ‘लाइक’ची संख्या जाहीर करणं बंद करण्याचा निर्णय घेतला आणि गेल्या काही दिवसांत ऑस्ट्रेलियासह काही देशांत त्याची अंमलबजावणीही सुरू झाली. भारतातही येत्या काळात हा निर्णय लागू होणार आहे. या पार्श्वभूमीवर ‘लाइक’च्या असण्या किंवा नसण्याने किती फरक पाडतो, हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे.

फेसबुक सुरू झालं त्याला आता जवळपास १५ वर्षे झाली आहेत. पण ‘लाइक’चं बटण आलं १० वर्षांपूर्वी, २००९ मध्ये. आपल्या फेबु मित्रमंडळींच्या पोस्ट, छायाचित्रे, चित्रफितींवर वापरकर्त्यांना सहज व्यक्त होता यावं या उद्देशाने फेसबुकने ‘लाइक’ सुरू केलं. पण त्याचा अंत:स्थ हेतू ‘न्यूज फीड’ प्रत्येकाला हवीहवीशी वाटेल, अशी बनवणं असा होता. वापरकर्त्यांला आपल्याच मित्रमंडळींपैकी ज्या पोस्टला जास्त ‘लाइक’ मिळत आहेत, त्या पोस्ट प्राधान्याने दाखवण्यासाठी ‘लाइक’ हे परिमाण मोजलं गेलं. ज्या पोस्टला जास्त ‘लाइक्स’ ती पोस्ट सर्वात वर असा क्रम ठरवण्यात आला. पण त्याचबरोबर जाहिराती मिळवण्यासाठीही फेसबुकने ‘लाइक’चा वापर केला. एखाद्या वापरकर्त्यांकडून कोणत्या स्वरूपाच्या गोष्टींना, ठिकाणांना, वस्तूंना जास्त ‘लाइक’ मिळतात, त्यावरून त्याला कोणत्या जाहिरातींमध्ये रस असू शकतो, याचे ठोकताळे बांधणारी यंत्रणा फेसबुकने उभी केली आणि त्याद्वारे जाहिरात कंपन्यांना तयार डेटा उपलब्ध करून दिला. समाजमाध्यमांवरील ‘ट्रेण्ड’ जाणून घेण्यासाठीही ‘लाइक’चे परिमाण अजमावले गेले. कालांतराने ‘लाइक’च्या बटणात केवळ ‘थम्ब्स अप’ न ठेवता वेगवेगळय़ा ‘इमोजीं’चा समावेश त्यात करण्यात आला.

हे झालं फेसबुकपुरतं. वापरकर्त्यांच्या आयुष्यात ‘लाइक’ने काय बदल घडवला? तर, वापरकर्त्यांसाठी ‘लाइक’ हे प्रतिष्ठेचे प्रतीक बनले. फेसबुकवर शेअर केलेल्या स्वत:च्या एखाद्या छायाचित्राला शेकडो लाइक्स मिळाले, याचे समाधान ते शेअर करणाऱ्यासाठी एखाद्या सौंदर्य स्पर्धेत मिळालेल्या बक्षिसाइतके होते. एखाद्या पर्यटनस्थळाच्या आपण काढलेल्या छायाचित्राला फेसबुकवर पसंती मिळणं, ही आपल्या छायाचित्रण कौशल्याची पोचपावती आहे, असं मानण्याची प्रथा सुरू झाली. तर फेबुवरून व्यक्त केलेल्या मतांना मिळालेल्या ‘लाइक्स’ सार्वमत ठरवू लागल्या. यातूनच सुरू झाली एक अदृश्य स्पर्धा. ही स्पर्धा होती अधिकाधिक लाइक्स मिळवण्याची. फेसबुकवरच्या एखाद्या पोस्टपासून एखाद्या फेसबुक पेजपर्यंत अनेक गोष्टींसाठी अधिकाधिक लाइक्स मिळवणं, हे अत्यावश्यक ठरू लागलं.

कदाचित खोटं वाटेल, पण अशा भरपूर ‘लाइक्स’ पुरवण्याची सेवा देणाऱ्या कंपन्या सुरू झाल्या. आर्थिक मोबदला घेऊन एखाद्या पोस्टला किंवा पेजला अधिकाधिक ‘लाइक्स’ मिळवून देणाऱ्या कंपन्यांनी आपली दुकानेच थाटली आणि अगदी खुलेपणाने आपल्या व्यवसायाच्या जाहिराती त्या करू लागल्या. या धंद्याचा सर्वाधिक फायदा करून घेतला तो राजकारण्यांनी. समाजमाध्यमांवरील प्रतिमासंवर्धनातून निवडणूक जिंकता येते, हे सिद्ध झाल्यानंतर नगरसेवकापासून खासदारापर्यंत (अगदी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षापर्यंतही!) बहुतांश राजकारण्यांनी या कंपन्यांकडे ‘लाइक’ मिळवून देण्याची जबाबदारी सोपवली. त्यांचा हिशोब साधासरळ होता. अधिकाधिक लाइक्स मिळाले की आपली प्रतिमा, चर्चा फेसबुकवर शीर्षस्थानी दिसणार आणि ‘जो दिखता है वोही बिकता है’ या उक्तीप्रमाणे आपल्याला अधिकाधिक समर्थन मिळवता येणार, हे त्यांचं गणित होतं.

‘लाइक’चा हा खेळ इथपर्यंत ठीक होता. पण ‘लाइक’च्या स्पर्धेतून निर्माण झालेली असूया वापरकर्त्यांवर मानसिक परिणाम घडवू लागली आणि धोक्याची घंटा वाजू लागली. दुसऱ्याच्या पोस्टला आपल्यापेक्षा अधिक ‘लाइक्स’ आले की येणारं नैराश्य असो की, आपल्या पोस्टला इतरांपेक्षा येणाऱ्या अधिक ‘लाइक्स’मुळे जागृत होणारा अहंभाव, या दोन टोकाच्या अवस्थांतून वापरकर्त्यांचं मन:स्वास्थ्य हेलकावे घेऊ लागलं. यावरून चिंता व्यक्त होऊ लागल्यानंतर फेसबुकने अखेर ‘लाइक’च्या मोजमापाला तिलांजली देण्याचा निर्णय घेतला. याची सुरुवात ऑस्ट्रेलियातून झाली आहे.

या निर्णयामुळे ‘लाइक’ बंद होणार का? तर नाही. ‘लाइक’चं बटण कायम राहील. फक्त एखाद्या पोस्टला आलेल्या ‘लाइक’ची संख्या दिसणार नाही. केवळ पोस्टकर्त्यांला लाइकची संख्या पाहता येणार आहे. पण इतरांना ते दिसणार नाही. ‘लाइक’चं प्रस्थ कमी करताना फेसबुकने वापरकर्त्यांवर होणारे मानसिक परिणाम रोखणे, हे कारण सांगितलं आहेच; पण त्यासोबतच फेसबुकला अपेक्षा आहे ती दर्जेदार ‘कंटेंट’ची. लोकांनी लाइकची गृहीतके मांडून पोस्ट न करता, मुक्तपणे व्यक्त व्हावं आणि आपल्या मित्रमंडळींशी संवाद साधावा, अशी फेसबुकची यामागची भूमिका आहे. एखाद्या मित्राला बरं वाटावं म्हणून त्याच्या पोस्टवर डोळे झाकून ‘लाइक’चं बटण न दाबता तुम्ही खरोखरच त्याची पोस्ट वाचून त्यावर व्यक्त व्हावं, अशी फेसबुकची इच्छा आहे. ती निश्चितच स्वागतार्ह आहे.

अर्थात ‘लाइक’चा हा निर्णय इतक्या सहजासहजी सर्वमान्य होईल, याबाबत शंका आहे. कारण आतापर्यंत जिथे जिथे तो निर्णय लागू झाला आहे, तेथून याला विरोधही झाला आहे. विरोध करणाऱ्यांमध्ये आघाडीवर आहेत ती काही सेलिब्रिटी मंडळी आणि ‘सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर’. फेसबुकवर लाइकचं मोजमाप थांबवण्यापूर्वी फेसबुकने आपल्याच मालकीच्या इन्स्टाग्रामवरूनही तो प्रकार हद्दपार केला. त्यामुळे ही मंडळी सध्या चिडली आहेत. त्याचं कारण स्वाभाविक आहे. कारण ‘लाइक’च्या जिवावर यातल्या अनेकांना ‘ग्लॅमर’मध्ये राहता येत होतं. लाइकच्या संख्येवर त्यांची लोकप्रियता सिद्ध करता येत होती. आता तेच होणार नसेल तर या निर्णयाला त्यांचा विरोध होणं स्वाभाविक आहे. असा विरोध येत्या काळात भारतातही झाला नाही तर नवलच!

फेसबुकवरून आपल्यावर सातत्याने वेगवेगळय़ा गोष्टींचा मारा होत असतो. हिंसक दृश्ये असलेल्या चित्रफितींपासून राजकीय परिस्थितीवर मार्मिक भाष्य करणाऱ्या मीमपर्यंत अनेक गोष्टी सातत्याने आपल्या पाहण्यात येत असतात. यातल्या अनेक गोष्टींची दखल घेण्याचीही गरज नसते. तर अनेक गोष्टी अशा असतात, ज्या आपण काळजीपूर्वक वाचून, पारखून त्यावर व्यक्त होणं आवश्यक असतं. दुर्दैवाने आपण या दोन्ही प्रकारांत भेद करत नाही. ‘लाइक’ केलं की आपलं काम झालं, अशी आपली मानसिकता असते. ही मानसिकता यापुढील काळात बदलेल आणि ‘लाइक’चा दर्जा सुधारेल, हीच अपेक्षा!

viva@expressindia.com