आपल्या आवडत्या अभिनेत्रीला ऐकता आलं आणि तिच्या उत्साही, पॉझिटिव्ह व्यक्तिमत्त्वातून खूप काही घेण्यासारखं होतं, अशीच प्रतिक्रिया कार्यक्रमाला उपस्थित रसिकांकडून ऐकायला मिळाली. मुक्ताने रंगवलेली ही मैफल उत्तरोत्तर रंगत गेली. अभिनेत्री मुक्ता बर्वेची कवयित्री म्हणूनसुद्धा ओळख कार्यक्रमाच्या शेवटी झाली. तिने ऐकवलेल्या स्वरचित कवितांनी प्रेक्षकांना अनपेक्षित सुखद धक्का दिला. उपस्थितांपैकी काही तरुण प्रेक्षकांच्या या प्रातिनिधिक प्रतिक्रिया.

किरण सिंग्रोल :
मुक्ता बर्वे माझी लाडकी अभिनेत्री आहे. तिला भेटायला म्हणून मी खास डोंबिवलीवरून माझ्या कॉलेजच्या वेळा अड्जस्ट करून कार्यक्रमाला हजेरी लावली. मला तिच्या कविता खूप आवडल्या. तिची कवयित्री म्हणून नव्याने ओळख झाली.

पर्णिका शुभे : व्हिवा लाउंजचा हा कार्यक्रम खूपच छान झाला. आवडत्या अभिनेत्रीला प्रत्यक्षात पाहायला, ऐकायला मजा आली. तिने तिच्या करिअरविषयी सांगितलेले मुद्दे आवडले. तिच्याकडून खूप शिकायला मिळालं. या वेळी तुम्ही खास आम्हा ठाणेकरांना तिला भेटायची संधी दिलीत याबद्दल आभार.

पूर्वा पाटणकर
मुक्ता बर्वेची फॅन तर मी आधीपासूनच आहे, पण आज तिच्या दिलखुलास गप्पा ऐकल्या, ज्या अजूनच छान वाटल्या. आई-वडिलांवर विश्वास ठेवा आणि पालकांनीही आपल्या मुलांवर विश्वास ठेवा ही गोष्ट आवडली.

मधुरा गोडबोले : चतुर अभिनेत्री असलेली मुक्ता कवयित्रीसुद्धा आहे हे माहीत नव्हतं. तिची कविता सगळ्यात जास्त आवडली, पण तिचं सगळं बोलणंच तरुणांना खूप मार्गदर्शन करणारं होतं. लहानपणीचा ‘भित्रा ससा’ या तिच्या नाटकातल्या पात्राचा प्रसंगही आवडला. आणि तेव्हापासून ते आतापर्यंत तिने केलेली स्वत:ची प्रगती खूप वाखाणण्याजोगी आहे.

पूर्वा पाटील :
तिच्या आताच्या भूमिकांपेक्षा एक वेगळं रूप आजच्या कार्यक्रमातून सापडलं. तिचा आतापर्यंतचा प्रवास प्रत्येकासाठीच खरंच खूप इन्स्पायिरग आहे. तिची कविता करण्याची प्रतिभा खरंच खूप वाखाणण्याजोगी आहे.

विभावरी देशपांडे : मुक्ताच्या आयुष्यातले विविध पलू पाहायला मिळाले. तिचे अभिनय क्षेत्रात नव्याने पदार्पण करू इच्छिणाऱ्यांसाठी वर्कशॉप घेण्याच्या आगामी प्लॅनविषयी सांगितलं. ही खूप सुंदर आयडिया आहे आणि ती प्रत्यक्षात उतरण्याची मी वाट पाहीन.

सानिका देशपांडे
मुक्ता बर्वे आधीपासूनच माझी इन्स्पिरेशन आहे, पण आजचा कार्यक्रम ऐकून तिच्याबद्दलचा आदर अजूनच वाढलाय. तिचे सगळे अनुभव ऐकून मलाही आता तिच्यासारखंच काही तरी करायला आवडेल.

सायली कुलकर्णी
मुक्ताचं बोलणं इन्स्पिरेशनल होतं. तुम्ही कुठेही काहीही करा, पण जे काही कराल ते पूर्ण अभ्यास करून. ही मुक्ताने सांगितलेली गोष्ट मला आवडली. माझ्या नव्या करिअरला दिशा मिळाली.

कल्याणी दाते : ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’पासूनच मुक्ता बर्वे तिच्या खास शैलीमुळे आवडते. आज तिला ऐकताना कळलं की, तिने नाटय़-शास्त्राचा अभ्यास केला आहे.तिच्या कविता ऐकून तर मलाही स्वत:त बदल करावेत असं वाटायला लागलंय.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

स्वाती शेळके :
मुक्ता आवडती अभिनेत्री आहे. त्यामुळे तिची मुलाखत होणार आहे हे कळल्यावर मी खूप उत्सुक होती. तिचा प्रवास, करिअरकडे पाहण्याची तिची वृत्ती याबद्दल जाणून घेता आलं.