केंद्रातील भाजप सरकारला केवळ गुजरात नव्हे, तर देशातील सर्व राज्यांचा विकास घडवून आणायचा आहे. त्यासाठी जगातील उद्योगांना भारत हे व्यासपीठ म्हणून उपलब्ध करून दिले जाणार आहे. औद्योगिक विकासाच्या या प्रवाहात महाराष्ट्राला देखील विकास साधता येईल. त्यासाठी भाजपकडे पूर्ण बहुमताने सत्ता सोपवावी, असे आवाहन गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांनी केले.
शहरातील भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ रविवारी येथील दादासाहेब गायकवाड सभागृहात आयोजित सभेत त्या बोलत होत्या.
गुजरातने विकास कसा साधला याची जंत्रीच त्यांनी सादर केली. कारखान्यांसाठी गुजरातमध्ये सर्वात प्रथम पायाभूत सुविधांकडे लक्ष केंद्रित करण्यात आले. कारखान्यांची संख्या वाढल्यानंतर स्थानिकांना रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या. याच धर्तीवर महाराष्ट्राचा विकास करता येईल, असे आनंदीबेन यांनी नमूद केले. आघाडीचे सरकार असल्यास विकासकामे ठप्प होतात. सहकारी पक्ष काम करू देत नाही. यामुळे भाजपला महाराष्ट्रात पूर्ण बहुमताचे सरकार हवे आहे. गुजरात सरकारने सर्व घटकांसाठी विविध योजना राबविल्या आहेत. महाकार्ड आरोग्य योजनेद्वारे लहान मुले व महिलांना शस्त्रक्रियेसाठी दोन लाख रुपयांची मदत शासनाकडून होते. तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला जात आहे. ज्या तरुणांना व्यवसाय करायचा आहे, त्यांना दुकान भाडेतत्त्वावर अथवा खरेदी करण्यासाठी निम्मी आर्थिक मदत करण्याची गुजरात शासनाची योजना आहे. शहरांचा चेहरामोहरा बदलण्यासाठी गुजरात शासन महापालिकांना भरीव निधी उपलब्ध करते. महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येण्याआधी गुजरातमधील महापालिकांना आपण चार हजार कोटी रुपयांचा धनादेश दिला, असेही त्यांनी सांगितले. या निधीद्वारे गुजरातमधील शहरी भागांत मूलभूत सुविधांची कामे करण्यासाठी महापालिकांकडे पैसा उपलब्ध झाला आहे. शहरांचा विकास करण्यासाठी शासनाने निधी देण्याची जबाबदारी स्वीकारणे आवश्यक असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.