नाटकातून संस्कृतीची निर्मिती झाली पाहिजे व नाटकातूनच चिरंतन मूल्ये जोपासण्याचे कामही व्हायला हवे. कारण जीवन व नाटय़ यांचा अतूट संबंध आहे, असे प्रतिपादन विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी यांनी केले. मराठी रंगभूमीला उज्ज्वल वारसा असला, तरी आज मराठी भाषेलाच अडगळीत टाकण्याचे काम होत आहे, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
येथे आयोजित रमेश वरपुडकर राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे उद्घाटन गुजराथी यांच्या हस्ते झाले. व्यासपीठावर पालकमंत्री प्रकाश सोळंके, माजी राज्यमंत्री सुरेश वरपुडकर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश देशमुख, माजी खासदार तुकाराम रेंगे, सुरेश जाधव, शेळी-मेंढी पालन महामंडळाचे अध्यक्ष रामराव वडकुते, महापौर प्रताप देशमुख आदी उपस्थित होते.
गुजराथी म्हणाले की, भाषणात प्रत्येक माणूस रंगकर्मी असतो. नाटकातून संस्कृतीचे निर्माण होते. त्यामुळे जीवनात नाटकाचा नको तर नाटकात जीवनाचा रंग भरा, जीवनाला अर्थ प्राप्त करून देणाऱ्या एकांकिका म्हणजे समाजाच्या व्यंगावर बोट ठेवून सुधारणा करण्याचा प्रयत्न असतो. स्वातंत्र्यासाठी नाटकातूनच स्फूर्ती व संदेश दिला गेला. स्पर्धेच्या युगात गतिमान होणे गरजेचे आहे. तसेच नीतिमान जीवन जगणेही गरजेचे आहे. नाटकातून कलेला चारित्र्याची जोड व चारित्र्याला दायित्वाची जोड निर्माण करणे आवश्यक आहे.
मंत्री सोळंके यांनी परभणीचा सांस्कृतिक वारसा जपण्यास वरपुडकर एकांकिका स्पर्धा पुन्हा नव्याने सुरू होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. नटराज रंगमंदिराची आज दुरवस्था झाली आहे. या रंगमंदिराच्या दुरुस्तीसाठी राज्य सरकार किंवा जिल्हा नियोजन विकास मंडळाकडून निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. राजकारणातही पुढे जाण्यासाठी अभिनयाचे अंग असावे लागते. आम्हीही बऱ्याचदा नाटकी बोलतो, त्यामुळे रंगकर्मी व राजकारणी यांचे जवळचे नाते असल्याचे सोळंके यांनी नमूद केले.
सुरेश देशमुख यांनी कलेला राजाश्रयाची गरज असते, असे सांगून वरपुडकर एकांकिका स्पर्धेसाठी दरवर्षी महापालिकेने ५ लाख रुपये देण्याची मागणी केली. प्रास्ताविक किशोर पुराणिक यांनी, तर सूत्रसंचालन अभय कुलकर्णी यांनी केले. स्पर्धा तीन दिवस चालणार आहे.