News Flash

‘ब्लॅक नाइट्स’: शोषणाचा वर्तमान पंचनामा

आफ्रिकेतील कृष्णवर्णीयांना युरोपातील वसाहतवादी राष्ट्रांनी गुलाम म्हणून आपल्या देशांत नेलं. तिथं त्यांच्या नशिबी अक्षरश: नरकवत जीणं आलं. दोन-अडीचशे वर्षांपूर्वीचा हा इतिहास आजही कृष्णवर्णीयांच्या मनात ताजा

| June 2, 2013 12:01 pm

पण त्यांना साधी माणुसकीची वागणूक देण्याचं सौजन्य मात्र त्यांनी दाखवलं नाही. आज जरी या देशांचे नागरिक म्हणून त्यांना हक्क मिळाले असले तरीही हे सहजी घडलेलं नाही. गेल्या शतकात मार्टिन ल्युथर किंग यांच्या नेतृत्वाखाली अमेरिकेतील कृष्णवर्णीयांनी प्रचंड लोकआंदोलन उभं करून शासनाला गदागदा हलवून जागं केलं. विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान कृष्णवर्णीयांनी या चळवळीत मोलाचं योगदान केलं आहे. अमेरिकेचे त्यावेळचे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांनी बहुसंख्याक गौरवर्णीयांचा रोष पत्करून कृष्णवर्णीयांना त्यांचे न्याय्य हक्क मिळावेत म्हणून आपली बुद्धी व प्रतिष्ठा पणाला लावली. त्याचंच फलित म्हणून अमेरिकेतील कृष्णवर्णीयांना नागरिकत्वाचे हक्क मिळाले. परंतु असं असलं तरीही वर्णश्रेष्ठत्वाची जाणीव ही तशी सहजी पुसली जाणारी गोष्ट नव्हे. म्हणूनच गौरवर्णीय देशांमध्ये वर्णश्रेष्ठत्वाची भावना आजही सुप्त रूपात आढळून येते. त्याचं प्रत्यंतर अधूनमधून घडणाऱ्या काही घटनांतून येत असतं.  
कृष्णवर्णीयांचा हा संघर्ष भारतातील चातुर्वण्र्यव्यवस्थेच्या, दलित-सवर्ण संघर्षांच्या लढय़ाशी नातं सांगणारा आहे. अर्थात देशकालपरत्वे त्याचे कंगोरे थोडे वेगळे असले तरी शोषण व दमनाची वृत्ती तीच आहे. हा धागा घेऊन नाटककार अरुण मिरजकर यांनी ‘ब्लॅक नाइट्स’ हे नाटक रचलं आहे. मात्र त्यांनी या प्रश्नाकडे वर्तमान परिप्रेक्ष्यातून पाहण्याची भूमिका नाटकात घेतली आहे. कृष्णवर्णीय व दलितांचं शोषण, अत्याचारग्रस्तता जरी समान असली तरी आज परिस्थिती काही अंशी का होईना, बदललेली आहे. त्यातही आता काळे-गोरे एवढाच भेद नाहीए, तर गहूवर्णी वा सावळ्या लोकांनाही गौरवणीर्र्कडून काळ्यांतच जमा केले जाते. परंतु गंमत अशी की, हेच गहूवर्णी स्वदेशात मात्र दलितांना रंगश्रेष्ठत्वाच्या दुराभिमानापोटी हीन लेखतात. त्यांच्यावर अत्याचार करतात. हा गंमतीशीर तिढा घेऊन मिरजकरांनी हे नाटक आजच्या वास्तवाशी जोडण्याचा यत्न केला आहे.                       
नाटकाची नायिका एक भारतीय अभिनेत्री (‘ती’) आहे. एका विदेशी चॅनलच्या रिअॅलिटी शोमध्ये एका गौरवर्णी स्पर्धकानं आपल्याला कृष्णवर्णीय म्हणून हिणवल्याचा कंठशोष करून ती त्या शोची विजेती ठरलीय. तिचं हे आपल्या अवमानाविरोधात आवाज उठवणं जगभर कौतुकाचा विषय ठरतं. तिला अनेक कार्यक्रमांना पाहुणी म्हणून बोलावणी येऊ लागतात. हाडाची अभिनेत्री असल्यानं आपण कसे या अन्यायाविरोधात उभे ठाकलो, हे ती ‘साभिनय’ लोकांपुढे मांडते. तिचं हे बाणेदारपण भावल्यानं एक अमेरिकन-आफ्रिकन चित्रपट दिग्दर्शक तिला आपल्या चित्रपटासाठी करारबद्ध करू इच्छितो. त्याला कृष्णवर्णीयांचा वर्णवर्चस्वविरोधी लढा, त्यांचा दुर्दैवी इतिहास त्यात मांडायचा असतो. तथापि, आपण कृष्णवर्णीय नसून गौरवर्णीय असल्याचा आणि त्याचा आपल्याला रास्त अभिमान असल्याचं ती त्याला स्पष्टपणे सांगते. तो तिला पन्नास कोटी रुपयांचं घसघशीत मानधन देऊ करतो तेव्हा मात्र ती चित्रपटात काम करायला तयार होते. तेव्हा तो तिला माझ्या शर्तीवर तुला काम करावं लागेल, हे स्वच्छपणे बजावतो. ती त्यासही राजी होते. या चित्रपटाचा नायक मीच असणार आहे, असं त्यानं सांगताच मात्र ती नाक मुरडते. एका काळ्या नायकाची नायिका म्हणून काम करायचं? ती आधी तर त्याला उडवूनच लावते. पण नंतर प्रश्न पन्नास कोटींचा असल्याचं लक्षात आल्यावर ती त्यालाही कबूल होते. तो प्रत्येक दृश्याची आधी रिहर्सल करण्याचा आग्रह धरतो. त्याप्रमाणे तो पहिल्याच दृश्यात तिला आपल्या अंगाचा वास घ्यायला लावतो. तिला त्याच्या अंगच्या वासाची शिसारी येते. पण करता काय! नाइलाज असतो. नंतर तो तिला कदान्न खाऊ घालतो. तिला मळमळून येतं. कृष्णवर्णीयांवरचा चित्रपट असल्यानं त्यांना कोणकोणते भोग भोगावे लागले याचं चित्रण त्यात असणार, हे ओघानं आलंच. कृष्णवर्णीय स्त्रियांना भोगवस्तू म्हणून वापरणाऱ्या गौरवर्णीयांनी त्यांच्यावर केलेले अनन्वित अत्याचारही त्यात साहजिकपणे असणार. ‘ती’ला हे सगळं असह्य़ होतं. ती त्याबद्दल त्याला खडसून जाब विचारते. ‘ही जुनी मढी किती काळ वागवायची? आज त्यांच्या स्थितीत सुधारणा झालीय ना!’ तो तिला वरवर दिसते तशी वस्तुस्थिती नाहीए, हे सांगायचा प्रयत्न करतो. तीही प्रतिवाद करते. तोही मग ‘मी हा एक विकावू चित्रपट बनवतो आहे. त्यातून मला पुरस्कार आणि नाव कमवायचंय,’ असं स्वच्छ सांगतो. तीही मग त्याच्याशी व्यावहारिक पातळीवर वाद घालू लागते. आज दलित-शोषितांनी उठसूठ आपल्यावर अन्याय-अत्याचार होत असल्याचा कंठशोष करणं कसं गैर आहे, आमच्या पूर्वजांनी कधीकाळी तुमच्यावर केलेल्या अन्याय-अत्याचारांचं भांडवल करून तुम्ही आज आम्हाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणं कसं गैर आहे, हे ती त्याला पटवून देते.
असं असेल तर मग तू माझ्याशी लग्न करशील का, म्हणून तो विचारतो. ती आधी त्याला सरळ उडवूनच लावते. मग काहीसा विचार करून म्हणते- ‘करेन. मी गौरवर्णी असूनही एका काळ्या व्यक्तीशी लग्न केलं याचं मला भांडवल करता येईल. शिवाय तू जागतिक कीर्तीचा चित्रपट दिग्दर्शक असल्यानं तेही माझ्या फायद्याचंच ठरेल,’ असं ती त्याला म्हणते.
या नोटवर नाटक संपतं..    
वर्ण-वंशभेद, त्याची तीव्रता, त्यांतला सुप्त संघर्ष, तसंच व्यावहारिक लाभ-हानीची गणितं मांडून यासंबंधात होणाऱ्या तडजोडी.. सामाजिक अभिसरणामागचा हाही एक छुपा पैलू लेखक अरुण मिरजकर या नाटकात अधोरेखित करतात. वंश-वर्णश्रेष्ठत्वाची चिकित्सा करतानाही आज सतर्क राहणं कसं आवश्यक आहे हेच यातून त्यांना दाखवायचंय. कृष्णवर्णीयांची पाश्र्वभूमी जरी त्यांनी नाटकाकरता घेतली असली तरी त्यांना भारतीय मातीतल्या वास्तवावरच खरं तर भाष्य करायचं आहे. त्यातही गंमत अशी की, ज्या भारतीय अभिनेत्रीचा ‘काळी’ म्हटल्यानं रिअॅलिटी शोमध्ये अपमान झाला, तिला स्वत:ला भारतीय संदर्भात मात्र आपण ‘गोरे’ असल्याचा दुराभिमान आहे. ती आपल्या इथल्या दलितांकडे तशाच दूषित दृष्टीनं पाहते, ज्या दृष्टीमुळे ती स्वत: रिअॅलिटी शोमध्ये विद्ध झाली होती! हा विरोधाभास केवळ एवढय़ावरच सीमित नाही, तर कृष्णवर्णीय दिग्दर्शकाला ती सहन करते तेही आपल्या पुढील लाभ-हानीची गणितं बांधूनच! लेखकानं दलित-सवर्ण तिढय़ातला हा कळीचा मुद्दा नाटकाद्वारे ऐरणीवर आणला आहे. त्याकडे शोषित-वंचितांच्या दृष्टिकोनातून पाहत असतानाच लेखक त्यापलीकडे जात आजच्या ‘बाजारवादी संस्कृती’नं घडवलेलं अभिसरणही आपल्यासमोर रोखठोकपणे मांडतो. म्हणूनच हे नाटक अधिक सच्चं व वास्तवाला भिडणारं झालं आहे. अन्यथा दलितांवरील अन्याय-अत्याचारांबाबतच्या आक्रोशापुरतंच ते सीमित झालं असतं. लेखकाचं हे आकलन भविष्यवेधी आहे.
दिग्दर्शक मिलिंद इनामदार यांनी या नाटकाचा गाभा मुळातून आत्मगत केलेला आहे. नाटक नेमकं काय म्हणू इच्छितंय, हे त्यांनी अचूक हेरलं आहे. त्यातली विदारकता, व्यवहारवादानं श्रेष्ठ-कनिष्ठत्वाच्या भावनेवर केलेली मात, आपला स्वार्थ साधत असेल तर जात तसंच वर्णश्रेष्ठत्वाचा मुद्दा दृष्टीआड करण्यापर्यंत मानवी संबंधांची गेलेली मजल.. या गोष्टी नाटकात प्रत्ययकारीतेनं येतात. दोन पात्रांचं नाटक त्यांच्यातल्या मनोव्यापारातून खेळवणं खचितच सोपं नाही. दिग्दर्शक मििलद इनामदार यांनी ध्वनिचित्रफितींतून एकीकडे कृष्णवर्णीयांवरील अत्याचारांचे दाखले देत, दुसरीकडे वर्तमानात त्यांच्याशी समांतर असलेल्या भारतातील दलित व सवर्णाची आज काय मानसिकता आहे, हेही वस्तुस्थितीला सामोरं जात दर्शवलं आहे. ‘ती’ आणि ‘तो’ यांच्यातील मानसिक द्वंद्व, त्यासाठी योजलेले रंगमंचीय व्यवहार यांतून नाटक हळूहळू पकड घेत जातं. इतकं, की नेपथ्यादी तांत्रिक बाबी त्यापुढं दुय्यम ठरतात. त्यांतल्या उणिवा दुर्लक्षून नाटकाचा तगडा आशयच प्रेक्षकाला धरून ठेवतो. हे या नाटकाचं मोठं यश आहे.
गौरव ढोकळे यांनी कृष्णवर्णीयांवरील ‘सॅन्कोफा’ आणि ‘जॅंगो अनचेन्ड’ या अंगावर शहारे आणणाऱ्या चित्रपटांची वापरलेली व्हिडीओ क्लिपिंग्ज नाटकातील आशय अधिक धारदार करतात. आघाती संगीत-तुकडय़ांतून त्यांनी यातले नाटय़पूर्ण क्षण आणखीन गडद-गहिरे केले आहेत. भूषण देसाईंनी प्रकाशयोजनेतून हे द्विपात्री मनोद्वंद्व तीव्रतर केलं आहे. मुकुंद ब्राह्मणे यांचं नेपथ्य मात्र नाटय़ांतर्गत पाश्र्वभूमीशी फटकून आहे. त्यातून काहीच सांगणं होत नाही.
माधुरी प्रभू या ‘ती’चं व्यक्तिमत्त्व कोळून प्यायल्या आहेत. वर्णश्रेष्ठत्वाचा अहंगंड हाडीमांसी रुजलेला असूनही ‘स्वार्थ’ ही त्याहून अधिक महत्त्वाची गोष्ट आहे याची स्वच्छ जाणीव त्यांच्या वागण्या-वावरण्यात आणि व्यक्त होण्यात पदोपदी जाणवते. आपल्या बिनतोड युक्तिवादानं आणि व्यवहारी चालीनं शेवटी ‘ती’नं ‘तो’वर केलेली मात खासीच! ‘तो’च्या भूमिकेतील निरंजन जाधव यांनीही कृष्णवर्णीय शोषितांचं दु:ख, वेदना, त्यांची तळमळ, तडफड यथार्थपणे साकारली आहे. बुद्धिगामी युक्तिवादात ‘ती’ला हरक्षणी निरुत्तर करणारा ‘तो’ अखेरीस मात्र तिच्या व्यवहारी चालीला बळी पडतो.. तिचं वर्चस्व मान्य करतो.  जातीय-वर्णीय अहम् आणि न्यूनगंड बाजूला सारून माणसं आता शुद्ध वास्तवाला सामोरी जाऊ लागली आहेत. त्यांना थोपवणं आता इतिहासालाही शक्य नाहीए, याचं सूचन करणारं हे नाटक आजच्या काळाशी नातं सांगणारं आहे, हे नक्की!                                                                

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 2, 2013 12:01 pm

Web Title: black nights post mortem of current exploitation
टॅग : Marathi Drama
Next Stories
1 फक्त पॅरिस दर्शन
2 सहजसुंदर..
3 श्वास गजल
Just Now!
X