गेल्या आठवडय़ात मुंबईचे तळे झालेले असताना व्हॉट्सअ‍ॅपच्या मदतीने नागरिकच एकमेकांना सूचना देत होते. मात्र या सगळ्यात ३० हजार कोटी रुपयांचा अर्थसंकल्प असलेली पालिका नागरिकांशी संपर्क साधण्यात पुरती अपयशी ठरली. एकीकडे आपत्कालीन विभागाचा दूरध्वनी नागरिकांच्या तक्रारींमुळे सतत खणखणत होता तर दुसरीकडे पालिकेकडून नागरिकांना माहिती देण्याच्या संकेतस्थळ, मोबाइल अ‍ॅप आणि मोबाइल संदेश अशा तिहेरी संपर्क यंत्रणा बासनात गुंडाळली गेली होती.
मुसळधार पाऊस पडला की शहराचे जनजीवन विस्कळीत होते याची पूर्वकल्पना असलेल्या पालिकेने गेल्या तीन वर्षांत आधुनिक तंत्राचा वापर करत संकेतस्थळापासून मोबाइल अ‍ॅपपर्यंत विविध सुविधा आणल्या. त्याचप्रमाणे मोबाइल संदेशाद्वारे मुंबईकरांना थेट माहिती देण्याचीही योजना आखली. मात्र नागरिकांना अत्यंत गरज असताना या तीनही यंत्रणा बंद असल्याचे लक्षात आले. वेधशाळेकडून केवळ सांताक्रूझ व कुलाबा येथील पावसाची माहिती समजते, हे लक्षात घेऊन पालिकेने उपनगरांमध्ये सुमारे २५ ठिकाणी स्वयंचलित पर्जन्यमापके लावली. या पर्जन्यमापकात नोंद होणाऱ्या पावसाची मुंबईकरांना थेट माहिती मिळावी यासाठी २०१२ मध्ये मुंबई मान्सून डॉट कॉम असे संकेतस्थळ सुरू करण्यात आले. हे संकेतस्थळ चालवण्यासाठी खासगी संस्थेला कंत्राटही दिले गेले. या संकेतस्थळावर दर १५ मिनिटांनी माहिती अपडेट होत असल्याने शहराच्या कोणत्या भागात नेमका किती पाऊस पडला त्याची माहिती मिळत असे. २०१४ मध्ये यापुढे पाऊल टाकत माजी महापौर सुनील प्रभू यांनी विधानसभा निवडणुकांच्या आधी मोबाइल अ‍ॅप्सची घोषणा केली. संकेतस्थळावर मिळणारी माहिती या अ‍ॅप्लिकेशनवरही मिळत होती. त्याचसोबत शहराच्या कोणत्या भागात पाणी साठले आहे, वाहतुकीची स्थिती काय आहे, त्याचीही माहिती नागरिकांना वेळोवेळी मिळणे अपेक्षित होते. सुरुवातीला अ‍ॅन्ड्रॉइडवर असलेले हे अ‍ॅप्लिकेशन काही दिवसांना आयओएस, विंडोवरील मोबाइलसाठीही अपग्रेड करण्यात येणार होते. मात्र अ‍ॅन्ड्रॉइडवरही हे अ‍ॅप्लिकेशन नीट सुरू झाले नाही.
मुंबईकरांना पावसाबाबत सतत माहिती देण्यासाठी संदेशांचा पर्यायही गेल्या वर्षी वापरण्यात आला होता. प्रत्यक्षात शुक्रवारी मुसळधार पावसामुळे मुंबईची जलनगरी झाली तेव्हा शाळा बंद करण्याचा निर्णय मुंबईकरांना प्रसारमाध्यमे व व्हॉट्सअ‍ॅपमुळे समजला. या सगळ्या गोंधळात शुक्रवार शनिवारच्या दोन दिवसात पालिकेच्या १९१६ या क्रमांकावर पाच हजाराहून अधिक तक्रारी आल्या. पाणी साठले, झाड पडणे, छत-भिंत कोसळणे, घरात पाणी घुसणे, शॉर्टसर्किट अशा विविध कारणांसाठी नागरिकांना या एकाच क्रमांकाची मदत घ्यावी लागली. याबाबत आयुक्त अजय मेहता यांना पत्रकार परिषदेत प्रश्न विचारला तेव्हा याबाबत वृत्तवाहिन्यांचे अभिनंदन करून विषयाला बगल दिली.