नितीन गडकरी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर त्यांच्या पाठोपाठ नागपूरकर नेत्याकडे महाराष्ट्र प्रदेश भाजपचे नेतृत्त्व चालून आले आहे. गडकरींना अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागल्यानंतरही त्यांचे राष्ट्रीय कार्यकारिणीतील स्थान अबाधित असल्याने नागपुरात आता भाजपची दोन सत्ताकेंद्रे अस्तित्वात आली आहेत. राज्य पातळीवर भाजपात गोपीनाथ मुंडे आणि नितीन गडकरी गटांमधील विळ्याभोपळ्याचे सख्य उघड आहे. त्यामुळे नागपुरात राहून प्रदेश पातळीवरची जबाबदारी सांभाळताना देवेंद्र फडणवीसांना पक्षांतर्गत राजकीय कसरत करावी लागणार आहे.
महालमधील गडकरी वाडय़ावरची ‘हुकुमत’ आता धरमपेठेतील फडणवीसांच्या बंगल्यावर स्थानांतरित झाल्याचे स्पष्ट चित्र दिसू लागले असून २०१४ सालच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी तरण्याबंड ‘फडणवीस पॅटर्न’ची खेळी भाजपने खेळली आहे.  साडेतीन मुहूर्तापैकी पूर्ण मुहूर्त असलेल्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर त्यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद चालून आल्याने निवडणूक प्रचाराची पहिली हाळी प्रदेश भाजपने दिल्याचे संकेत समजले जात आहेत चंद्रपूरचे आमदार सुधीर मुनगंटीवार हे गडकरी गटाचे म्हणून ओळखले जात असले तरी त्यांनी प्रदेशाध्यक्षपदावर काम करताना दोन्ही गटांचे संतुलन शेवटपर्यंत कायम राखले होते. मात्र, त्यांना दुसरी संधी नाकारून अचानक देवेंद्र फडणवीसांकडे ही जबाबदारी सोपविण्यात आली. ‘तरुण तुर्क’ म्हणून झपाटय़ाने राजकीय क्षितीजावर उदय झालेल्या देवेंद्र फडणवीसांनी आज त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा होताच महालमधील गडकरी वाडय़ावर जाऊन नितीन गडकरींचे आशीर्वाद घेतले. वाडय़ावर फडणवीसांचे जंगी स्वागत झाले. कांचन गडकरींनी त्यांना ओवाळले आणि पेढा भरविला. दोन्ही नेत्यांनी अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात केलेल्या चर्चेने प्रदेशाध्यक्षपदाच्या निवडणुकीला लागलेले गडकरी-मुंडे वादाचे ग्रहण दूर झाले. दोन्ही नागपूरकर नेते एकत्र आले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्वीपासून स्वयंसेवक असलेल्या फडणवीसांच्या पाठीशी संघ वर्तुळही अत्यंत खंबीरपणे उभे आहे. सरसंघचालक मोहन भागवतांचे दिवं. गंगाधरराव फडणवीस तसेच देवेंद्रच्या काकू व मूल-सावलीच्या आमदार शोभाताई फडणवीस यांच्याकाळापासून घरोब्याचे संबंध आहेत.
प्रदेशाध्यक्षपदाच्या वाटचालीत याचा मोठा आधार फडणवीसांना मिळणार आहे. गडकरी-फडणवीस संबंध अत्यंत मधुर असले तरी प्रदेश पातळीवर काम करताना मुंडे गटाच्या प्रभावात गडकरी गट नाराज होऊ नये, याची खबरदारी फडणवीसांना घ्यावी लागणार आहे. दोन दशकांचा राजकीय अनुभव असलेले फडणवीस यात कितपत यशस्वी होतील, हे येणारा काळच ठरवेल.
गेल्या २२ वर्षांच्या राजकीय प्रवासात फडणवीस कधीही कोणत्याही वादात अडकलेले नाहीत तसेच कोणत्याही गटबाजीत त्यांनी स्वारस्य दाखविलेले नाही. महापालिका आणि विधानसभेत लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना त्यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्दय़ांवर आवाज उठविल्याने स्थानिक जनतेतही त्यांची एक लोकप्रिय नेता म्हणून प्रतिमा निर्माण झालेली आहे. सिंचन घोटाळा बाहेर काढण्यात त्यांची अत्यंत   महत्त्वाची    भूमिका    होती.   याच आधारावर    सत्ताधारी  काँग्रेस-  राष्ट्रवादीला त्यांनी    वेळोवेळी    अडचणीत    आणले आहे.
देवेंद्र फडणवीसांच्या प्रभावी वक्तृत्त्वाचा त्यांच्या राजकीय वाटचालीत मोठा फायदा मिळाला. राष्ट्रीय पातळीवर काम करण्याची जबाबदारी मिळालेले नितीन गडकरी यांना आगामी लोकसभा निवडणुकीत जिंकून येण्याचे वेध लागले असून नागपूर लोकसभा मतदारसंघातून ते अर्ज भरतील हे जवळजवळ स्पष्ट झाले आहे. या पाश्र्वभूमीवर गडकरींच्या विजयात फडणवीसांना मोलाची भूमिका बजावावी लागणार आहे.