ग्रामदैवत श्री सिध्देश्वर यात्रेत यंदा प्रथमच उभारण्यात आलेल्या ताजमहालाची भव्य प्रतिकृती अचानकपणे काढून टाकण्यात आल्याबद्दल सुजाण नागरिकांनी नाराजी व्यक्त केली असताना दुसरीकडे ही प्रतिकृती काढून टाकण्यासाठी आपला कोणताही आग्रह नव्हता, असे स्पष्टीकरण भाजपचे आमदार विजय देशमुखयांनी दिले. मात्र यात्रेत ज्या ठिकाणी या ताजमहालाची प्रतिकृती उभारण्यात आली होती, त्या होम मैदानावर होणारा होम प्रदीपन सोहळा तथा शोभेच्या दारुकामाच्या वेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू शकतो म्हणून आपण ही प्रतिकृती हलविण्याची सूचना केली होती, त्यामागे हिंदुत्वाची भूमिका नव्हती, असे भाजपचे नगरसेवक जगदीश पाटील यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, ही यात्रा आयोजित करणाऱ्या सिध्देश्वर मंदिर विश्वस्त समितीने याबाबत आपण स्वत:हून ताजमहालाची प्रतिकृती हलविण्यास सांगितले नव्हते, असा सूर काढत हात वर केले आहेत. तर दुसरीकडे ताजमहालाच्या प्रतिकृतीमुळे कोणत्याही प्रकारची कायदा व सुव्यवस्था धोक्यात येण्याची शक्यता नव्हती, असे पोलीस सूत्रांकडून स्पष्ट करण्यात आल्याने ताजमहालाची प्रतिकृती यात्रेतून हलविण्यामागचा नेमका हेतू स्पष्ट होत नसल्याचे दिसून येते.
केरळच्या रॅम्बो इंटरनॅशनल कंपनीने यंदा प्रथमच सिध्देश्वर यात्रेत ताजमहालाची प्रतिकृती उभारली होती. उभारणीचे काम जवळपास पूर्ण झाले असताना अवघ्या यात्रेसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेली ही ताजमहालाची प्रतिकृती अचानकपणे काढून टाकण्यात आल्याने हा चर्चेचा विषय ठरला आहे. त्यामागे हिंदुत्ववादी मंडळींचे प्रयत्न कारणीभूत असल्याचे दिसून येत असल्याच्या पाश्र्वभूमीवर, ही प्रतिकृती हलविण्यामागे हिंदुत्वाचा मुद्दा नसून कायदा व सुव्यवस्थेचा मुद्दा असल्याचे स्पष्टीकरण भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक जगदीश पाटील हे देतात, तर भाजपचे आमदार विजय देशमुख या प्रकरणाशी आपला कोणताही संबंध नसल्याचे सांगतात. यात्रेत होम मैदानावर एका कोपऱ्यात ताजमहालाची प्रतिकृती उभारण्यात आली होती. परंतु या मैदानावर यात्रेच्या तिसऱ्या दिवशी होम प्रदीपन सोहळा होतो. त्यावेळी होमविधीसाठी पेरू व अन्य फळे टाकली जातात. त्यावेळी भाविकांकडून ही फळे दूर अंतरावरून टाकली जात असताना चुकून हे फळ ताजमहालाच्या प्रतिकृतीवर पडण्याची शक्यता असून त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेलाही बाधा निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवाय यात्रेचा समारोप याच होम मैदानावर शोभेच्या दारुकामाने केला जातो. त्यावेळी आकाशात उडालेली शोभेची दारू तथा फटाके, औटगोळे चुकून या प्रतिकृतीवर पडल्यास गोंधळ निर्माण होण्याची शक्यताही नगरसेवक जगदीश पाटील यांनी व्यक्त केली. याच भूमिकेतून आपण या प्रतिकृतीला विरोध केल्याचे त्यांचे म्हणणे आहे. तथापि, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याची जबाबदारी ज्या पोलीस यंत्रणेवर आहे, त्या यंत्रणेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रतिकृतीमुळे कायदा व सुव्यवस्था धोक्यात येण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचा निर्वाळा दिला आहे. त्यामुळे नगरसेवक जगदीश पाटील यांना या निमित्ताने कायदा व सुव्यवस्थेसंदर्भात वाटणारी काळजी व त्यातून त्यांनी ताजमहालाची प्रतिकृती हलविण्यासाठी घेतलेला पुढाकार आणि यात सिध्देश्वर मंदिर समितीने घेतलेली ‘नरो वा कुंजरो वा’ ची भूमिका हा संपूर्ण भाग वादाचा ठरला आहे. मात्र यात्रेत ताजमहालाची प्रतिकृती पाहून ‘वाह ताज.’ हे उद्गार काढण्याची संधी हुकल्याबद्दल नागरिकात खंत व्यक्त होत आहे.