खत प्रकल्पाकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी तसेच प्रकल्पात कचरा टाकल्यानंतर घंटागाडी कर्मचाऱ्यांना हात धुण्यासाठी आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी नाशिक महानगरपालिका श्रमिक संघातर्फे करण्यात आली आहे. आयुक्तांना यासंदर्भात निवेदन देण्यात आले आहे.
महानगरातील कचरा घंटागाडय़ांद्वारे जमवून तो खत प्रकल्पात नेण्यात येतो. प्रकल्पापर्यंत जाणाऱ्या रस्त्याची अवस्था बिकट झाली आहे. रस्त्यावर मोठे खड्डे पडले असून त्यात पाणी साचले आहे. खड्डे बुजविण्यासाठी मुरूम टाकण्याऐवजी दगडांचा वापर करण्यात आल्याने खड्डे न बुजता उलट गाडय़ांना अपघात होण्याची शक्यता निर्माण झाल्याचे कामगारांचे म्हणणे आहे. तसेच खत प्रकल्पामध्ये गाडय़ांना कचरा ओतण्यासाठी जागा नसते. गाडय़ा धुण्यासाठी अडचणी निर्माण होतात.
गाडय़ांची स्वच्छता होत नसल्याने गल्लोगल्ली गाडय़ा फिरतात तेव्हा त्यांचा वास येत असल्याची तक्रार नागरिकांकडून केली जाते. गाडीतील कचरा टाकल्यानंतर कामगारांना हात धुण्यासाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी वारंवार पत्राद्वारे करूनही कोणतीच कार्यवाही झालेली नाही. या सर्व समस्यांकडे त्वरित लक्ष देण्याची मागणी संघाचे उपाध्यक्ष महादेव खुडे यांनी पत्रकाद्वारे केली आहे.