तालुक्यातील १६९ महसुली गावांपैकी ९२ गावे ५० पैशापेक्षा कमी पैसेवारीची असल्याने संपूर्ण तालुक्याला दुष्काळी सवलती देण्यात याव्यात तसेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत एका गावात पाचपेक्षा जास्त कामे घेण्यात येऊ नयेत ही अट शिथील करण्यात यावी, अशा मागण्यांचे ठराव तालुकास्तरीय सर्वसाधारण सभेत करण्यात आले. आ. प्रा. शरद पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या या सभेत विविध विभागांचा सखोल आढावा घेण्यात आला. सुमारे आठ तास चाललेल्या या सभेत ग्रामस्थ व सरपंचांनी विविध समस्या मांडल्या.
तालुक्याला भेडसावणाऱ्या दुष्काळी परिस्थतीच्या पाश्र्वभूमीवर पाणी पुरवठा योजना व टंचाई, वीज वितरण कंपनी, महात्मा गांधी रोजगार हमी योजना, तहसील स्तरावरील विविध शासकीय योजना, वन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, शिक्षण विभाग आदी विभागांशी संबंधित विषयांना या सभेत वाचा फोडण्यात आली.
सकाळी १०.३० वाजता सुरू झालेली ही आमसभा सायंकाळी सहापर्यंत सुरू होती. बैठकीस आ. प्रा. शरद पाटील यांच्यासह जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुधीर जाधव, शिवसेना जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, माजी कृषी सभापती अरविंद जाधव, विद्यमान सभापती कैलास पाटील, उपसभापती सुरेखा हाके, माजी सभापती कमलताई बळसाणे यांच्यासह सर्व पंचायत समिती सदस्य व्यासपीठावर उपस्थित होते. प्रास्तविक गटविकास अधिकारी गौतम पाटील यांनी केले.
या सभेत दुष्काळाला आपत्ती न समजता इष्टापत्ती समजून पुढील पाच महिन्यात सिंचन क्षेत्र वाढविण्यासाठी तसेच गाव तलाव, पाझर तलाव, यांच्यातील गाळ काढणे, वनीकरणचा कार्यक्रम हाती घेणे, शेतशिवार रस्त्यांची कामे करणे, सामुदायिक शेततळ्यांचे अभियान राबविणे, अशा मागण्या करण्यात आल्या.
बैठकीत आ. प्रा. शरद पाटील यांच्या समवेत सुधीर जाधव, प्रा. अरविंद जाधव, कैलास पाटील, गटविकास अधिकारी गौतम पाटील, तहसीलदार शिवकुमार आवळकंठे, जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे यांसह विविध खात्यांच्या अधिकाऱ्यांनी योजनांचा आढावा घेतला.
अक्कलपाडा धरणाचे बांधकाम पूर्णत्वाकडे, पंचायत समितीसाठी अडीच कोटीचा नवीन इमारत निधी, कुसुंबा येथे ट्रामा सेंटर, लामकाणी ग्रामीण रुग्णालय, तालुक्यातील ३२ गावांसाठी स्वतंत्र नळ पाणीपुरवठा योजना, वलवाडीसाठी १४ कोटीची पाणी योजना तसेच अजंग, कुलथे, वेल्हाणे येथे आरोग्य केंद्र, अशी कामे आमदारांनी केल्याबद्दल सभेत विविध गावांच्या सरपंचांनी समाधान व्यक्त केले.