‘नमस्कार. आपल्याला कुठे जायचे आहे?’ असा प्रश्न तुम्ही थांबविलेल्या एकाद्या रिक्षा चालकाने विचारला तर आश्चर्यचकीत होऊ नका. परिवहन विभागाच्या पश्चिम उपनगर विभागाच्या ‘सौजन्य अभियानां’तर्गत मानसिकता बदललेला तो रिक्षा चालक असू शकतो. मुंबईतील रिक्षा चालकांची मनमानी आता नवीन राहिलेली नाही. प्रवाशांशी सतत हुज्जत घालणे, भाडे नाकारणे आणि भाडय़ाच्या रकमेवरून प्रवाशांशी झगडणे हीच प्रतिमा रिक्षा-टॅक्सी चालकांची मुंबईकरांना सतत दिसत असते. ही मानसिकता बदलण्यासाठी परिवहन विभागाने ‘गांधीगिरी’ सुरू केली आहे. रिक्षा-टॅक्सी चालकांची मानसिकता बदलून त्यांनी प्रवाशांशी सौजन्याने वागावे आणि त्यातून प्रवाशांबरोबर सौहार्दपूर्ण संबंध निर्माण व्हावेत यासाठी सौजन्य अभियान सुरू करण्यात आले आहे. पश्चिम उपनगरातील रिक्षा चालकांना प्रवाशांबरोबर कसे वागावे याचे धडे देण्यात आले असून त्यांना १२ मुद्दय़ांची नियमावली देण्यात आली आहे. रिक्षा-टॅक्सी हा ‘व्यवसाय’ नसून ती ‘सेवा’ म्हणून चालकांनी करावी असा प्रयत्न परिवहन विभागाचा असल्याचे सांगण्यात येते. रिक्षा-टॅक्सी चालकांची मानसिकता बदलली तर मुंबईच्या प्रवाशांची त्यांच्या बाबत असलेली समस्या काही प्रमाणात कमी होऊ शकेल, असेही मत परिवहन अधिकारी व्यक्त करत आहेत.