नव्या मंडळांना मंडपासाठी नाकारण्यात येणारी परवानगी, जाहिरातींसाठी नव्या मंडळांना मिळणारी सापत्न वागणूक, मंडपांसाठी खोदण्यात येणारे खड्डे, गणपती आणण्या-नेण्याच्या रस्त्यांवर पडलेलेल खड्डे, मूर्तीकारांचे प्रश्न आदींवर चर्चा करण्यासाठी महापालिकेला अद्याप मुहूर्त सापडलेला नाही. वारंवार बैठकीची मागणी करूनही पालिका तोंडाला पाने पुसत असल्याने बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे सदस्य संतप्त झाले असून पुढील आठवडय़ात बैठक न घेतल्यास असहकार केला जाईल, असा इशारा समन्वय समितीने दिला आहे.
दरवर्षी महापालिकेकडून ही बैठक आयोजित करण्यात येते. बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती, विविध सरकारी यंत्रणांच्या प्रतिनिधींना या बैठकीस आमंत्रित केले जाते. या बैठकीमध्ये गणेशोत्सव मंडळे आणि मूर्तीकारांना भेडसावणाऱ्या प्रश्नांवर तोडगा काढण्यात येतो. तसेच विसर्जनस्थळे आणि कृत्रिम तलावांच्या ठिकाणी उपलब्ध करण्यात येणाऱ्या सुविधांवरही बैठकीत चर्चा होते. गेल्या वर्षी मंडळांनी मंडपांसाठी खोदलेल्या खड्डय़ांचे महापालिकेने भांडवल केले होते. पावसाच्या तडाख्यात खड्डेमय झालेल्या रस्त्यांची जबाबदारी झटकण्यासाठी ही नामी युक्ती पालिकेने शोधून काढली होती. खड्डे न बुजविणाऱ्या काही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांवर नोटीसही बजावली होती. त्यामुळे समन्वय समिती-गणेशोत्सव मंडळे आणि पालिकेमध्ये वाद निर्माण झाला होता.
गेल्या वर्षी पालिकेने नव्या गणेशोत्सव मंडळांना मंडपासाठी परवानगी नाकारली होती. मात्र याबाबत तोडगा काढण्याचे आश्वासन महापौर सुनील प्रभू यांनी गेल्या वर्षी दिले होते. परंतु अद्यापही नव्या मंडळांचा हा प्रश्न सुटलेला नाही. नव्या गणेशोत्सव मंडळांना जाहिराती झळकविण्यासाठी वेगळे धोरण निश्चित करण्यात आले आहे. मात्र जुन्या मंडळांना लागू करण्यात येणारे धोरण आम्हाला लागू करावे, अशी मागणी नव्या मंडळांकडून करण्यात येत आहे. यासाठी नव्या मंडळांनी समन्वय समितीकडे धाव घेतली आहे. मंडपासाठी खोदण्यात येणाऱ्या खड्डय़ांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मंडपासाठी खोदलेले खड्डे गणेशोत्सवानंतर बुजविण्यात येतात. मात्र तरीही पालिकेकडून आकसबुद्धीने मंडपांवर कारवाईची नोटीस बजावली जाते. या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी समन्वय समिती गेल्या वर्षीपासून प्रयत्नशील आहे.
गणेश आगमन आणि विसर्जन मार्गातील खड्डे दरवर्षीचीच डोकेदुखी आहे. तसेच मंडळे आणि मूर्तीकारांचे प्रश्न दीर्घकाळ रेंगाळले आहेत. या सर्व समस्यांवर चर्चा करण्यासाठी तातडीने बैठक आयोजित करावी, अशी मागणी बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने महापौर सुनील प्रभू यांच्याकडे केली होती. मात्र प्रशासनाची टोलवाटोलवी सुरू आहे. ही बैठक तातडीने न झाल्यास प्रशासनाशी असहकार केला जाईल, असा इशारा बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष अॅड. नरेंश दहिबावकर यांनी दिला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 26th Jul 2014 रोजी प्रकाशित
पालिकेच्या उदासीनतेने गणपतीची तयारी अडली
नव्या मंडळांना मंडपासाठी नाकारण्यात येणारी परवानगी, जाहिरातींसाठी नव्या मंडळांना मिळणारी सापत्न वागणूक, मंडपांसाठी खोदण्यात येणारे खड्डे,
First published on: 26-07-2014 at 02:28 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ganpati coordination committee anger on bmc for not taking meeting to discuss preparation of ganesh festival