शहरातील व्हीआयपी कंपनीतील कामगार संघटनेच्या निवडणुकीची जोरदार तयारी सुरू झाली असून भोळे मंगल कार्यालयात आयोजित मेळाव्यात अरुण ठाकरे व सहकाऱ्यांनी मेळाव्याचे आयोजन करून समर्थ पॅनलची स्थापना केली आहे. सेवानिवृत्तीचा प्रश्न ५६ वरून ५८ वर्षे करणे ही आपली प्रमुख मागणी असल्याचे ठाकरे यांनी स्पष्ट केले.
सेवानिवृत्ती व पगारवाढ कराराची मुदत संपली असून आता सर्वानी नवीन करार तसेच कर्मचाऱ्यांचे प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी निवडणूक लढवून कंपनी व्यवस्थापनास नवीन करार करण्यास भाग पाडण्याकरिता एकत्र येण्याचे आवाहनही त्यांनी केले. आ. नितीन भोसले यांनी आपली व्यक्तिगत पाश्र्वभूमी मांडतानाच आपण कोणत्याही कामगार संघटनेची नोंदणी केलेली नाही, मनसेची नाशिक येथील कामगार संघटना बरखास्त करण्यात आली आहे, त्यामुळे कंपनीतील उपाहारगृह, कंत्राटी कामगार या गोष्टीत आपणास कोणतेही स्वारस्य नाही, असे स्पष्ट केले. आपल्या मतदारसंघातील कामगारांच्या न्यायाचा प्रश्न असल्याने आपण तो अधिवेशनात मांडला. ६०० कामगारांचा फायदा होत असेल, त्यांच्या निवृत्तीचा प्रश्न सुटत असेल तर त्याकरिता कामगारमंत्र्यांनी दखल घेऊन कंपनी व्यवस्थापन, संघटनेचे पदाधिकारी व आमदार यांची बैठक आयोजित केली. परंतु कंपनी मालकाच्या अनुपस्थितीत व्यवस्थापकाला कोणताही अधिकार नसल्याने मंत्र्यांनी व्यवस्थापकाला हाकलून लावल्याचेही आ. भोसले यांनी नमूद केले.
सध्याच्या अंतर्गत संघटनेत जर सहा महिने अगोदर व्यवस्थापनास नोटिसीव्दारे कराराची मुदत संपत असल्याचे निदर्शनास आणून दिले असते तर व्यवस्थापनाला नवीन करार करावा लागला असता. त्यामुळे कामगारंचे नुकसान झाले नसते. परंतु त्यांनी तसे केले नाही, कारण त्यांची बांधिलकी व्यवस्थापनाशी आहे, असा आरोपही त्यांनी केला.