सोयाबीनची पेरणी करून जमिनीची उगवणशक्ती गमाविण्यापेक्षा इतर पारंपरिक पिकांची शेती करावी, असे आवाहन अकॅडमी ऑफ न्युट्रीशन इम्प्रुव्हमेंटचे अध्यक्ष डॉ. शांतीलाल कोठारी यांनी शेतकऱ्यांना केले आहे.
सोयाबीन हे लाभकारी पीक नाही. वारंवार सोयाबीनची पेरणी करून शेत जमिनीची उगवणशक्ती गमाविलेल्या मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश तसेच जांबिया, सोमालिया आदी आफ्रिकी देशांच्या शेतकऱ्यांपासून धडा घ्यायला हवा. सोयाबीनला प्रथिनेयुक्त पौष्टिक पीक असल्याचे व अधिक लाभाचे प्रलोभन भारत सरकार गेल्या ६५ वर्षांपासून शेतकरी व उद्योग घराण्यांना देत आले आहे. मात्र, इतर धान्यांच्या जागी देशातील जनता सोयाबीनला नियमित भोजनात सामील करून खुश नसल्याचे सिद्ध झाले आहे. प्रगत राष्ट्र त्यांच्या प्रगतीसाठी प्रगतिशिल तसेच मागासलेल्या देशांमध्ये कुपोषणाची समस्या वाढवून विध्वंसाच्या उद्देशाने व्यापारी घराण्यांना जादा लाभ पोहोचवण्याच्या मागे लागले असल्याचा आरोप डॉ. कोठारी यांनी केला. शेतकऱ्यांनी सोयाबीन सोडून जनतेमध्ये प्रचलीत तैलीय अथवा स्थानिक पारंपरिक नैसर्गिक धान्याची पेरणी करावी, ही पिके बाराही महिने खुल्या बाजारात चांगले भाव मिळवून देतात, याकडे कोठारी यांनी लक्ष वेधले आहे.
सामान्य खाद्यान्नाच्या रुपात सोयाबीन प्रचलित करण्याचे सारे प्रयत्न विफल ठरल्यानंतर आता पोषाहाराच्या रुपात लोकांना जबरदस्तीने भरविण्याची मोहीमच सरकारने सुरू केली आहे. लाभार्थी बालके, शालेय विद्यार्थी, तरुणी, गर्भवती आणि स्तनदा माता सोयाबीनयुक्त पोषाहार स्वीकार करीत नसल्याचे अकॅडमीने केलेल्या एका सर्वेक्षणात स्पष्ट झाले आहे. सोयाबीनयुक्त आहार पचनक्रिया बाधित करून आरोग्यास हानी पोहोचवित आहे. भारतात दिशाहीन कृषी अधिकारी भलेही सोयाबीन शेतीसाठी शेतकऱ्यांना बहकावित असले तरी चीन, जपानसारखे जुने सोयाबीन उत्पादक देशही सोयाबीनचा दैनिक आहारात समाविष्ट करण्यात असमर्थ ठरले. सोयाबीनचे पीठ, तेल, डाळ, पनीर, सातू आदींचा आहारात वापर टाळावयास हवा. हानीरहित सोयामिल्क तयार करण्याचे तंत्रज्ञान विकसित केल्यानंतरच सोयाबीनचे खाद्य पदार्थ तयार करण्याचे व शेती करण्याचा अन्न, आरोग्य व कृषी खात्यातील वैज्ञानिकांनी सल्ला द्यावा, ज्यायोगे कुपोषण, उपासमार व आत्महत्या आदी समस्या निवारणासाठी सरकारचा बिनखर्च मदत होईल, असे आवाहन डॉ. कोठारी यांनी केले आहे.