काँग्रेसचे नवनिर्वाचित नगरसेवक एकसंघ राहिले तर महापालिकेत काही वेगळे घडवता येईल, असे सूचक प्रतिपादन डॉ. सुजय राधाकृष्ण विखे यांनी आज केले. पक्षाच्या नगरसेवकांच्या अनौपचारिक सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी ४ अपक्ष नगरसेवकही उपस्थित होते, त्यामुळेच विखे यांच्या भूमिकेस महत्त्व दिले जात आहे.
अकरापैकी दहा काँग्रेस नगरसेवक दुपारी गुलमोहोर रस्त्यावरील विखे यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आलेल्या सत्कारास उपस्थित होते. या कार्यक्रमास काँग्रेसमधील केवळ विखे गटाचेच पदाधिकारी उपस्थित होते. थोरात गटाच्या पदाधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात आलेले नव्हते. डॉ. सुजय विखे यांचा हा नगर शहरामधील पहिलाच राजकीय कार्यक्रम तसेच पक्षाच्या विजयी नगरसेवकांचा प्रथमच एकत्रित सत्कार होता.
दीप चव्हाण, रूपाली निखिल वारे, सुवर्णा कोतकर, सुनील कोतकर, सुनीता कांबळे, संजय लोंढे, सविता कराळे, जयश्री सोनवणे, शेख मुदस्सर, शेख फैयाज केबलवाले यांच्यासह ३ अपक्ष नगरसेवक व एका अपक्ष नगरसेवकाचा प्रतिनिधी या वेळी उपस्थित होते. युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल झावरे, जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस उबेद शेख या वेळी उपस्थित होते.
काँग्रेस पक्षाला बाजूला ठेवून कोणीही सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्न करू शकत नाहीत, त्यामुळे कोणीही काँग्रेसला गृहीत धरू नये, पक्षाच्या नगरसेवकांचा योग्य मान राहील असे पद मिळेल व कामेही होतील, असा विश्वास विखे यांनी व्यक्त केला. मात्र याबाबत बाळासाहेब थोरात व राधाकृष्ण विखे हे दोन्ही मंत्री योग्य तो निर्णय घेतीलच, पक्षाला आणखी ३ ते ४ जागांवर यश अपेक्षित होते, असेही त्यांनी स्पष्ट केले. दीप चव्हाण यांनीही या वेळी राष्ट्रवादी, काँग्रेसला गृहीत धरत असल्याचा आक्षेप घेतला.