नवेगाव-नागझिरा आणि बोर व्याघ्र प्रकल्पाच्या राखीव क्षेत्रालगत बफर क्षेत्राच्या निर्मितीकरिता येत्या ३० सप्टेंबरला बैठक आयोजित करण्यात आली आहे. या दोन्ही व्याघ्र प्रकल्पांसभोवतीचे क्षेत्र बफर क्षेत्र म्हणून घोषित करण्याकरिता तज्ज्ञ समितीची बैठक २ ऑगस्टला अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांच्या दालनात आयोजित करण्यात आली होती. या सभेत झालेल्या चर्चेच्या अनुषंगाने कार्यवाहीबाबतचा आढावा घेण्याकरिता, तसेच आवश्यक बाबींवर चर्चा करण्याकरिता तज्ज्ञ समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
बोर व्याघ्र प्रकल्पाची निर्मिती अलीकडचीच असून, नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प होऊन वर्षे होत आहेत. वनकायद्यानुसार व्याघ्र प्रकल्पाच्या निर्मितीनंतर त्याच्या राखीव क्षेत्रालगत बफर क्षेत्राची निर्मिती करणे गरजेचे आहे. मात्र, बफर क्षेत्र जाहीर झाल्यानंतर त्या क्षेत्रातील गावांचे पुनर्वसन हा वादाचा मुद्दा राहिला आहे. त्यामुळे बफरमध्ये किती क्षेत्र जाणार, या अनुषंगाने किती गावे त्यातून पुनर्वसित करावी लागणार, हे निश्चित होत असते. पुनर्वसनाच्या बाबतीत गावकरी समाधानी नसल्याचाच आजवरचा अनुभव आहे. पुनर्वसनाकरिता दिली जाणारी रक्कम आणि आश्वासने फोल ठरल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे. मेळघाट वगळता पुनर्वसनाच्या बाबतीत इतर व्याघ्र प्रकल्प अयशस्वी राहिलेले आहेत. त्यामुळे या दोन्ही व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्राच्या आखणीकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. नवेगाव-नागझिऱ्याबाबतचा निर्णय घेणे वनखात्याला एकदाचे सोपे जाईल, पण बोर व्याघ्र प्रकल्पाबाबत गावकऱ्यांची ओरड आजही कायम आहे. त्यामुळे बफर क्षेत्राच्या निर्मितीनंतर ही ओरड आणखी वाढणार हे निश्चित आहे.
नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या समितीत भंडाऱ्याचे मानद वन्यजीव रक्षक राजकमल जोब, गोंदियाचे मानद वन्यजीव रक्षक सावन बाहेकर, विदर्भ निसर्ग संरक्षण संस्थेचे दिलीप गोडे, सातपुडा फाऊंडेशनचे किशोर रिठे, वाईल्डलाईफ ट्रस्ट ऑफ इंडियाचे प्रफुल्ल भांबुरकर आणि गोंदिया जिल्ह्य़ातील आमगावच्या वनस्पतीशास्त्र विभागातील डॉ. भुस्कुटे यांचा समावेश आहे, तर बोर व्याघ्र प्रकल्पात विदर्भ निसर्ग संरक्षण संस्थेचे दिलीप गोडे, सातपुडा फाऊंडेशनचे किशोर रिठे, आदित्य जोशी, हिस्लॉप कॉलेजच्या प्राणीशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. आर.जे. एन्ड्र्युज, मानद वन्यजीव रक्षक कुंदन हाते, रोहीत कारू, कौशल मिश्रा यांचा समावेश आहे.