राज्यातील एक आदर्श बसस्थानक म्हणून लवकरच कराड बसस्थानकाचा विकास केला जाणार असून यासाठी मुख्यमंत्र्यांनी ११ कोटी रूपयांचा निधी जाहीर केला आहे. अत्याधुनिक बस स्थानक, व्यापारी संकुल, वाहनतळ, अन्य सुविधांचा या स्थानकात समावेश केला जाणार आहे. या सुविधांचा अंतर्भाव करताना हायटेक तंत्रज्ञान आणि भविष्याच्या वाढत्या लोकसंख्येचाही यात विचार केलेला आहे.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज कराड स्थानकाला भेट देत या स्थानकाच्या विकासाबाबत माहिती घेतली. या वेळी त्यांनी राज्यातील अन्य ठिकाणच्या इमारतींचा अभ्यास करून आणि पुढील काही वर्षांचा विचार करून एसटी आगार व इमारत उभारा अशी सूचना त्यांनी केली.
येथील एसटी बस स्थानकाच्या जागेवर नवीन अद्ययावत बसस्थानक उभारण्यात येणार आहे. पुढील ३० ते ४० वर्षांचा विचार करून बस स्थानक उभारण्यात येणार असून, त्यामध्ये शॉपिंगसेंटरसाठी गाळेही उभारण्यात येणार आहेत. त्याची माहिती घेण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बसस्थानकास भेट देऊन एकंदर आराखडय़ाची पाहणी करून सविस्तर माहिती घेतली. गृहमंत्री सतेज पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आनंदराव पाटील, परिवहन विभागाचे व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर, पुणे विभागीय व्यवस्थापक पाटील, जिल्हा विभाग नियंत्रक अनंत मुंडीवाले, जिल्हाधिकारी डॉ. रामास्वामी एन., राहुल चव्हण, अतुल भोसले उपस्थित होते. कपूर व आरेखक यांनी मुख्यमंत्र्यांना नवीन स्टॅण्डचे तीन प्लॅन दाखवले. त्यात मुख्यमंत्र्यांनी काही बदल सुचवले.
या वेळी बस स्थानकात दररोज येणाऱ्या प्रवाशांची संख्या, बसेसची संख्या, नवीन इमारतीतील प्लॅटफॉर्म, शॉपिंग सेंटरचे गाळे आदी कामांची माहिती मुख्यमंत्र्यांना देण्यात आली. यावर त्यांनी, दोन कोटींमध्ये सोलापूरचा स्टॅण्ड प्रशस्त केला गेल्याचे नमूद करून, कराडला ११ कोटी दिले आहेत, त्या दर्जाचे काम झाले पाहिजे. तयार केलेल्या प्लॅनमध्ये अजूनही सुधारणा करा. त्यामध्ये प्रवाशांना बसण्याची जागा, अंतर्गत रचना, कर्मचाऱ्यांसाठीची जागा, बस आतबाहेर जाण्याचा मार्ग, कॅन्टीन, पार्किंग, पाण्याची व्यवस्था आदींमध्ये बदलही त्यांनी सुचवले.
दरम्यान, शासनातर्फे उभारण्यात येणाऱ्या प्रेक्षागृह व विद्यार्थिनी वसतिगृहासाठी प्रस्तावित केलेल्या सैदापूर येथील आयटीआय परिसरातील जागा विद्यार्थिनी वसतिगृहासाठी योग्य नसून त्यासाठी दुसरी जागा शोधण्याचा आदेश मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अधिकाऱ्यांना देऊन प्रेक्षागृह, छोटय़ा कार्यक्रमांसाठी १०० आसन क्षमतेचे दोन कॉन्फरन्स हॉल तयार करण्याबाबत सूचना केली.
ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दीअंतर्गत विद्यानगर-सैदापूरमधील आयटीआयच्या परिसरात प्रेक्षागृह व आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थिनींसाठीच्या वसतिगृहाची जागा प्रस्तावित करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी या जागेची पाहणी केली. संबंधित अधिकारी व जिल्हाधिकारी डॉ. रामास्वामी एन. यांनी त्याविषयी माहिती दिली. या वेळी किती क्षेत्रात प्रेक्षागृह असेल, त्याची आसन क्षमता किती? वसतिगृह व प्रेक्षागृहाकडे ये-जा करण्यासाठी रस्त्याची सोय कशी आहे, याबाबत मुख्यमंत्र्यांनी माहिती घेतली. त्या वेळी १२०० आसन क्षमतेचे प्रेक्षागृह पुरेसे असले तरी छोटय़ा कार्यक्रमांसाठी प्रेक्षागृह दोन, १०० आसन क्षमतेचा कॉन्फरन्स हॉल तयार करण्याच्या सूचना केल्या.
दरम्यान, विद्यार्थिनी वसतिगृहाबाबत त्यांनी सर्व महाविद्यालयांना हे ठिकाण सोईस्कर आहे का, अशी विचारणा करून महाविद्यालयापासून हे अंतर किती याचीही माहिती घेतली. मात्र, संबंधित जागेत प्रेक्षागृह करणे योग्य असून, विद्यार्थिनी वसतिगृहासाठी ही जागा योग्य नसल्याचे सांगून त्यासाठी दुसरी जागा शोधा अशी सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना देऊन त्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्कात राहण्यास संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले.