धान उत्पादन वाढीसाठी नायट्रोजन यूज एफिशियंट (एनयूई) तंत्रज्ञान अत्यंत उपयुक्त ठरत आहे. या तंत्रज्ञानामुळे पिकांची वाढ मोठय़ा प्रमाणात होत असून उत्पादन कित्येक पटीने वाढत असल्याचे दक्षिण-पूर्व आशियातील मोठी बियाणे उत्पादक कंपनी महिको सीड्सने सिद्ध केले आहे.
जगातील अध्र्याहून अधिक लोकसंख्येच्या खाद्य सुरक्षेसाठी हे पीक अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. जगात दरवर्षी १६० दशलक्ष तर भारतात  ४४ दशलक्ष हेक्टर्सवर धानाचे उत्पादन घेतले जाते. सध्याचा लोकसंख्या वाढीचा दर लक्षात घेता भारत २०१३ पर्यंत लोकसंख्येत चीनला मागे टाकून जगात सर्वाधिक लोकसंख्येचा देश बनेल. युनायटेड नेशन्स फूड अ‍ॅण्ड अ‍ॅग्रीकल्चर ऑर्गनायझेशन (एफएओ)च्या अंदाजानुसार भारतातील २२१ दशलक्ष लोक कुपोषित आहेत. परिणामी भारतीय शेतकऱ्यांना कृषी उत्पादन वाढीकडे अधिक लक्ष द्यावे लागत आहे.
नत्रयुक्त खतांचा उपयोग उत्पादन वाढीसाठी केला जातो. परंपरागत पद्धतीने खतांचा वापर केल्यास केवळ ५० टक्के खते पिकांना मिळतात आणि उरलेली खते जमिनीत किंवा भूगर्भातील पाण्यात मिसळून जातात. कधी नायट्रस ऑक्साईडच्या रूपात हवेत पसरतात. हे प्रमाण ग्रीन हाऊस गॅसेसच्या म्हणजेच कार्बन डाय ऑक्साईडच्या तुलनेत ३०० टक्के अधिक असते. आशियातील काही देशांमध्ये धान हे नायट्रोजनवर आधारित पीक असून या ठिकाणी या पिकामध्ये हेक्टरी २०० किलोपर्यंत खते वापरली जातात. एनयूई तंत्रज्ञानामुळे नायट्रोजन खतांचा वापर लक्षणीयरित्या कमी होऊन खाद्य सुरक्षा वाढविली आहे.
 आर्केडिया बायोसायन्सेस इन्क या कृषी तंत्रज्ञान कंपनीने कृषी उत्पादनांच्या विकासावर तसेच पर्यावरण आणि मानवी आरोग्य सुधारण्यावर भर दिला आहे. या कंपनीने महिको समवेत एनयूई तंत्रज्ञान विकसित केले आहे. खाद्यसुरक्षा तसेच पर्यावरण संवर्धनाच्यादृष्टीनेही टाकलेले हे महत्त्वपूर्ण पाऊल आहे. महिको एक चांगला भागीदार असून त्यांनी शेतकऱ्यांना सर्वाधिक फायदा होईल, अशी उत्पादने विकसित करण्यावर जोर दिला आहे, असे आर्केडियाचे अध्यक्ष एरिक रे यांनी नमूद केले. अत्याधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी महिको कटिबद्ध असल्याचे महिकोचे व्यवस्थापकीय संचालक राजू बरवाले म्हणाले.