तुळजाभवानी मंदिरातील विविध घडामोडींची माहिती माध्यमांसमोर का मांडली, याचा राग मनात धरून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब पाटील यांचे पुत्र तथा जिल्हा परिषद सदस्य धीरज पाटील आणि बाजार समितीचे सभापती सचिन पाटील यांनी पुजारी मंडळाचे अध्यक्ष किशोर गंगणे यांना शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली असल्याची तक्रार गंगणे यांनी तुळजापूर पोलीस ठाण्यात दिली आहे.
गंगणे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मंदिरातील गरकारभार व भक्तांच्या सेवा-सुविधांसाठी आपण सातत्याने प्रश्न मांडत असल्याचे म्हटले आहे. तुळजाभवानी मंदिरासमोरील प्रवेशद्वारात नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी चेंगराचेंगरी होऊन एक भाविक दगावला. त्यामुळे उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती कोचर यांच्या आयोगाने दिलेल्या शिफारशीनुसार प्रवेशद्वारासमोर १०० मीटर मोकळी जागा असावी, असे म्हटले. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अप्पासाहेब पाटील यांचे घर महाद्वारासमोर आहे. माध्यमांसमोर ही माहिती दिल्यामुळे याचा राग मनात धरून तुळजाभवानीचे सीमोल्लंघन झाल्यानंतर देवीच्या मुख्य गाभाऱ्यात धीरज पाटील व सचिन पाटील यांनी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली असल्याचे गंगणे यांनी तक्रारीत म्हटले आहे. माध्यमांना माझ्या वडिलांचे नाव घेऊन का माहिती दिली, असे म्हणत जिवे मारण्याची धमकी दिली. धीरज पाटील व सचिन पाटील हे काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आहेत, तर अप्पासाहेब पाटील हे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. मंदिराचे प्रश्न सडेतोड व न घाबरता सर्वासमोर आणल्यामुळे त्यांच्याकडून धमकाविले जात आहे. त्यामुळे माझ्या जीवितास धोका निर्माण झाला असून, धमकी देणाऱ्यांविरुद्ध कारवाई करून पोलीस संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी गंगणे यांनी केली आहे. दरम्यान जिल्हा परिषद सदस्य धीरज पाटील यांनी आपण धमकी दिली नसल्याचा खुलासा केला आहे. केवळ प्रसिद्धीच्या हव्यासापोटी असे बेछुट आरोप केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.