रस्ता रुंदीकरणात बाधित झालेल्या १४० मालमत्ताधारकांना रमाई घरकुल योजनेंतर्गत सोमवारी २० बाय ३० आकाराचे भूखंड नावे करून देण्यात आले. महापालिका आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, आमदार प्रदीप जैस्वाल व संजय शिरसाट, तसेच गंगाधर गाडे यांच्या उपस्थितीत आयुक्तांच्या दालनात चिठ्ठय़ा काढून भूखंडाचे वाटप करण्यात आले. दरम्यान, या वेळी महापालिकेतील एकही पदाधिकारी उपस्थित नव्हता.
विशेष म्हणजे या योजनेद्वारे अनुसूचित जाती-जमाती व नवबौद्ध प्रवर्गातील लाभार्थ्यांना दोन लाख रुपये अनुदानात सदनिका बांधून देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीत मंजूर करण्यात आला होता. परंतु या प्रस्तावाला फाटा देत भूखंड वाटपाच्या प्रशासनाच्या निर्णयावर शिवसेनेतील एक गट नाराज आहे. खासदार चंद्रकांत खैरे हे सदनिका बांधण्यास अनुकूल असल्याचे समजते. तथापि, भूखंड देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतल्याने महापालिकेतील पदाधिकाऱ्यांनी सोमवारी झालेल्या भूखंड वाटपाच्या कार्यक्रमाकडे पाठ फिरविली.
शहराच्या हर्सुल भागात रमाई योजनेंतर्गत २२ कोटींचा निधी महापालिकेकडे सरकारने वर्ग केला होता. रस्ता रुंदीकरणात बाधित झालेल्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी डॉ. भापकर यांनी विशेष प्रयत्न केले होते.
फुलेनगर, कैलासनगर व पाणचक्की भागातील लाभार्थ्यांना सोमवारी भूखंड वाटप करण्यात आले. भूखंड वाटपाच्या या निर्णयावरून मात्र महापालिकेतील अधिकारी आणि शिवसेनेतील नेत्यांमध्ये मतभेद असल्याचे समोर आले. सदनिका उभारण्याचे ठरलेले असतानाही भूखंड का वाटप केले गेले? धोरणात्मक निर्णय घेताना पदाधिकाऱ्यांना का विश्वासात घेतले जात नाही, असा सवाल शिवसेनेचे गिरजाराम हळनोर यांनी स्थायी समितीच्या बैठकीत उपस्थित केला. रस्ता रुंदीकरणात बाधित झालेल्या अनेकांना अजून मोबदला मिळाला नाही. टीडीआर आणि एफएसआय दिला गेला नाही. घरकुल योजनेत सदनिका बांधण्याचे ठरलेले असताना भूखंड वाटपाचा निर्णय का झाला, कोणी घेतला, असे प्रश्न विचारण्यात आले. सदनिका बांधण्यासाठी आवश्यक ती जागा सोडून उर्वरित जागेत भूखंडाचे वाटप झाले तर काही हरकत नाही, अशी भूमिकाही हळनोर यांनी मांडली. या अनुषंगाने महापौर कला ओझा यांना विचारले असता, ‘भूखंड वाटपाच्या कार्यक्रमास मला अथवा महापालिकेतील पदाधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात आले नव्हते,’ असे उत्तर त्यांनी दिले. प्रशासनाने घेतलेला हा निर्णय रद्द करणार का, या प्रश्नाचे उत्तर देणे महापौर ओझा यांनी टाळले.
महापालिका पदाधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमास शिवसेनेच्या दोन आमदारांनी आवर्जून हजेरी लावली. या अनुषंगाने पालिकेत महापौर कला ओझा यांच्या दालनात बोलताना आमदार जैस्वाल यांनी, या कार्यक्रमाचे निमंत्रण आयुक्तांकडून आले होते. माझ्या मतदारसंघातील लाभार्थ्यांना भूखंड वाटप होणार होते. त्यामुळे कार्यक्रमास आलो असल्याचे स्पष्ट केले.