बुलढाणा पालिकेच्या बांधकाम विभागाने एक वर्षांपूर्वी लाखो रुपये खर्च करून मजबुतीकरण व डांबरीकरण केलेल्या बसस्थानक ते सक्र्युलर रोडची दुर्दशा झाली आहे. या रस्त्याला मोठमोठे खड्डे पडले असून ठिकठिकाणी गिटृी उखडून रस्ता वाहतुकीसाठी अडचणीचा झाला आहे. या निकृष्ट रस्त्यामुळे शहरात अपघाताचे प्रमाण वाढले आहे. कामात मोठय़ा प्रमाणावर गैरव्यवहार झाल्यामुळेच या रस्त्यांची दुरावस्था झाली आहे.
 सार्वजनिक बांधकाम खात्याचे विभागीय कार्यालय व कार्यकारी अभियंत्यांचे निवासस्थान या रस्त्यावरच आहे. मात्र, नगर पालिकेच्या बांधकाम विभागाच्या गैरव्यवहारामुळे रस्ता खड्डय़ात गेल्याने त्याचा त्रास सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना सोसावा लागत आहे. नागरिकांच्या मागणीवरून एक वर्षांपूर्वी या रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करण्यात आले होते. शहरातील केशवनगर, रामनगर, जिजामातानगर, विष्णूवाडी, चैतन्यवाडी यासह परिसरातील असंख्य नागरिक बसस्थानकावर येण्यासाठी व विविध कामांसाठी याच रस्त्याचा वापर करावा लागतो. गेल्या काही दिवसांपासून या रस्त्यावर मोठय़ा प्रमाणात वाहनांची देखील वर्दळ वाढली आहे. रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणाऱ्या ठेकदाराने या रस्ताकामात अत्यंत नित्कृष्ट दर्जाचे साहित्य वापरले. रस्त्याची दबाई करण्यात आली नाही. डांबराऐवजी चुरामिश्रित गिट्टीचा अधिक वापर करण्यात आला. या रस्त्याच्या मजबुतीकरण व डांबरीकरणात मोठय़ा प्रमाणावर गैरव्यहार झाला. त्यामुळे हा रस्ता खड्डामय झाला असून त्याचा नागरिक व वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे.
बुलढाणा शहरातील नगर पालिकेच्या बांधकाम खात्याचा शहरातील एकही डांबरी रस्ता चांगला नसल्याचे आढळून आले आहे. बुलढाणा नगर पालिकेला उपअभियंता व कनिष्ठ अभियंता दर्जाचा बांधकाम अभियंता नाही. एक स्थापत्य आरेखक अनेक दिवसांपासून ही कामे करतो. अंदाजपत्रकीय रकमेच्या चाळीस टक्के खर्च कमिशन व लाचखोरीत द्यावा लागत असल्याने  सगळे  रस्ते गिळंकृत होत आहे. याची आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांनी सखोल चौकशी करून शहरातील बसस्टॅंड ते सक्र्युलर रोड व इतर सर्व रस्त्यांची गुणवत्ता नियंत्रण विभागामार्फत चौकशी करून रस्त्यांची सुधारणा करावी, अशी मागणी आहे.