दररोज लाखोंच्या संख्येने रिक्षा प्रवास करणाऱ्या ठाणेकरांचा प्रवास सुरक्षित व्हावा, यासाठी ठाणे शहरातील रिक्षांमध्ये ‘स्मार्ट ओळखपत्र’ बसविण्याचा निर्णय ठाणे वाहतूक पोलिसांनी घेतला आहे. या ओळखपत्रात ‘सुरक्षा कोड’ देण्यात आला आहे. प्रवाशांनी मोबाइलमध्ये ‘सेफ जर्नी’ नावाचे  सॉफ्टवेअर डाऊनलोड करावे आणि त्याआधारे हा सुरक्षा कोड स्कॅन करताच काही क्षणातच त्यांना रिक्षाचालकाची संपूर्ण माहिती मिळू शकणार आहे. प्रत्येक रिक्षात चालकाच्या आसनामागे ‘स्मार्ट ओळखपत्र’ छापील स्वरूपात असेल. त्यावर मोबाइल धरताच हा सुरक्षा कोड स्कॅन होईल. या ओळखपत्राचे छायाचित्रही प्रवाशांना काढता येणार आहे. राज्यातील हा पहिलाच प्रयोग आहे, असा दावा ठाणे वाहतूक पोलिसांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना केला. महिनाभरापूर्वी रिक्षातून पडून गंभीर जायबंदी झालेल्या स्वप्नाली लाड प्रकरणानंतर वाहतूक पोलिसांनी सुरू केलेल्या या मोहिमेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

या स्मार्ट ओळखपत्रावर वाहतूक पोलीस आणि महिला हेल्पलाइनचे क्रमांक देण्यात आले असून त्या क्रमांकावर संपर्क साधताच महिलांसह अन्य प्रवाशांना तात्काळ मदत मिळू शकते, असा दावा वाहतूक पोलिसांनी केला आहे. एका खासगी कंपनीमार्फत ‘स्मार्ट ओळखपत्र’ तयार करण्यात येणार असून त्यासाठी प्रत्येक रिक्षाचालकाला शंभर रुपये खर्च येणार आहे. या ओळखपत्रामध्ये रिक्षाचालकाचे नाव, पत्ता, संपर्क क्रमांक, रिक्षाचा क्रमांक, वाहतूक पोलीस आणि महिला हेल्पलाइनचे क्रमांक देण्यात आले असून ते साधारण ओळखपत्रापेक्षा आकाराने मोठे असणार आहे.

या ओळखपत्रामध्ये आधारकार्डप्रमाणे ‘सुरक्षा कोड’ देण्यात आला आहे. त्याआधारे रिक्षाचालकाची संपूर्ण माहिती प्रवाशांना मिळणार आहे. रिक्षामध्ये प्रवाशांना दिसेल अशा ठिकाणी म्हणजेच चालकाच्या आसनाच्या पाठीमागील बाजूस हे स्मार्ट ओळखपत्र बसविण्याच्या सूचना वाहतूक शाखेने केल्या आहेत. या नव्या योजनेसाठी रिक्षाचालकांची माहिती एका अर्जाद्वारे गोळा करण्याचे काम सुरू करण्यात आले असून येत्या १५ तारखेला ही योजना सुरू करण्यात येणार आहे. ठाणे शहराबरोबरच कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर आणि भिवंडी शहरात ही योजना टप्प्याटप्प्याने राबविण्यात येणार आहे, अशी माहिती ठाणे वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्त रश्मी करंदीकर यांनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अनधिकृत रिक्षा शोधणे सोपे..
ठाणे शहरातील अधिकृत रिक्षांमध्ये स्मार्ट ओळखपत्र बसविण्यात येणार असल्याने शहरातील अनधिकृत रिक्षा शोधणे आता सोपे होणार आहे. त्यामुळे अनधिकृत रिक्षांवर कारवाई करणे अधिक सोयीस्कर ठरेल. तसेच हेल्पलाइनमुळे नागरिकांचा प्रवास अधिक सुरक्षित होईल. त्यामुळे अधिकृत रिक्षाचालकांनी या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन करंदीकर यांनी केले आहे.