घातक रसायने कृत्रिम शीतपेयाद्वारे घशाखाली ढकलून हाडे ठिसूळ होणे आणि अन्य दुष्परिणाम याविषयी आता हळूहळू जनजागृती होऊ लागली आहे. परिणामी नैसर्गिक शीतपेयांनाच प्राधान्य देण्याचा विचार रुजू लागला आहे. मुंबई ग्राहक पंचायतीनेही या कृत्रिम शीतपेयांच्या दुष्परिणामांबाबत मोठय़ा प्रमाणात जनजागृती केली. आता ग्राहक पंचायतीच्या ‘कंझ्युमर्स क्लब’तर्फे मुंबई, चिपळूण, दापोली, आंजर्ले आदी ठिकाणी विद्यार्थ्यांकडून या कृत्रिम शीतपेयांचे दुष्परिणाम सांगणारी पथनाटय़े, छोटय़ा नाटिका सादर केल्या जात आहेत.
कृत्रीम शीतपेयांमध्ये प्रामुख्याने फॉस्फरिक अ‍ॅसिड, कॅफीन, अस्पारटम, घातक कृत्रिम रंग, कार्बनडाय ऑक्साईड, अ‍ॅल्युमिनियम आदींचा वापर केलेला असतो. फॉस्फरिक अ‍ॅसिडमुळे शीतपेयातील आम्लता वाढते आणि कार्बनडाय ऑक्साईडचे शोषण अधिक प्रमाणात केले जाते. शीतपेयातील कार्बनडाय ऑक्साईड कार्बेनिक अ‍ॅसिड स्वरूपात शोषले गेल्यामुळे हाडातील कॅल्शियम कमी होऊन ते मुत्रावाटे शरीराबाहेर फेकले जाते. यामुळे दात, मणका आणि कमरेची हाडे ठिसूळ होतात. हाडातील कॅल्शियम रक्तात येऊन बाहेर जात असल्याने आर्थरायटिस, मुतखडा, रक्तवाहिन्या कठीण होणे, असे विकार होण्याची शक्यता असते, असे तज्ज्ञांचे मत आहे.
फॉस्फरिक अ‍ॅसिडमुळे शरीरातील पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम यांचेही प्रमाण बिघडते. फॉस्फरिक अ‍ॅसिड हे तीव्र स्वरूपाचे आम्ल असल्याने अपचन होते. या शीतपेयांमध्ये साखरेचे प्रमाणही खूप असते.
त्यामुळेही जाडेपण आणि इतर आजार उद्भवू शकतात. या शीतपेयांमध्ये कीटकनाशके सापडल्याचेही वेगवेगळ्या प्रयोगातून समोर आले आहे. शीतपेयातील हाय फ्रुक्टोज कॉर्न सीरपमुळे लठ्ठपणा वाढतोच; पण त्यातून कोलेस्टेरॉल वाढून हृदयविकाराचाही धोका संभवत असल्याचे आहारतज्ज्ञ आणि डॉक्टरांचे म्हणणे                  आहे.
कृत्रिम शीतपेयांचे दुष्परिणाम समोर आल्याने जास्तीत जास्त लोकांनी कृत्रिम शीतपेयांऐवजी शहाळ्याचे पाणी, आंब्याचे पन्हे, लिंबू, आवळा, कोकम सरबत, नीरा, उसाचा रस अशी नैसर्गिक पेयांना अधिक प्राधान्य द्यावे. त्यामुळे कृत्रिम शीतपेयात असलेली घातक रसायने शरीरात जाणार नाहीत, असे आवाहन मुंबई ग्राहक पंचायतीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यां अनुराधा देशपांडे यांनी  केले.    
कृत्रिम शीतपेयांच्या दुष्परिणामांविषयी समाजात जनजागृती करण्यासाठी मुंबई ग्राहक पंचायतीतर्फे गेली काही वर्षे सातत्याने जनजागृती मोहिम राबविण्यात आली. त्याचे परिणाम आता हळूहळू दिसायला लागले आहेत. विविध महिला मंडळांना आम्ही पत्र पाठवून याविषयी जाणीव करून दिली. लग्न किंवा अन्य समारंभातून स्वागतपेय म्हणून कृत्रिम शीतपेयांबरोबरच नैसर्गिक पेयांचा पर्याय उपलब्ध करून द्यावा, म्हणून विविध कॅटर्स यांच्याशी संपर्क साधला. सुमारे अडीचशे महिलांना फळांपासून टिकाऊ सरबत तयार करण्याचे प्रशिक्षण दिले. या सर्व उपक्रमात आम्हाला डॉ. मालती कारवारकर, डॉ. रमेश गोडबोले यांची खूप मदत झाली. – अनुराधा देशपांडे