वाढीव कर, खड्डे, रस्त्यांच्या दुर्दशेमुळे कल्याण डोंबिवली शहरातील नागरिक मेटाकुटीला आले आहेत. हे कमी म्हणून की काय पालिकेच्या नेतिवली टेकडी येथील जल प्रकल्पातून वेगाने सोडलेले पाणी डोंबिवलीतील रामचंद्र जलकुंभ येथे जलवाहिनीतून बाहेर येऊन रहिवाशांच्या घरात घुसले. त्यामुळे घरामध्ये चार ते पाच फूट पाणी साचल्याने तीन कुटुंबियांच्या घरांतील सर्व सामानाचे नुकसान झाले आहे. पालिकेने केलेल्या पंचनाम्यात या तीन रहिवाशांचे सुमारे १० लाखांपर्यंत नुकसान झाले आहे. आता ही नुकसानभरपाई ठेकेदार देणार की प्रकल्प अभियंत्यांच्या वेतनातून वसूल केली जाणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
 डोंबिवलीला मुबलक पाणीपुरवठा व्हावा म्हणून नेतिवली टेकडी येथे सुमारे ७० ते ८० कोटी खर्चून जल शुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात आला आहे. या केंद्रातून डोंबिवलीसाठी टाकण्यात आलेल्या जलवाहिन्यांची अंतर्गत स्वच्छता करण्यासाठी ३ सप्टेंबर रोजी दुपारी साडे तीन वाजता पाणीपुरवठा विभागातर्फे अचानक वेगाने पाणी सोडण्यात आले. पालिकेच्या आपत्कालीन विभाग, अग्निशमन दल, डोंबिवलीत प्रभाग क्षेत्र कार्यालयाला कोणतीही पूर्वसूचना याबाबत देण्यात आली नाही. वेगाने सोडलेले पाणी डोंबिवलीत रामचंद्र जलकुंभ भागातील टेकडीसदृश्य भागात आल्यानंतर जलवाहिनीतून बाहेर पडून ते लगतच्या स्कंदगिरी इमारतीमधील तळ मजल्याला राहत असलेल्या एम. एस. मर्ढेकर, नामदेव मोरे, राजेंद्र जैसवार या तीन रहिवाशांच्या घरात घुसले. या घरांमध्ये पाच ते सहा फूट पाणी तुंबून ते खिडकी, दरवाजावाटे बाहेर पडले. पाणी प्रकल्प विभागाच्या निष्किाळजीपणामुळे ही घटना घडली असल्याचे ‘फ’ प्रभागाचे प्रभाग अधिकारी विनायक पांडे यांनी पंचनामा अहवालात म्हटले आहे. पाण्याच्या वेगाने पाथर्ली येथील एक भिंत चाळीवर पडून चाळीचे नुकसान झाले आहे. हे काम ठेकेदार विराज कंपनी दुरुस्त करून देणार आहे. नामदेव मोरे कुटुंबियांच्या घरातून बारा तोळे सोने चोरीला गेल्याची पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे.