ठाणे महापालिकेतील स्थायी समितीत टक्केवारी चालते, असा आरोप करून काही वर्षांपूर्वी शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांनी स्थायी समितीच्या कारभारातील ‘अंडरस्टँडिंग’ उघड करत खळबळ उडवून दिली होती. दिघे यांच्या आरोपांनंतरही ठाण्यातील सर्वपक्षीय ‘सेटिंग कमिटी’ नेहमीच चर्चेत राहिली. तीन वर्षांपूर्वी महापालिकेचा कारभार आयुक्त आर.ए.राजीव यांच्या ताब्यात जाताच या साटेलोटय़ांना लगाम बसल्याचे बोलले जात होते. मात्र, ठाण्यात निविदांचे जोरदार ‘फिक्सिंग’ सुरू असल्याचा आरोप करत गुरुवारी सत्ताधारी शिवसेनेच्या सदस्यांनी नगर अभियंता के.डी.लाला यांनाच लक्ष्य केले. राजीव यांच्या मर्जीतील अधिकारी म्हणून लाला ओळखले जातात. असे असताना लाला यांच्या कार्यालयातून निविदा मागे घेण्यासाठी कंत्राटदारांना धमकीचे दूरध्वनी केले जातात, असा आरोप करत सदस्यांनी खळबळ उडवून दिली. निविदा ‘रिंग’ करण्यासाठी हा आटापिटा सुरू असतो, असा आरोपही यावेळी करण्यात आला.
ठाणे महापालिकेचा कारभार पारदर्शक असल्याचा दावा आयुक्त आर. ए. राजीव करीत असले तरी राजीव सुट्टीवर जाताच नगरसेवकांनी अभियांत्रिकी विभागासह महापालिकेतील महत्त्वाच्या खात्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप सुरू केल्याने महापालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे. लेखा विभागात ठेकेदारांकडून पुढे केलेल्या कामांच्या फायली दोन टक्के घेऊन पुढे सारल्या जातात, असा आरोपही यावेळी करण्यात आला. राजीव यांच्या अनुपस्थितीत अभियांत्रिकी विभागावर झालेल्या आरोपांमुळे महापालिकेतील तथाकथित पारदर्शक कारभाराचा दावा एक प्रकारे फोल ठरल्याची चर्चा आता रंगली आहे. ठाणे महापालिकेच्या गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत शहरातील वेगवेगळ्या प्रभागांमधील शौचालयांच्या दुरुस्तीचे प्रस्ताव मंजुरीसाठी आणण्यात आले होते. मात्र, गतवर्षीचे प्रस्ताव अद्याप मंजूर झालेले नसतानाही यंदाच्या वर्षी अशा प्रकारचे प्रस्ताव का आणण्यात आले, असा सवाल शिवसेनेच्या सदस्यांनी केला. शहर अभियंता के.डी. लाला यांच्या कार्यालयातून ठेकेदारांना निविदा मागे घेण्यासाठी धमक्यांचे फोन येत असल्याचा आरोप शिवसेनेचे ज्येष्ठ सदस्य अशोक वैती यांनी करताच सभागृहात खळबळ उडाली. वैती यांनी आरोपांच्या फैरी झाडताच शिवसेनेचे सर्वच सदस्य महापालिकेच्या कारभारावर तोंडसुख घेऊ लागले. सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी तर अधिकाऱ्यांवर बंदुकी ठेवून कामांचे प्रस्ताव मंजूर केले जात असल्याचा आरोप केला. दरम्यान, या सर्व प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. राजीव यांच्या अनुपस्थितीत रंगलेल्या या आरोप-नाटय़ामुळे प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी अडचणीत सापडले असून राजीव यांच्यापुढे तोंड उघडताना बिचकणारे नगरसेवक गुरुवारी मात्र जोशात दिसून आल्याची चर्चाही रंगली होती.
अतिरिक्त आयुक्त शामसुंदर पाटील यांनी या सगळ्या प्रकरणाची चौकशी केली जाईल, असे सांगितले. तसेच नगरसेवकांनी या प्रकरणी ठोस पुरावे सादर करावेत. त्यावर चौकशी करून संबंधितांवर कारवाई केली जाईल, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.