दवाखान्यात गेल्यावर किंवा पॅथॉलॉजी लॅबमध्ये गेल्यावर योग्य नस सापडत नाही म्हणून अनेकदा डॉक्टरांचा वेळ वाया जातो. त्यांना योग्य प्रकारे नस शोधून देण्यासाठी ऑगमेंटिक रिअॅलिटीचा वापर करून वेन व्हिज्युअलायझर विकसित करण्यात आले आहे. या माध्यमातून नस सापडणे सोपे होईल, असा विद्यार्थ्यांचा दावा आहे. तर एक्स-रेसाठी वापरण्यात येणाऱ्या मोठय़ा खर्चीक पॅनल्सच्या ऐवजी सीआयएस पॅनल्सचा वापर करून एक्स-रे यंत्रणा कशी स्वस्त होऊ शकते याचा लेखाजोखाही विद्यार्थ्यांनी मांडला आहे. निमित्त होते वेलिंगकर व्यवस्थापन संस्था आणि एमआयटी यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या आठदिवसीय कार्यशाळेचे.
संशोधनाच्या माध्यमातून विविध क्षेत्रांचा विकास करण्यासाठी शैक्षणिक संस्था पुढाकार घेत असतात. यामध्ये वेलिंगकर संस्थेने एआयटीच्या सहकार्याने मागच्या वर्षीपासून संशोधन कार्यशाळेचे आयोजन करण्यास सुरू केले आहे. यामध्ये यंदा हेल्थ केअर या संकल्पनेवर आधारित संशोधनांना वाव देण्यात आला होता. यात सहभागी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी एमआयटीचे संशोधक रमेश रासकर संस्थेत आले होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेतील शंभर विद्यार्थ्यांनी चौदा उपकरणांची संकल्पना मांडली. इतकेच नव्हे तर आयआयटीमधील प्रयोगशाळांचा वापर करून त्याच्या प्रतिकृतीही विकसित केल्या. यामध्ये वेन व्हिज्युअलायझर, लो कॉस्ट एक्स-रे यंत्रणेचा समावेश आहे.
याशिवाय विद्यार्थ्यांच्या एका संघाने रक्ताचा वेग तपासण्यासाठी लेसर स्पेकल कॉन्ट्रास्ट इमेजिंगच्या माध्यमातून स्किन पफ्र्युशन फोटोग्राफी उपकरण विकसित केले आहे. यामुळे त्वचेच्या ऊतीचा अभ्यास करणे सोपे होणार आहे. तर एका संघाने स्टेथो कार्डिओग्राम उपकरण विकसित केले आहे. या उपकरणाच्या माध्यमातून डॉक्टर रुग्णाला तपासण्यासाठी ज्याप्रमाणे स्टेथोस्कोपीचा वापर करतात, तसाच वापर करून कार्डिओग्राम काढणे शक्य होणार आहे.
एका संघाने मोबाइल आणि एका सेन्सरच्या माध्यमातून त्वचारोगांचे निदान लावण्यासाठी एक उपकरण विकसित केले आहे. या उपकरणाच्या माध्यमातून त्वचेच्या कर्करोगाचेही निदान लागू शकेल असा विद्यार्थ्यांचा दावा आहे.
एका संघाने कानाच्या आजारांवर निदान करण्यासाठी हेडफोनच्या साह्य़ाने ओटोस्कोप हेडफोन विकसित केला आहे. नेत्र चिकित्सेसाठी अॅन्टेरिअर सेगमेंट ऑक्युलर इमेजिंग नावाचे उपकरण तयार केले आहे. यामुळे डोळय़ाच्या सूक्ष्म भागातील आजारांचे निदानही करता येणे शक्य होणार आहे.
ईसीजी काढण्यासाठी हार्ट मॉनिटरिंग प्लॅटफॉर्म विकसित करण्यात आला आहे. हे एक जॅकेट असून या माध्यमातून हृदयाच्या ठोक्यांवर लक्ष ठेवणे सोपे होते. अशाच प्रकारची आणखी काही उपकरणे विद्यार्थ्यांनी दंत, झोपेच्या आजारांचे निदान करण्यासाठीही विकसित केली आहेत.
या उपकरणांचे प्रदर्शन नुकतेच संस्थेत पार पडले. या वेळी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी प्रदर्शनात मांडलेल्या प्रत्येक उपकरणाबाबतची माहिती जाणून घेतली. तसेच ही सर्व उपकरणे ग्रामीण भागांत उपयुक्त असून ती त्या ठिकाणी पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे नमूद केले, तर संस्थेत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना तांत्रिक ज्ञान आणि व्यवस्थापकीय कौशल्ये पणाला लावून अभ्यास करण्याची संधी या माध्यमातून मिळत असल्याचे मत संस्थेचे संचालक डॉ. उदय साळुंखे यांनी व्यक्त केले.
– नीरज पंडित
संग्रहित लेख, दिनांक 3rd Feb 2015 रोजी प्रकाशित
आरोग्यदायी संशोधन
दवाखान्यात गेल्यावर किंवा पॅथॉलॉजी लॅबमध्ये गेल्यावर योग्य नस सापडत नाही म्हणून अनेकदा डॉक्टरांचा वेळ वाया जातो.
First published on: 03-02-2015 at 06:16 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ven visualiser